आशीष ठाकूर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निफ्टी निर्देशांकाच्या भविष्यकालीन वाटचालीचे आलेखन

हल्ली बाजारात तेजी-मंदीचा खो-खोचा खेळ चालू आहे. एखाद दिवस पूर्ण तेजीचा तर दुसऱ्या दिवशी तेजीला ‘खो’ बसताना दिसतो. म्हणजे आदल्या दिवशीच्या तेजीची अंशात्मक वाढ पूर्णपणे गिळंकृत होत दुसऱ्या दिवशी घसरणीने पुन्हा पूर्वपदावर फेर. बाजाराची ही अशी गोंधळाची, दिशाहीन स्थिती आहे. आज वाचकांना पूर्णपणे माहीत असलेल्या आणि ते वापरत आलेल्या संकल्पनांतूनच – ‘तुझे आहे तुजपाशी’चा आधार घेत निफ्टी निर्देशांकाच्या भविष्यकालीन वाटचालीचे आलेखन करायचा प्रयत्न करू या. विषयाच्या खोलात शिरण्यापूर्वी बाजाराचा साप्ताहिक बंद जाणून घेऊ या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ५४,३०३.४४ 

निफ्टी : १६,२०१.८०

निफ्टी निर्देशांकाच्या भविष्यकालीन आलेखनासाठी (रोडमॅप) आपण खालीलप्रमाणे घेणार आहोत –

१) निफ्टी निर्देशांकाचा ‘महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर’

२) निफ्टी निर्देशांकाच्या वाटचालीचा परीघ

३) पोकळी (गॅप) संकल्पना यांचा आधार घेऊ या.  

१) निफ्टी निर्देशांकाचामहत्त्वाचा केंद्रिबदू स्तर’ :

निफ्टी निर्देशांकावर १६,८०० पर्यंत जी अल्पजीवी तेजी आलेली तिचा पाया हा निफ्टी निर्देशांकावर १५,९०० हा होता. तेव्हा आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकावर १५,९०० हा ‘महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर’ असेल.

२) निफ्टी निर्देशांकाच्या वाटचालीचा परीघ :

सद्य:स्थितीत निफ्टी निर्देशांकाची ३०० अंशांच्या परिघात वाटचाल चालू आहे. जसे की, १५,९०० अधिक ३०० अंश १६,२००.. १६,५००.. १६,८०० याप्रमाणे ती असेल. निफ्टी निर्देशांक १५,९०० चा ‘महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर’ राखण्यात अपयशी ठरल्यास १५,९०० उणे ३०० अंश १५,६००.. १५,३०० ही निफ्टी निर्देशांकाची खालची लक्ष्य असतील.   

३) पोकळी (गॅप) संकल्पना :

एखाद्या कंपनीला भरीव नफा, कंपनीच्या उत्पादनाला प्रत्यक्ष स्वरूपात फार मोठय़ा प्रमाणात खरेदीची विचारणा (बाइंग ऑर्डर) अथवा कंपनीच्या बाबतीत सकारात्मक घटना घडल्यास, ज्यामुळे कंपनीचा भविष्यकाळ उज्ज्वल होतो अशा बातम्या जेव्हा संध्याकाळी येतात, तेव्हा दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांमध्ये तो समभाग खरेदी करण्याकरता झुंबड उडते. ही संधी हुकता कामा नये या धारणेतून सारासार विवेकबुद्धीला तिलांजली देत, ‘नाऊ ऑर नेव्हर’ असा पवित्रा घेतला जातो. तेव्हा दुसऱ्या दिवशी त्या समभागात खरेदीचा रेटा वाढत अगोदरच्या दिवशीचा उच्चांक व आजचा नीचांक या दोन किमतींमध्ये दरी निर्माण होऊन, पूर्ण दिवस ही दरी सांधली जात नाही. या प्रकारच्या घटनेला ‘गॅपअप ओपनिंग’ म्हणतात आणि त्या समभागाचा भाव वाढत जातो. भविष्यकालीन घसरणीत ही ‘किमतींच्या दरीतील जागा’(रायझिंग गॅप एरिया) समभागाच्या किमतीला आधार ठरतो. कारण याच स्तरावर ती सुखद बातमी आलेली आणि आजही त्या गोष्टी कायम आहेत. फक्त वरच्या स्तरावर नफारूपी विक्री झाल्याने भाव खाली आले. आता पुन्हा ती संधी, तीच किंमत मिळत असल्याने गुंतवणूकदार त्या स्तरावर (रायझिंग गॅप एरिया) खरेदी करतात. आताच्या घडीला अशी स्थिती निफ्टी निर्देशांकावर १६,३७० ते १६,५०६ च्या दरम्यान आहे (शुक्रवार, २७ मे चा उच्चांक १६,३७० आणि सोमवार, ३० मेचा नीचांक १६,५०६) म्हणूनच गुंतवणूकदारांनी येणाऱ्या दिवसात १६,३७० ते १६,५०६ चा स्तर लक्षात ठेवायला हवा.     

आता याच्या बरोबर उलट कंपनीच्या बाबतीत निराशाजनक घटना घडल्यास, जसे की तोटा, संप.. ज्यामुळे दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदार आपले गुंतविलेले मुद्दल सुरक्षित राखण्यासाठी तो समभाग विक्रीचा मार्ग अवलंबतात, तेव्हा अगोदरच्या दिवशीचा नीचांक व आजच्या दिवशीचा उच्चांक या दोन किमतींमध्ये दरी निर्माण होऊन, पूर्ण दिवस ही दरी सांधली जात नाही. या घटनेला ‘गॅप डाऊन ओपनिंग’ म्हणतात व त्या समभागाचा भाव खाली घसरत जातो. भविष्यकालीन सुधारणेत ही ‘किमतींच्या दरीतील जागा’ (गॅप एरिया) समभागाच्या किमतीला वर जाण्यास अडथळा ठरते. कारण याच स्तरावर ती निराशाजनक बातमी आलेली व आजही ती स्थिती कायमच आहे. आता चालू असलेल्या अशक्त सुधारणेत पुन्हा ती संधी, तीच किंमत मिळत असल्याने ‘विषाची परीक्षा’ नको या न्यायाने गुंतवणूकदार त्या स्तरावर (गॅप डाऊन एरिया) गुंतवणूकदार मुद्दल सुरक्षित राहण्यासाठी पुन्हा विक्रीचा मार्ग अवलंबतात. आता वरील गोष्टींची सांगड निफ्टी निर्देशांकावर घालता ५ मेचा नीचांक १६,६५१ आणि ६ मेचा उच्चांक १६,४८४ वरील दोन्ही गोष्टींची (रायझिंग-फॉलिंग गॅपची) सांगड घालता येणाऱ्या दिवसांत निफ्टी निर्देशांकांच्या सुधारणेत १६,३७० ते १६,६५१ चा स्तर पार करणे नितांत गरजेचे आहे असे घडले तरच या सर्व निराशाजनक घटनांमधील सुधारणेला ‘आहे मनोहर तरी’ असे म्हणता येऊ शकेल.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nifty index futures chart stock market prediction for next week zws
First published on: 13-06-2022 at 01:02 IST