फंडाविषयक विवरण
फंड प्रकार : स्मॉल कॅप प्रकारच्या समभागात गुंतवणूक असलेला फंड
जोखीम प्रकार : समभाग गुंतवणूक असल्याने धोका अधिक (मुद्दलाची शाश्वती नाही)
गुंतवणूक : हा फंड समभाग गुंतवणूक करणारा फंड आहे. एस अ‍ॅण्ड पी बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स हा या फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे. गुंतवणूक केल्यापासून १२ महिन्यांच्या आत बाहेर पडल्यास २ टक्के, १२ ते २४ महिन्यांच्या आत बाहेर पडल्यास एक टक्का २४ महिन्यांच्या नंतर बाहेर पडल्यास कोणतेही निर्गमन शुल्क लागू होत नाही
फंड गंगाजळी : ३० ऑक्टोबर २०१५ रोजीच्या विवरण पत्रकानुसार १८४१ कोटी रुपये
निधी व्यवस्थापक. सुनील सिंघानिया हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. ते या फंड घराण्याचे मुख्य गुंतवणूकदार असून ते सनदी लेखापाल आहेत. त्यांना वीस वर्षांचा गुंतवणूक व्यवस्थापनाचा अनुभव आहे.
पर्याय : वृद्धी (ग्रोथ) व लाभांश (डिव्हिडंड)
अन्य माहिती : पसंतीच्या विक्रेत्याकडून किंवा फंड घराण्याच्या http://www.reliancemutual.com या संकेतस्थळाला भेट देऊन किंवा १८०० ३०० ११११ या नि:शुल्क क्रमांकावर फोन करून खरेदी करता येऊ शकेल.
वर्ष २०१४ मध्ये लार्ज कॅप प्रकारच्या समभागात गुंतवणूक करणाऱ्या फंडांनी अव्वल परतावा दिला आहे. २०१५ हे मिड कॅप फंडांचे होते. २०१६ मध्ये कोणते फंड अव्वल परतावा देतील हे जाणून घेण्यापूर्वी नोव्हेंबर महिन्यातील निर्देशांकांच्या कामगिरीकडे लक्ष देणे जरुरीचे आहे. मुख्य निर्देशांकाच्या तुलनेत जुल-ऑगस्ट महिन्यांपासून एस अ‍ॅण्ड पी बीएसई स्मॉल कॅप इंडेक्सची कामगिरी उजवी ठरली आहे. नोव्हेंबर महिन्यात सेन्सेक्स ऑक्टोबरच्या तुलनेत १.८८% घटला मिडकॅप निर्देशांकात ०.२४ टक्के तर स्मॉलकॅप निर्देशांकात २.८८% वाढ झाली. रिलायन्स स्मॉल कॅप फंडाचा एस अ‍ॅण्ड पी बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक हा संदर्भ निर्देशांक असून हाच संदर्भ निर्देशांक असलेल्या डीएसपी ब्लॅक रॉक मायक्रो कॅप, एसबीआय स्मॉल अ‍ॅण्ड मिड कॅप, सुंदरम ‘स्माइल’ व रिलायन्स स्मॉल कॅप या चार योजना गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहेत. रिलायन्स स्मॉल कॅप फंडाचा एक वर्ष, तीन वष्रे व पाच वष्रे मुदतीचा परताव्याचा दर अनुक्रमे १२.७३%, ३३.५७% व २२.०४% आहे. या फंडाचे जून ते सप्टेंबर या तिमाहीचे ‘क्रिसिल रेटिंग’ २ असे आहे. या रेटिंगचा अर्थ चांगला परताव्याचा दर (Good Performance) असा होतो. रिलायन्स स्मॉल कॅप फंड हा निधी व्यवस्थापकाचा सक्रिय सहभाग असलेला हा फंड आहे. या फंडांच्या गुंतवणूक परिघात १४० कोटी ते २८५० कोटी बाजारमूल्य असलेल्या शंभर कंपन्या असून विश्लेषक व निधी व्यवस्थापक या कंपन्यांचे वित्तीय परिणाम सतत अभ्यासत असतात व यापकी ५० ते ६० कंपन्यांच्या समभागांचा गुंतवणुकीत समावेश होतो. निधी व्यवस्थापकास समभाग गुंतवणूक एकूण गुंतवणुकीच्या ६५ ते ९५ टक्के दरम्यान राखण्याची मुभा असली तरी मागील आठ तिमाहीत सरासरी समभाग गुंतवणूक ९५ टक्क्यांहून अधिक राखण्यात आली आहे.
स्मॉल कॅप फंड हे गुंतवणुकीत जेवणातील मीठासारखे असतात. जेवणात मीठाचे प्रमाण मर्यादित असल्यास पदार्थाची लज्जत वाढते. मीठाचे प्रमाण जास्त झाल्यास पदार्थ टाकून द्यावा लागतो. वर उल्लेख केलेल्या जोखमीचा विचार करून आपल्या गुंतवणुकीत स्मॉल कॅप फंडांचे प्रमाण आधी निश्चित करून नंतर या फंडात गुंतवणुकीचा विचार करावा.

‘हाय रिस्क, हाय रिटर्न’ गणित..
स्मॉल कॅप फंड हे आíथक आवर्तनाच्या एका विशिष्ट टप्प्यातच चांगला परतावा देतात. बाजारात तेजी सुरू होऊन २४ महिन्यांहून अधिक काळ लोटल्यामुळे बाजारातील तेजी ओसरण्यास अजून १८ ते २४ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे असे मानावयास हरकत नसावी. या तेजीच्या अखेरच्या टप्प्यात स्मॉलकॅप फंड आजवरच्या त्यांच्या लौकिकाहून अधिक चांगला परतावा देतील, अशी अपेक्षा आहे. स्मॉल कॅप प्रकारचे समभागात वेगवेगळ्या जोखमीच्या अधीन राहून गुंतवणूक करावी लागते. यातील महत्त्वाची जोखीम म्हणजे या प्रकारच्या समभागात रोकड सुलभता नसते. विशेषत: बाजाराचा वरून खालच्या दिशेला प्रवास होत असताना रोकड सुलभता जवळजवळ नष्ट होते. खरेदी केलेले समभाग विकता येत नाहीत. या प्रकारच्या फंडातून एखादा मोठा गुंतवणूकदार बाहेर पडत असताना फंडाच्या एनएव्हीत मोठय़ा प्रमाणात घसरण होण्याची शक्यता असते.
स्मॉल कॅप फंड हे ‘हाय रिस्क, हाय रिटर्न’ प्रकारात मोडणारे असले तरी या प्रकारचे समभाग बहुप्रसवा (मल्टीबॅगर) समजले जातात. विद्यमान गुंतवणुकीत समावेश नसलेला परंतु या आधी गुंतवणूक केलेला कावेरी सीड्स व दीर्घ काळापासून गुंतवणुकीत असलेला अतुल लिमिटेड, टीव्हीएस मोटर्स यांनी गुंतवणूकदारांची अपेक्षा सार्थ ठरविली आहे. त्याच पठडीतील ‘इन्टलेक्ट डिझाइन’सारखी कंपनी पोलारिसचे विभाजन झाल्यापासून फंडाच्या गुंतवणुकीत असणे हे रिलायन्स स्मॉल कॅप फंडाच्या निधी व्यवस्थापकाचे कौशल्य दिसून येते.

mutualfund.arthvruttant@gmail.com