माझा पोर्टफोलियो : एकत्रीकरण फलदायी, भरीव वाढ दृश्यमान!

गेली अनेक वर्षे सातत्याने उत्तम कामगिरी करून दाखवणारी ही राष्ट्रीयीकृत बँक विविध प्रकारच्या सेवा पुरवते.

|| अजय वाळिंबे
गेली काही वर्षे राष्ट्रीयीकृत बँकाची कामगिरी निराशाजनक असली तरीही त्याला काही बँका अपवाद आहेत. आज सुचविलेली इंडियन बँक ही त्यातलीच एक. सरकारी धोरणांप्रमाणे तोट्यात असलेल्या काही बँका मोठ्या बँकात विलीन केल्या गेल्या. गेल्या वर्षी इंडियन बँकेतदेखील अलाहाबाद बँक विलीन करण्यात आली. हे विलीनीकरण झाल्यानंतर दक्षिण भारतात विस्तार असलेल्या इंडियन बँकेचे आता उत्तर भारतातही प्राबल्य वाढणार आहे. बँकेच्या देशांतर्गत ५,८०९ शाखा असून परदेशात तीन शाखा आहेत. बँकेची एकत्रीकरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

गेली अनेक वर्षे सातत्याने उत्तम कामगिरी करून दाखवणारी ही राष्ट्रीयीकृत बँक विविध प्रकारच्या सेवा पुरवते. आपल्या परकीय चलन सेवांसाठी बँकेच्या चेन्नई, मुंबई आणि बेंगळूरुयेथे विशेष शाखा/ कार्यालये आहेत. बँकेच्या एकूण कर्ज वितरणापैकी ५८ टक्के कर्ज वितरण हे रिटेल, एमएसएमई आणि कृषीसंबंधी असून ४२ टक्के वितरण हे कॉर्पोरेट क्षेत्रासाठी आहे. आपले भांडवल सक्षम करण्यासाठी बँकेने पहिल्या तिमाहीत वित्तीय संस्थांच्या गुंतवणूकदारांना १३२ रुपये अधिमूल्याने शेअर्सचे वितरण करून १,६५० कोटी रुपये उभे केले. बँकेच्या संचालक मंडळाने ४,००० कोटी रुपयांपर्यंत भांडवल सक्षमीकरणाचा ठराव मंजूर केला आहे.

यंदाच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी बँकेने उत्तम आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत बँकेने व्याज उत्पन्नात केवळ तीन टक्के वाढ दाखवून, ते ३,९९४ कोटी रुपयांवर गेले आहे, तर इतर उत्पन्नात मात्र ४१ टक्के वाढ होऊन ते १,८७७ कोटी रुपयांवर गेले आहे, तर बँकेच्या नक्त नफ्यात तब्बल २२० टक्के वाढ होऊन तो ३६९ कोटींवरून १,१८२ कोटींवर गेला आहे. बँकेच्या कर्ज वितरणात सहा टक्के वाढ झाली असून एकूण व्यवसायवृद्धीत नऊ टक्के वाढ झाली आहे. अलाहाबाद बँकेच्या विलीनीकरणानंतर बँकेच्या भौगोलिक क्षेत्रात वाढ झाली असून करोनापश्चात बँकेच्या कर्जवाटपात भरीव वाढीची अपेक्षा आहे. मोठ्या अधिमूल्याने सक्षम भागभांडवल उभारल्यामुळे आगामी कालावधीतदेखील बँकेच्या व्यवसायात तसेच उत्पन्नात वाढ होऊन इंडियन बँक उत्तम कामगिरी करत राहील अशी अपेक्षा आहे. बँकेने आपले नक्त अनुत्पादित कर्ज ३.४७ टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवले आहे. येत्या सहा महिन्यांत बँक विक्रीद्वारे आपली अनुत्पादित कर्जे कमी करू शकेल. एक मध्यमकालीन गुंतवणूक म्हणून इंडियन बँकेचा शेअर तुमच्या पोर्टफोलियोत ठेवायला हरकत नाही.

इंडियन बँक

(बीएसई कोड – ५३२८१४)

शुक्रवारचा बंद भाव : रु. १२४.९०

उच्चांक/ नीचांक : रु. १५७/५३

बाजार भांडवल : रु. १५,५५६ कोटी

भरणा झालेले भागभांडवल : रु. १,२४५.४४ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक         ७९.८६

परदेशी गुंतवणूकदार  २.९९

बँक/ म्यु. फंड/ सरकार        १०.४४

इतर/ जनता    ६.७१

संक्षिप्त विवरण

शेअर गट   : लार्ज कॅप

प्रवर्तक      : भारत सरकार

व्यवसाय क्षेत्र       : बँकिंग

पुस्तकी मूल्य        : रु. २८४.७५

दर्शनी मूल्य          : रु. १०/-

गतवर्षीचा लाभांश          : २०%

शेअर शिफारसीचे निकष

प्रति समभाग उत्पन्न:   रु. ३४.१९

पी/ई गुणोत्तर :   ४.०८

समग्र पी/ई गुणोत्तर :    १०.६

नक्त एनपीए (अनुत्पादित कर्ज) : ३.४७%

कासा गुणोत्तर : ४१%

भांडवली पर्याप्तता गुणोत्तर :    १५.९२

नेट इंटरेस्ट मार्जिन (निम) :      २.८५%

बीटा :   १.४

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Performance of the nationalized bank is disappointing indian bank government policies banks akp