डॉ. आशीष थत्ते
अपॉर्च्युनिटी कॉस्टला मराठीमध्ये पर्यायी परिव्यय किंवा संधीची किंमत असेदेखील म्हणू शकतो. मराठी अतिशय लवचीक भाषा असल्यामुळे या दोन्ही भाषांतरामधील अंतर वाचक समजू शकतात. व्यवस्थापनाच्या अर्थाप्रमाणे प्रत्येक परिव्ययाला पर्याय असतो तर सर्वसामान्यांच्या दृष्टीने प्रत्येक संधीची एक किंमत असते. कंपन्या एखादा पर्याय निवडतात विचार करतात की दुसरा पर्याय निवडला असता तर किती नफा झाला असता म्हणजे संभाव्य पर्याय न निवडल्यामुळे जर पैसे गुंतवले असते तर काय झाले असते? म्हणजे विचार करा हल्लीच्या काळात पुणे किंवा मुंबई इथे कंपन्या आपला कारखाना चालू करत नाहीत ते काही वेगळे पर्याय निवडतात. जसे की, महाराष्ट्रातील इतर काही ठिकाणांचा विचार केला जातो. तसेच एखादे नवीन मशीन विकत घ्यायचे असल्यास पैसे गुंतवण्याची योग्य वेळ आहे की अजून काही दिवस वाट बघावी, असा विचार नक्की केला जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कंपनीला एखादा पर्याय निवडण्यासाठी दुसरा पर्याय सोडावा लागतो, अशी अनेक उदाहरणे आहेत. मग त्याचा पर्यायी परिव्यय ठरवला जातो. याचे अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे संसाधनांची असणारी कमतरता. कुठल्याही उद्योजकाकडे अगणित पैसे असते तर कित्येक नवीन उद्योगधंदे चालू करता आले असते. मात्र प्रत्यक्षात अशी परिस्थिती नसते. यामुळे पर्यायी परिव्यय देखील दोन पद्धतीने ठरवला जातो. एखादा उद्योजक नवीन कारखाना सुरू करताना जुने काहीतरी तंत्रज्ञान घेऊन पर्यावरणाची हानी करण्यापेक्षा नवीन तंत्रज्ञानासाठी अधिक पैसे मोजून स्वत:चा फायदा नाही, मात्र पर्यावरणाचा फायदा बघतो. याच्या विरुद्ध विचारसरणीचे देखील लोक असतात. कारण त्यांना दुसरी पद्धत दिसते, ती म्हणजे परिव्यय कमी करणे.

जर उद्योजकांसमोर दोन पर्याय उपलब्ध असतील. एक पर्याय म्हणजे अधिक नफा मिळवून देणारा मात्र खूप जोखीम पत्करावी लागेल. तेव्हा तो उद्योजक कदाचित दुसरा पर्याय निवडेल ज्यात कमी जोखीम आणि नफा देखील कमी असेल. अशा वेळेला जी संधी गमावली शेवटी ती तुमची संधीची किंमत असते. म्हणजे संधीची किंमत आणि पर्यायी परिव्यय तसे हातात हात घालून जातात. फक्त तुम्हाला निवडायचे असते की कोणता पर्याय निवडावा आणि कोणता पर्याय सोडून द्यावा. दैनंदिन जीवनात देखील आपल्याला अशा अनेक संधी येतात. जेव्हा दोन पर्यायांमधील एखादा पर्याय निवडावा लागतो त्या सगळय़ा गोष्टींची चर्चा पुढील आठवडय़ात करूया. तुम्हाला एखादा अनुभव आला असेल तर नक्की सांगा.
लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेण्ट अकाउंटंट म्हणून कार्यरत / ashishpthatte@gmail.com@AshishThatte

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opportunity cost economist management companies amy
First published on: 15-08-2022 at 00:01 IST