डॉ. आशीष थत्ते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्यवस्थापनामध्ये रांगेवरदेखील सिद्धांत आहेत अर्थात यात गणिताचा विचार अधिक असतो. पण प्रत्येक वेळेला आकडेमोड करून सिद्धांत न मांडता, तो सारासार विचार करूनदेखील मांडला जातो. रांगेत जेव्हा निव्वळ वस्तू असतात तेव्हा गणिती आकडेमोड कामाला येऊ शकते. जेव्हा माणसे आपली लुडबुड सुरू करतात तेव्हा व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते. रांग केव्हा जन्माला येते? जेव्हा साधनसंपत्ती मर्यादित असते आणि त्याचे वापरकर्ते जास्त असतात. म्हणजे जेव्हा उत्पादनाची मागणी जास्त आहे आणि ते उत्पादन तयार करणारे यंत्र मात्र एकच आहे, तेव्हा रांग लागते. जेव्हा बँक किंवा पोस्ट ऑफिस वगैरे जिथे माणसांनाच राबता जास्त असतो तिथे रांग लागू नये म्हणून काळजी घ्यावी लागते. कुठलाही थांबा (सिग्नल) उभारताना जर किती वाहने येणार माहीत असेल तर गणिती आकडेमोडीने थांबण्याचा वेळ सहज कमीत कमी ठेवता आला असता. मात्र तसे होत नाही म्हणून काहीतरी अंदाज वापरून थांबा उभारावा लागतो. ग्राहक जेव्हा एखाद्या सेवेची मागणी करतो तेव्हा ती तात्काळ द्यावी लागते अन्यथा ग्राहक पुन्हा न येण्याचा धोका असतो. सेवा देणारी यंत्रणा सहजतेवर (रँडम) आधारित असते. काही एटीएममध्ये दोन किंवा अधिक मशीन असतात जेणेकरून जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणी सुरळीत सेवा देता येणे शक्य होते. मुंबईतील लोकल किंवा आता मेट्रोदेखील गर्दीच्या वेळेला जास्त पुनरावृत्तीने असते. मात्र दुपारी पुढील गाडीसाठी जास्त वेळ थांबावे लागते.

प्रत्येक वेळी रांग दिसतेच असे नाही, ती अदृश्यदेखील असते किंवा आभासीसुद्धा असते. तसेच सेवादेखील दिसतात किंवा आभासी असतात. जसे तिकीट काढणे म्हणजे पूर्वी जिकिरीचे काम असायचे. मात्र रेल्वेने तिकीट खिडकी चक्क आपल्या मोबाइलमध्येच दिल्यामुळे आपल्यापेक्षा त्यांचा जास्त फायदा झाला आहे. मुंबई ते दिल्ली दिवसाला सुमारे ६० विमाने उड्डाण भरतात म्हणजे तिकिटाची रांग दिसत नाही. पण अदृश्य असते आणि रांग असते म्हणून एवढी विमाने उड्डाण भरतात. व्यवस्थापनाचे प्रमेयदेखील सोपे आहे. रांग पूर्णपणे संपवणे तसे शक्य नाही, पण उद्योग वाढवण्यासाठी रांगेचा त्रास कमी करू शकतो. म्हणजे टोकन देणे, रांगेत उभे राहिल्यानंतर अजून किती वेळ लागेल याची माहिती देणे किंवा करमणूक करणे व त्रास सुसह्य करणे वगैरे. सुपर मार्केटच्या पैसे देण्याच्या रांगेत कित्येक छोटय़ा छोटय़ा वस्तू ठेवलेल्या असतात. जसे गोळय़ा बिस्किटे इत्यादी किंवा कमी वस्तू घेतल्यास वेगळी खिडकी आणि कमी वेळ उभे रांगेत राहावे लागते. ट्रॅफिक किंवा सिग्नलला छोटे छोटे विक्रेते कित्येक गोष्टी विकतात, त्यामध्ये रांगेची दाहकता कमी व्हावी म्हणून आपण त्या विकत घेतो. उत्पादनातदेखील असे खूप वेळा होते की, उत्पादनाची रांग लागते पण पूर्ण पॅकिंग होऊन वस्तू बाहेर पडत नाही तेव्हा रांगेची प्रमेये वापरून ही कोंडी सोडवली जाते. जसे तुकडीचा (बॅच) आकार कमी करणे इत्यादी. आता उत्तरार्धासाठी सात दिवस आभासी रांगेत उभे राहा! 

लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेण्ट अकाउंटंट म्हणून कार्यरत / ashishpthatte@gmail.com

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Queuing theory introduction to queuing theory guide to queuing theory
First published on: 13-06-2022 at 01:05 IST