विमा… सहज, सुलभ  : निवृत्तीपूर्वी ‘पेन्शन’चे नियोजन

निवृत्तीनंतरचा काळ किंवा वृद्धापकाळ सुखात जावा असे वाटत असेल तर त्याची तरतूद योग्य वयातच करायला हवी.

|| नीलेश साठे
पेन्शनसंबंधी नियोजनाचे वेध बहुतांशांना पन्नाशीनंतर लागतात. तेव्हा निवृत्ती दहा वर्षांवर आलेली असते. अर्थातच तेव्हा जितकी रक्कम पेन्शनसाठी काढली जाईल, तितकीच पेन्शन निवृत्तीनंतर मिळेल. निवृत्तीनंतरचे नियोजन जेवढे आधीपासून कराल, तितकी निवृत्ती सुखावह होईल.

निवृत्तीनंतरचा काळ किंवा वृद्धापकाळ सुखात जावा असे वाटत असेल तर त्याची तरतूद योग्य वयातच करायला हवी. ऐन उमेदीच्या काळात आपल्याला भानच राहत नाही की मलाही कधीतरी सेवानिवृत्त व्हायचे आहे. नोकरीची सुरुवातीची ५/१० वर्षे छानछोकीत जातात, पुढील १०/१५ वर्षे मुलांचे शिक्षण, त्यांच्या शाळा/कॉलेजची फी, घरकुल विकत घेण्यासाठी बचत करण्यात जातात आणि नंतर सेवानिवृत्तीपर्यंतचा काळ या घराचे हप्ते फेडण्यात जातो. सेवानिवृत्ती जशी जवळ येते, तेव्हा लक्षात येते की, या आर्थिक नियोजनात सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्याची तरतूद तर करायची राहूनच गेली. तोवर मुलांची लग्ने, मुलींची बाळंतपणे असे आवश्यक खर्च पुढे आलेले असतात. सेवानिवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या प्रॉव्हिडंड फंड, ग्रॅच्युइटी या एकरकमी मिळालेल्या रकमेवर पुढील आयुष्य कसे काढायचे ही मोठी विवंचना असते. सरासरी आयुर्मान झपाट्याने वाढत आहे तसेच वैद्यकीय उपचारांसाठीचे खर्चही वाढत आहेत, अशा स्थितीत आपल्यापुढे दोन पर्याय असतात, एक म्हणजे साठीनंतरही कुठेतरी छोटी- मोठी नोकरी करत राहणे आणि आर्थिक परावलंबित्व पुढे ढकलणे किंवा अवाजवीच नाही तर अत्यावश्यक खर्चांनासुद्धा कात्री लावून उर्वरित आयुष्य काटकसरीने जगणे.

सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य सुखात जाईल का हे साक्षात ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही. मात्र वृद्धापकाळी आर्थिक सुबत्ता असल्यास उर्वरित आयुष्य सुखात जाण्याची शक्यता अधिक असते. साहजिकच वृद्धापकाळी स्वावलंबी आयुष्य जगायचे असेल तर त्याची योजना खूप आधीपासून करावी लागते आणि ती योजना कसोशीने पूर्णत्वास देखील न्यावी लागते.

झाडाचे बीज पेरल्यानंतर फळे यायला जसा काही काळ जावा लागतो तसेच या पेन्शन योजनांचे असते. संत कबीर यांचा एक दोहा आहे :

धीरे, धीरे रे मना, धीरे सबकुछ होय

माली सींचे सौ घडा, ऋतु आये फल होय।

माळ्याने झाडाला शंभर घडे पाणी घातले तरी फळे ज्या ऋतूत येणार, तेव्हाच ती येणार, आधी नाही. गुंतवणुकीचेही असेच असते. वायफळ खर्च टाळून सातत्याने निवृत्ती-नियोजनानुसार गुंतवणूक केली तर वृद्धापकाळी बचतीची फळे चाखायला मिळतात.

पेन्शन किती लागेल?

महागाईचा दर, व्याजाचा दर आणि बचतीचा दर यावरून पेन्शन किती मिळेल हे गणित एक्सएल-शिटवर झटपट सुटते. ढोबळमानाने पेन्शनसाठी १०,००० रुपये मासिक बचत केल्यास, १० वर्षानंतर तेवढीच पेन्शन हयातभर मिळू शकते. (सोबतचा तक्ता पाहावा) २० वर्षे तेवढी बचत सातत्याने केल्यास ३०,००० रुपये मासिक पेन्शन मिळू शकते आणि पेन्शनरच्या मृत्यूनंतर पेन्शनच्या जवळपास १७० पट रक्कम नॉमिनीला मिळते. साधारणपणे २३ व्या वर्षी नोकरी लागली तरी पेन्शनची तरतूद लगेच केली जात नाही. पेन्शनचे वेध पन्नाशीनंतर लागतात. तेव्हा निवृत्ती दहा वर्षांवर आलेली असते. अर्थातच तेव्हा जितकी रक्कम पेन्शनसाठी काढली जाईल, तितकीच पेन्शन निवृत्तीनंतर मिळेल. निवृत्तीनंतरचे नियोजन जेवढे आधीपासून कराल, तितकी निवृत्ती सुखावह होईल.

विमा कंपन्यांच्या पेन्शनच्या योजना :

बहुतेक सर्व विमा कंपन्या पेन्शनच्या योजना विकतात. पेन्शनच्या विम्याच्या योजनांमधील गुंतवणूक प्राप्तिकर कायद्याच्या ‘कलम ८० सी’नुसार १,५०,००० रुपयांपर्यंत वजावटीस पात्र आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, व्याजदराची तसेच मासिक निवृत्तिवेतनाच्या दराची कुठलीही हमी कोणतीही विमा कंपनी आगाऊ देऊ शकत नाही. पेन्शन सुरू होण्यापूर्वी पॉलिसी रद्द करून या योजनेत जमा झालेली रक्कम परत घेता येते. पण एकदा का पेन्शन सुरू झाली की तहहयात पेन्शनची रक्कम मिळत राहते आणि जमा एकरकमी राशी ही केवळ नामित व्यक्तीलाच पेन्शनरच्या मृत्यूनंतर मिळते.

विमा कंपन्या पेन्शन योजनांत गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध करून देतात. जसे की,

१. एकदाच एकरकमी रक्कम भरा आणि लगेच पेन्शन घ्या (इमिजिएट अ‍ॅन्युइटी)

२. एकदाच एकरकमी रक्कम भरा आणि काही अवधीनंतर पेन्शन घ्या.

३. दरवर्षी रक्कम भरा आणि मुदतीनंतर पेन्शन घ्या. (डिफर्ड अ‍ॅन्युइटी)

४. काही वर्षेच रक्कम गुंतवा आणि वयाच्या ६०/६५ पासून तहहयात पेन्शन घ्या.

पेन्शनचे पर्यायही बरेच उपलब्ध आहेत जसे की,

१.      तहहयात केवळ पेन्शन

२.      तहहयात पेन्शन आणि मृत्यूनंतर जमा असलेली रक्कम नामित व्यक्तीला

३.      विमेदाराला हयातभर पेन्शन आणि विमेदाराच्या मृत्यूनंतर पत्नीस ५० टक्के पेन्शन

४.      दरवर्षी काही दराने वाढत जाणारी पेन्शन

एवढे पर्याय असले तरी भारतात दुसरा पर्याय बहुतेक पेन्शनर निवडतात.

पेन्शनची सोय करण्याचे इतरही काही मार्ग आहेत त्याविषयी पुढील लेखात.

शेवटी काय, प्रत्येकाचीच इच्छा असते की सेवानिवृतीनंतरचा काळ सुखाचा जावा, पण नुसती इच्छा असून उपयोग नाही. त्यासाठी कठोर आर्थिक नियोजन नोकरीच्या सुरुवातीपासून करणे आणि अनुशासनपूर्वक ती योजना राबवणे गरजेचे असते. असे केले तर वृद्धापकाळातील आर्थिक परावलंबित्व टळू शकेल.

ल्ल   लेखक विमा नियामक ‘इर्डा’चे माजी सदस्य आणि ‘एलआयसी’मध्ये कार्यकारी संचालक पदावर कार्यरत होते.

ई-मेल : nbsathe@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pension planning before retirement akp

ताज्या बातम्या