scorecardresearch

करावे कर-समाधान : पॅन-आधार जोडणी आताही शक्य..

आर्थिक नियोजन करताना या बाबींचा विचार जरूर करावा. जेणेकरून कर वाचू शकतो. प्राप्तिकर कायद्यात ज्या मुदती दिलेल्या आहेत

प्रवीण देशपांडे – pravin3966@rediffmail.com

(लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत.)

प्राप्तिकर कायद्यात ज्या मुदती दिलेल्या आहेत, त्या गुंतवणुकीच्या असू देत किंवा अनुपालनाच्या असू देत, त्या पाळल्यास कर बचत शक्य आहे आणि दंड आणि व्याजापासूनसुद्धा सुटका होऊ शकते.

करदात्याने खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना काळजीपूर्वक केले पाहिजेत. दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर करदात्याला काही वजावटीसुद्धा घेता येतात आणि सवलतीच्या दरात कर भरता येतो. आर्थिक नियोजन करताना या बाबींचा विचार जरूर करावा. जेणेकरून कर वाचू शकतो. प्राप्तिकर कायद्यात ज्या मुदती दिलेल्या आहेत, त्या गुंतवणुकीच्या असू देत किंवा अनुपालनाच्या असू देत, त्या पाळल्यास कर बचत शक्य आहे आणि दंड आणि व्याजापासूनसुद्धा सुटका होऊ शकते.  

प्रश्न : मी २०२० मध्ये एक घर विकले या घराच्या विक्रीवर होणारा २५ लाख रुपयांचा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा वाचविण्यासाठी मी नवीन घर जून २०२१ मध्ये घेतले. या घराची खरेदी किंमत ४५ लाख रुपये आहे. काही कारणाने मला हे नवीन घर विकावे लागणार आहे. हे घर मी आता ५० लाख रुपयांना विकल्यास भांडवली नफा किती होईल आणि कराच्या काय तरतुदी आहेत?

विनीत खोपकर, नवी मुंबई

उत्तर : आपण जुने घर विकून झालेला दीर्घ मुदतीचा नफा वाचविण्यासाठी ‘कलम ५४’ नुसार नवीन घरात गुंतवणूक केली आणि नवीन घर जून २०२१ मध्ये खरेदी केले. या कलमानुसार हे नवीन घर (ज्याच्यावर कलम ५४ नुसार सवलत घेतली आहे) तीन वर्षांच्या कालावधीत विकल्यास ही सवलत मागे घेतली जाते. हे घर विकताना या घराच्या खरेदी मूल्यातून भांडवली नफ्याची सवलत (जी पूर्वी घेतली आहे) ती वजा होते. आपल्या बाबतीत भांडवली नफ्यासाठी नवीन घराचे खरेदी मूल्य हे २० लाख रुपये इतके असेल, म्हणजेच घराचे प्रत्यक्ष खरेदी मूल्य ४५ लाख रुपये वजा ‘कलम ५४’नुसार घेतलेली २५ लाख रुपये भांडवली नफ्याची वजावट. यानुसार नवीन घरावरील भांडवली नफा हा ३० लाख रुपये इतका असेल (विक्री मूल्य ५० लाख रुपये वजा खरेदी मूल्य २० लाख रुपये). आपण नवीन घर खरेदी केल्या तारखेपासून २४ महिन्यांत विकल्यामुळे होणारा ३० लाख रुपयांचा भांडवली नफा अल्पमुदतीचा असेल आणि करदात्याला त्याच्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे कर भरावा लागेल. आपण नवीन घर (ज्यावर ‘कलम ५४’नुसार वजावट घेतली आहे) तीन वर्षांनंतर विकले असते तर पूर्वी घेतलेली सवलत रद्द झाली नसती आणि करसुद्धा कमी भरावा लागला असता. 

प्रश्न : मी २०१२-१३ या आर्थिक वर्षांत एका मित्राकडून शेअर बाजारात एका सूचिबद्ध कंपनीचे समभाग २५,००० रुपयांना खरेदी केले. हे समभाग मी २०२१-२२ या आर्थिक वर्षांत शेअर बाजारामार्फत १ लाख रुपयांना विकले. मला या व्यवहारावर कर भरावा लागेल का? – एक वाचक

उत्तर : या विक्रीवर होणाऱ्या भांडवली नफ्यावर आपल्याला कर भरावा लागेल. हे समभाग आपण २०१२-१३ या वर्षांत खरेदी केले असल्यामुळे ही संपत्ती दीर्घ मुदतीची आहे. भांडवली नफ्यासाठी आपल्याला दोन पर्याय आहेत. एक म्हणजे महागाई निर्देशांकाचा (इंडेक्सेशन) फायदा न घेता १० टक्के दराने कर भरणे किंवा महागाई निर्देशांकाचा (इंडेक्सेशन) फायदा घेऊन २० टक्के कर भरणे. जो पर्याय आपल्याला फायदेशीर आहे तो आपण निवडू शकता. आपल्याला ‘कलम ११२ अ’च्या तरतुदी लागू होत नाहीत. कारण आपण समभागाची खरेदी खासगीरीत्या केली असल्यामुळे त्यावर शेअर उलाढाल कर (एसटीटी) भरला गेला नाही. आपण हेच समभाग शेअर बाजारामार्फत खरेदी केले असते तर आपल्याला ‘कलम ११२ अ’लागू झाले असते आणि १ लाख रुपयांपर्यंतच्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर कर भरावा लागला नसता.

प्रश्न : माझ्या वाढदिवसाला माझ्या मित्राने एक सोन्याची अंगठी भेट म्हणून दिली. मला यावर कर भरावा लागेल का? – आरती जोशी, मुंबई

उत्तर : मित्राकडून मिळालेली भेट ही करपात्र आहे की नाही हे त्याच्या मूल्यावरून ठरेल. या अंगठीचे मूल्य ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर संपूर्ण रक्कम ही आपल्या उत्पन्नात गणली जाईल. जर अंगठीचे मूल्य ५०,००० रुपयांपेक्षा कमी असेल तर यावर कर भरावा लागणार नाही. उदाहरणार्थ, या अंगठीचे मूल्य ६०,००० रुपये असेल तर ६०,००० रुपये आपल्या ‘इतर उत्पन्नात’ गणले जातील आणि त्यावर आपल्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे कर भरावा लागेल आणि या अंगठीचे मूल्य ४५,००० रुपये असेल तर संपूर्ण रक्कम करमुक्त आहे.

प्रश्न : मी माझा पॅनआधार क्रमांकाबरोबर ३१ मार्च २०२२ पर्यंत दिलेल्या मुदतीत जोडू शकले नाही. असे न केल्यास काय परिणाम होतील? – अनिता सावे, अंधेरी

उत्तर : ‘पॅन’ आधार क्रमांकाबरोबर जोडण्याची मुदत ३१ मार्च २०२२ होती, जी आता संपली आहे. अशी जोडणी न केलेल्या करदात्यांना नुकतीच, ३० मार्च २०२२ रोजी एका परिपत्रकाद्वारे काही सवलत दिल्या गेल्या आहेत. त्याचे परिणाम काय होतील याचीही माहिती या परिपत्रकात दर्शविली आहे. ज्या करदात्यांना १ जुलै २०१७ पूर्वी पॅन मिळाला असेल त्यांच्यासाठी वाढीव मुदतीपूर्वी म्हणजे ३१ मार्च २०२२ पूर्वी आधार क्रमांकाबरोबर जोडणी बंधनकारक होती. असे न केल्यास पॅन निष्क्रिय होण्याची तरतूद आहे.

पॅन निष्क्रिय झाल्यानंतर, प्राप्तिकर कायद्यानुसार करदात्याकडे पॅन नाही असेच समजले जाईल आणि त्याचे परिणाम करदात्याला भोगावे लागतील. यामध्ये विवरणपत्र दाखल करणे, करपरतावा मिळणे शक्य होणार नाही तसेच वाढीव दराने उद्गम कर (टीडीएस) कापला जाईल आणि बँक खाते चालू ठेवणे सुद्धा कठीण होईल. करदात्याचा त्रास कमी करण्यासाठी ३० जून २०२२ पर्यंत ५०० रुपये, अन्यथा १ हजार रुपयांचे अतिरिक्त शुल्क भरून, ३१ मार्च २०२३ पूर्वी ही जोडणी करता येणार आहे. तोपर्यंत या न जोडणीचे परिणाम करदात्याला भोगावे लागणार नाहीत. प्राप्तिकर खात्याने २०२१-२२ या आर्थिक वर्षांसाठी विवरणपत्राचे फॉर्म १ एप्रिल २०२२ रोजी १ ते ६ सूचित केले आहेत. निवासी भारतीय वैयक्तिक करदात्यांसाठी, ज्यांचे उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि त्यांच्या उत्पन्नात पगार, घरभाडे आणि व्याजाच्या उत्पन्नाचा समावेश आहे अशांसाठी फॉर्म १ असेल, इतर वैयक्तिक आणि हिंदू अविभक्त कुटुंब (एचयूएफ) करदाते, ज्यांच्या उत्पन्नात उद्योग-व्यवसायाच्या उत्पन्नाचा समावेश नाही अशांसाठी फॉर्म २, वैयक्तिक आणि हिंदू अविभक्त कुटुंब (एचयूएफ) करदाते, ज्यांच्या उत्पन्नात उद्योग-व्यवसायाच्या उत्पन्नाचा समावेश आहे अशांसाठी फॉर्म ३, वैयक्तिक, हिंदू अविभक्त कुटुंब (एचयूएफ), भागीदारी संस्था (एलएलपी सोडून), ज्यांचे उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि ते अनुमानित कराच्या तरतुदीनुसार उत्पन्न दाखवितात अशा करदात्यांसाठी फॉर्म सुगम ४, भागीदार संस्था, एलएलपी, वगैरेंसाठी फॉर्म ५ आणि कंपन्यांसाठी फॉर्म ६ हे फॉर्म सूचित केलेले आहेत.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pan aadhaar link still possible zws