मुंबई-पुण्याच्या बाहेरून कोणी वाचक त्यांच्या वित्तीय नियोजनासाठी संपर्क करतात तेव्हा या सदराचे उद्दिष्ट अल्प प्रमाणात का होईना सफल झाले असे वाटते. लोकमान्य टिळकांसारखे राजकारणी, कृष्णाजी केशव दामले अर्थात कवी केशवसुत, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे, भारतरत्न पांडुरंग वामन काणे, भारतरत्न भीमराव रामजी आंबेडकर असे थोर पुरुष रत्नागिरी जिल्ह्य़ाने या देशाला दिले. महाराष्ट्राला सर्वाधिक भारतरत्ने देणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्य़ाला नररत्नांची खाण समजले जाते. या रत्नागिरी जिल्ह्य़ाच्या रायगड जिल्हा सीमेवर मंडणगड तालुका आहे. या तालुक्यात म्हाप्रळ नावाचे लहानसे गाव आहे. गावात व्हीएसएनएल ब्रॉडबँड इंटरनेट सेवा २०१० मध्ये पोहोचली, यावरून गावात असलेल्या पायाभूत सुविधांची कल्पना येऊ शकेल. अशा गावात राहणाऱ्या कोणा वाचकाची वित्तीय नियोजनासाठी मेल येते तेव्हा या आíथक साक्षरतेचा वेलू गगनावरी गेला नाही तरी या वेलूने चांगले बाळसे धरल्याचे जाणवते.
म्हाप्रळमध्ये वैशंपायन आडनावाचे एक कुटुंब मागील तीन पिढय़ांपासून वास्तव्यास आहे. वैशंपायन कुटुंबात मागील तीन पिढय़ांपासून वैद्यकी सुरू आहे. या कुटुंबातील डॉ. प्रांजली (३५) व डॉ. पराग (३८) हे दाम्पत्यसुद्धा खासगी वैद्यकीय व्यवसायात असून या दाम्पत्यास तनिष्का (८) नावाची कन्या आहे. डॉ. पराग व डॉ. प्रांजली हे रत्नागिरी जिल्ह्य़ात वास्तव्याला असले तरी वैद्यकीय व्यवसाय रायगड जिल्ह्य़ातील माणगाव तालुक्यात गोरेगाव येथे करतात. तिथे त्यांनी एक सदनिका खरेदी केली असून मागील दोन महिन्यांपासून ही सदनिका भाडेतत्त्वावर दिली आहे. यांचे मुख्य घर म्हाप्रळ येथे असून गोरेगाव येथे सदनिकेसाठी घेतलेल्या कर्जापकी अडीच लाखांची कर्जफेड शिल्लक आहे. डॉ. पराग व डॉ. प्रांजली यांचे जीवन विम्याचे कवच प्रत्येकी २० लाख रुपयांचे आहे. त्यांच्या पीपीएफ व इतर गुंतवणुकांचा तपशील सोबत दिलेला आहे.

डॉ. पराग वैशंपायन यांनी विचारलेले नेमके प्रश्न व या प्रश्नांची उत्तरे अशी –
टाटा एआयजीमध्ये मागील सहा वर्षांपासून गुंतवणूक करत आहे. या गुंतवणुकीतून ९० हजाराच्या हप्त्यांवर फक्त ५,००० इतका नफा मिळत आहे. या गुंतवणुकीचे काय करावे?
– या सहा वष्रे जुन्या शेअर अथवा रोखे बाजारात गुंतवणूक असलेल्या (मार्केट िलक्ड) योजनेकडे दोन प्रकारे पाहता येते. कुठल्याही अशा प्रकारच्या योजनेचे शुल्क सुरुवातीच्या काळात जास्त असते. म्हणजे १०० रुपये हप्ता भरला तर ६५ रुपयांची, दुसऱ्या वर्षी ७५ तर तिसऱ्या वर्षी ८५ रुपयांची युनिट्सच विमाधारकास मिळतात. सहा वर्षांनंतर १०० रुपयांच्या हप्त्याला ९५ रुपयांची युनिट्स  विमाधारकाला मिळतात. म्हणून आता सर्व खर्च विमा कंपनीने वसूल केला असून १० वर्षांपर्यंत हप्ता भरणे योग्य ठरेल. दुसरा विचार असा की, जी गुंतवणूक बाजार सर्वोच्च स्थानी असतानासुद्धा जर नफा देत नसेल तर अधिक पसे गुंतविणे योग्य नव्हे. झाले तेवढे पुरे आहे. म्हणून हप्ते भरणे थांबविणे योग्य आहे. यापकी जो सल्ला पटेल तो आचरणात आणावा.

मुलीच्या शिक्षणासाठी सुरू केलेली एसआयपी आम्ही किती काळ सुरू ठेवावी किंवा कसे?
– डॉ. पराग यांच्याशी बोलणे झाले त्यानुसार सध्या दुसऱ्या यत्तेत शिकत असलेली तनिष्का पुढील शिक्षणासाठी बारावीनंतर पुणे अथवा मुंबई येथे जाईल. ती नक्की कुठल्या विद्या शाखेत शिक्षण घेईल हे आज ठरलेले नाही. विद्यमान खर्चानुसार वैद्यकीय शिक्षणासाठी शैक्षणिक शुल्क धरून खासगी वैद्यकीय १२ लाख, तर सरकारी महाविद्यालयात सात लाख खर्च होतात. ही फी वाढतच जाणार आहे. सुरू केलेल्या एसआयपी दीर्घकाळ सुरू ठेवायच्या आहेत. सर्वच खर्च एकदम होणार नाही. वैद्यकीय शिक्षणाचा हा खर्च साडेचार वर्षांत करावा लागणार आहे. खाली-वर जाणाऱ्या बाजाराचा गुंतवणुकीवर परिणाम होऊ नये म्हणून दोन वष्रे आधीपासून पुढील खर्चाची सोय म्हणून इक्विटी म्युच्युअल फंडातून पसे काढून रोखे (डेट) म्युच्युअल फंडात दोन वर्षांसाठी गुंतविणे श्रेयस्कर ठरेल. तरीसुद्धा हा निर्णय योग्यवेळी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घ्यावा.

आम्हा दोघांना (डॉ. पराग व डॉ. प्रांजली) नक्की किती विमाछत्राची गरज आहे?
– विमा कंपन्या एखाद्या व्यक्तीची ‘ह्य़ुमन लाइफ व्हॅल्यू’ निर्धारित करून त्या व्यक्तीला किती विमाछत्र देता येईल हे निश्चित करीत असतात. तुम्हाला अधिक विमाछत्राची आवश्यकता भासली तरी विमा कंपन्या तुम्हाला विमाछत्र किती देतील याचाही विचार करणे आवश्यक आहे. तुमच्या सर्व विमा योजना या पारंपरिक प्रकारात मोडणाऱ्या आहेत. म्हणून त्या महाग आहेत. डॉ. वैशंपायन यांचा एलआयसीवगळता इतर विमा कंपन्यांवर विश्वास नाही. या कंपन्या भविष्यात दुर्दैवाने दावा देण्याची वेळ आल्यास विम्याच्या दाव्याची पूर्तता करतीलच याची खात्री वाटत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही एलआयसीच्या नवीन ई-टर्म पॉलिसीचा विचार करू शकता. हा एलआयसीचा टर्म प्लॅन असून सर्वात स्वस्त आहे. म्हणून तुम्ही चाळीशी गाठायच्या आधी २१ वष्रे मुदतीचे २५ लाखाचे विमाछत्र घेणे इष्ट ठरेल.  

आम्हाला आमच्या निवृतीपश्चात आमच्या खर्चासाठी नक्की किती रकमेच्या निधीची आवश्यकता भासेल?
– वैशंपायन कुटुंबाची सध्या एकत्र कुटुंबपद्धती आहे. व डॉ. पराग हे कौटुंबिक खर्चासाठी त्यांचे योगदान म्हणून ठरावीक रक्कम देतात. पराग व प्रांजली हे त्यांच्या वयाच्या साठाव्या वर्षी सेवानिवृत्त होऊ इच्छितात. १० टक्के महागाईचा दर धरला तर १० व्या वर्षी घरखर्च आजच्या तुलनेत दुप्पट होईल. म्हणजे निवृत्तीमुळे त्यांचे उत्पन्न थांबेल त्यावेळी खर्च आजच्या तुलनेत चौपट झालेला असेल. म्हणजे त्यांच्या सेवानिवृतीच्या वेळी घरखर्च वार्षकि आठ लाखांवर गेलेला असेल. दुसऱ्या बाजूला व्याजाचे दर कमी झालेले असतील. पुढील २० वर्षांत सध्याच्या आठ टक्क्यांवरून व्याजाचे दर साडेपाच ते सहा टक्क्यांदरम्यान असतील. म्हणजे वार्षकि आठ लाख सहा टक्के दराने मिळविण्यासाठी एक कोटी ३५ लाख रुपये गुंतविणे आवश्यक आहे. हे झाले संख्यात्मक उत्तर. सर्वच प्रश्नांची उत्तरे केवळ संख्यात्मक पद्धतीने मिळवायची नसतात. बदलती जीवनशैली, कुटुंबातील सदस्यांची कमी अधिक होणारी संख्या यावर हे सारे ठरते. उदाहरणाने सांगायचे तर साधारण २००० साली आमच्या घरी दोन महिन्यातून एकदा ५००-६०० रुपये दूरध्वनीचे बिल येत असे. वरील पद्धतीने आमचा हा मासिक खर्च आजच्या घडीला १०००-१२०० रुपयांच्या वर जायला नको होता. परंतु मी व माझ्या मुलीसाठी इंटरनेट (एमटीएनएल ब्रॉडबँड + डोंगल), ज्येष्ठ सदस्यांसाठी लँडलाईन व आम्हा दोघांचे भ्रमणध्वनी मिळून हा खर्च आज अडीच हजारांच्या जवळपास आहे. तेव्हा बदलत्या जीवनशैलीनुसार घरखर्च अकल्पित कमी-अधिक होत असतो. म्हणून निवृत्तीपश्चात किती रक्कम आवश्यक आहे याचे नक्की उत्तर देणे कठीण आहे. परंतु वर उल्लेख केल्यानुसार निवृतीसमयी एक कोटीचा निधी आवश्यक वाटतो. सध्याचा तुमचा बचतीचा दर पाहता तुमचे आíथक आरोग्य उत्तम आहे असेच म्हणावे लागेल. म्हणून आíथक आरोग्याची चिंता करण्याचे काहीच कारण नाही.     

मी राष्ट्रीय पेन्शन योजनेत ‘ऑटो रिसेट’ या विकल्पाची निवड केली असल्याने दर वर्षी या योजनेतील कोणत्या व्यवस्थापकाने निधी व्यवस्थापन करावे, असा प्रश्न विचारला जातो. नक्की कोणाची निवड करावी?
राष्ट्रीय पेन्शन योजनेत कुठल्या वयाच्या सदस्याचा निधी कुठे व कसा गुंतवावा याचे नियम ठरलेले आहेत. यामुळे सर्वात उत्तम व शेवटच्या क्रमांकावर असलेल्या निधी व्यवस्थापकाच्या कामगिरीत खूप मोठा फरक नसतो. कारण नियम ठरलेले असल्याने सर्व निधी व्यवस्थापकांना आपले निधी व्यवस्थापनातील कौशल्य दाखविण्यास खूप मर्यादा आहेत. सर्व निधी व्यवस्थापकांची कामगिरी कमी अधिक फरकाने सारखीच असते. म्हणून कुठलाही व्यवस्थापक निवडला तरी खूप फरक पडत नाही.