सुधीर जोशी

जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि परदेशी गुंतवणूकदारांची साथ यामुळे सरलेल्या सप्ताहात बाजाराची सुरुवात उत्साही झाली. ऑक्टोबर महिन्याची वाहन विक्री, वस्तू व सेवा कराचे संकलन यांच्या सकारात्मक आकडेवारीने बाजाराचा जोश कायम होता. अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्ह बँकेच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला होता. मात्र पाऊण टक्क्याची व्याजदर वाढ गृहीत धरली होती आणि त्यामुळे दरवाढीच्या बातमीनंतर बाजाराने पुन्हा जोर धरला. व्यापक बाजारात सर्वत्र तेजीचे वातावरण राहिले. मात्र धातू क्षेत्र व सरकारी बँकांमधील तेजीने सर्वाचे विशेष लक्ष वेधले. भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी पुन्हा एकदा या वर्षांच्या उच्चांकी पातळीजवळ पोहोचले आहेत.

Cyber ​​fraud with woman,
शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावाखाली महिलेची सायबर फसवणूक
solapur, 1139 crores turnover, onion business in Solapur, during adverse times, onion profit solapur, solapur Agricultural Produce Market Committee, onion in solapur, farmer, marathi news,
प्रतिकूल काळातही सोलापुरात वर्षात कांदा व्यवहारातून ११३९ कोटींची उलाढाल
During the financial year the market value of 80 companies exceeded lakhs of crores
सरलेल्या आर्थिक वर्षात ८० कंपन्यांचे बाजारमूल्य लाख कोटींपुढे
Madhabi Puri Buch, SEBI, Indian market, GST, investment
गुंतवणूकदारांच्या वाढत्या आस्थेमुळे भांडवली बाजाराला उच्च मूल्यांकन – सेबी
  •   लार्सन अँड टुब्रो :

कंपनीने नुकत्याच जाहीर केलेल्या सप्टेंबर अखेरच्या तिमाही निकालात कंपनीचे उत्पन्न २३ टक्क्यांनी वाढून ४२ हजार कोटींवर पोहोचले आहे. तर या दरम्यान नफा २२.५ टक्क्यांनी वधारून २,२२९ कोटी रुपये नोंदण्यात आला. कंपनीची सरलेल्या तिमाहीतील कामगिरी दमदार राहिली आहे. मात्र त्याहूनही उत्साह वाढविणारी आकडेवारी म्हणजे कंपनीच्या एकूण मागण्यांमध्ये झालेली २३ टक्के वाढ आणि खासगी क्षेत्रातील मागण्यांमध्ये १० टक्के वाढ झाली आहे. खासगी क्षेत्रातील भांडवली गुंतवणुकीला सुरवात झाल्याचेच हे लक्षण आहे. परिणामी नजीकच्या काळात लार्सन अँड टुब्रोला नवी कंत्राटे मिळू शकतात. कंपनी येत्या काळात समभागांच्या पुनर्खरेदीचा (बायबॅक) विचार करण्याची शक्यता आहे. बाजाराच्या घसरणीमध्ये यात नव्या गुंतवणुकीचा विचार करता येईल.

  •   सुमिटोमो केमिकल्स :

कृषीपूरक रसायनांची उत्पादक असलेल्या सुमिटोमो केमिकल कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीतील विक्रीत २३ टक्के वाढ झाली तर नफ्यामध्ये ३० टक्के वाढ झाली आहे. कच्च्या मालातील किंमत वाढीमुळे नफ्याचे प्रमाण थोडे कमी झाले. कंपनीने नवीन उत्पादने बाजारात आणली आहेत. त्याचा परिणाम पुढील सहामाहीत जाणवू लागेल. जागतिक बाजारात कृषी उत्पादनांच्या किमतीत नुकतीच वाढ झाल्याचा फायदा कंपनीला मिळेल. पाऊस अखेरच्या महिन्यांत चांगला झाल्यामुळे रब्बी पिकांच्या शेतीमध्ये वाढ होईल. उत्तम व्यवस्थापन, कृषी रसायनांची मूल्यवर्धित उत्पादने, प्रवर्तक कंपनीच्या पाठबळावर कंपनीला कंत्राटी उत्पादनाच्या संधी, भारतीय बाजारपेठेवरील पकड आणि कंपनीची कर्ज मुक्त आर्थिक स्थिती कंपनीला उच्चांकी नफा कमावायला मदत करेल. ४७० ते ४९० रुपयांच्या पातळीवर कंपनीच्या समभागात केलेली गुंतवणूक चांगला फायदा मिळवून देऊ शकते.

  •   मारुती सुझुकी :

भारतातील सर्वात मोठय़ा वाहन कंपनीने अडीच कोटी वाहन निर्मितीचा टप्पा पार केला. गेली चाळीस वर्षे भारतीयांच्या गरजा ओळखून या कंपनीने बाजारात आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. नवीन वाहनांची जंत्री व सेमीकंडक्टर चीपचा अर्थात संवाहकाचा पुरवठा सुरळीत झाल्यामुळे वाहन उत्पादनातील प्रमुख अडथळा दूर झाला आहे. सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत कंपनीने तिच्या लौकिकाला साजेसे निकाल जाहीर केले. प्रवासी वाहनांच्या एकूण विक्रीत गेल्या वर्षांच्या तुलनेत ४६ टक्के वाढ झाली आहे. तर कंपनीचा नफा चौपटीने वाढून तो दोन हजार कोटींवर पोहोचला आहे. या वेगाने चालू वर्षांतील नफा आधीच्या वर्षांच्या दुप्पट होऊ शकतो. कंपनीकडे ग्राहकांनी चार लाख वाहनांसाठी नोंदणी केली आहे. कंपनीचे समभाग बाजारात पाच आकडी संख्येकडे कूच करतील अशी अपेक्षा आहे. सध्याचा ९२०० रुपयांच्या पातळीवर समभाग खरेदीची संधी आहे.

  •   एचडीएफसी :

भारतातील सर्वात मोठय़ा खासगी गृहकर्ज वितरण कंपनीचे सप्टेंबर अखेरच्या सहा महिन्यांचे निकाल सर्वच निकषांवर जोमदार राहिले आहेत. किरकोळ कर्जामधील ३६ टक्के वाढ, कर्जाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा या दोहोंच्या जोरावर नफा २० टक्क्याने वाढला आहे. भांडवली बाजारातील अस्थिरतेमुळे भांडवली नफा कमी झाला आहे. एचडीएफसी बँकेबरोबरच्या विलीनीकरणाचा फायदा वर्षभरात होणारच आहे. थोडी वाट पाहून २,४०० रुपयांच्या पातळीवरील खरेदी फायद्याची ठरेल.

सप्टेंबर महिन्यातील वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) उच्चांकी संकलन, औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक (पीएमआय) भारताच्या अर्थव्यवस्थेतील जोम दर्शवितात. लार्सन अँड टुब्रोसारख्या कंपन्यांकडे असलेल्या कंत्राटांमधील वाढ, अदानी पोर्टच्या मालवाहतुकीमधील वाढ, एचडीएफसीकडे गृहकर्जातील मागणीत दर्शविलेला आठ वर्षांतील उच्चांक, गेल्या महिन्यातील वाहन विक्रीचे आकडे, बँकांच्या कर्ज वितरणातील वाढ ही अर्थव्यवस्था वाढीची काही उदाहरणे आहेत. मात्र केवळ भारतामधील परिस्थिती पाहून सर्व आलबेल असे मानून चालणार नाही. विकसित देशांतील व्याजदर वाढ परदेशी गुंतवणुकीच्या बहिर्गमनाला निमंत्रण देऊ शकेल तसेच डॉलरचे वाढते मूल्य अर्थव्यवस्थेवरील ताण वाढवू शकते. त्यामुळे बाजार काही काळ असाच दोलायमान राहण्याची शक्यता आहे.

येत्या सप्ताहातील महत्त्वाच्या घडामोडी

  •   अ‍ॅफल इंडिया, बीएसई, डिव्हिज लॅब, एनडय़ुरन्स टेक्नॉलॉजी, ग्रीनप्लाय, इंडिया सिमेंट, केईसी इंटरनॅशनल, सुंदरम समूहातील कंपन्या, सिएट, बजाज इलेक्ट्रीकल, फाईन ऑरगॅनिक, गोदरेज समूहातील कंपन्या, ज्युबिलंट फूड, रुचिरा पेपर, दीपक नाइट्राइट, टाटा मोटर्स, बाटा, बर्जर पेंट, नीलकमल, स्टील अ‍ॅथॉरिटी, ट्रेंट,हिंडाल्को, पिडिलाइट या कंपन्या आपले सप्टेंबर अखेरचे तिमाही निकाल जाहीर करतील.