वैशिष्टय़े
वय:भारतीय नागरिक असलेल्या ६० आणि त्यावरील व्यक्ती. विवाहित व्यक्ती जोड नावावर अर्ज करू शकतात. त्यापकी एकाचे वय ६० वर्ष हवे आणि जोडीदाराचे वय ५५ पेक्षा खाली असू नये.
मालकीचे घर:त्या व्यक्तीच्या नावे भारतामध्ये स्वतच्या मालकीचे घर किंवा सदनिका असणे आवश्यक. ही योजना घेतेवेळी त्या घरावर किंवा सदनिकेवर कर्ज असता नये. त्या घराचे राहिलेले आयुष्य (Residual Life) कमीत कमी २० वर्ष असले पाहिजे.
वास्तव्य:ती व्यक्ती किंवा त्या व्यक्ती त्या घरात राहात असल्या पाहिजेत.
कर्जाची रकमेचे निकष: त्या व्यक्तीचे वय, त्या घराची किंमत आणि त्यावेळचे व्याजाचे प्रचलित दर यावर कर्जाची रक्कम ठरते.कर्ज-रकमेवरील मर्यादा: दरमहा पर्यायामध्ये जास्तीत जास्त रु.५०,००० दरमहा आणि एक रकमी पर्यायामध्ये घराच्या किमतीच्या ५०% . त्यापकी  १५ लाख रुपये वैद्यकीय खर्चासाठी आणि राहिलेली रक्कम दरमहा रकमेत विभागून जाते.
कर्जाचा कालावधी: जास्तीत जास्त २० वर्ष. या काळात घर तारण म्हणून ठेवले जाते. पण या काळात घराची मालकी त्या व्यक्तीकडेच राहते. कर्जाची मुदत संपल्यावर दरमहा मिळणारी रक्कम थांबते.
कर्जाची परतफेड:त्या व्यक्तीच्या निधनानंतर किंवा ती व्यक्ती कायमच्या वास्तव्यासाठी दुसरीकडे राहायला गेली तर होते. त्यावेळेला ते घर विकून कर्जाची रक्कम वसुल केली जाते. वसुल केलेल्या रकमेनंतर काही रक्कम जर राहिली तर ती वारसदारांना दिली जाते. कर्ज पती-पत्नी दोघांनी घेतले असेल आणि घराच्या मालकाचे निधन झाले आणि त्याची पत्नी त्या घरात राहात असेल तिला दरमहा रक्कम मिळत राहते व तिच्या मृत्युनंतर कर्जाची परतफेड होते.
करविषयक फायदे: कलम १०(४३) अंतर्गत त्या व्यक्तीला मिळणारी दरमहा किंवा एकरकमी रक्कम संपूर्णपणे करमुक्त मिळते. दुसरा फायदा म्हणजे कलम ४७ (१६) अंतर्गत या व्यवहारात तारण ठेवलेले घर हस्तांतरण म्हणून धरत नाहीत आणि त्यानुसार करपात्र भांडवली नफा धरला जात नाही.
उदाहरण
समजा ६५ वर्षांच्या व्यक्तीच्या नावे घर असून तो आíथक अडचणीमध्ये आहे. त्याच्या घराची सध्याची किंमत ५० लाख रुपये आहे. या व्यक्तीने रिव्हर्स मॉग्रेज कर्जाचा पर्याय निवडला आहे. कर्जाचा कालावधी १५ वर्ष निश्चित झाला आहे. म्हणजे त्याला त्याच्या वयाच्या ८० वर्षांपर्यंत दरमहा रकमेच्या स्वरुपात कर्ज मिळू शकेल. समजा ती रक्कम आहे रु.१०,०००/- म्हणजे पुढच्या १५ वर्षांत त्याला एकूण रक्कम मिळेल रुपये १८,००,०००. ही दरमहा १०,००० रुपये रक्कम प्राप्तीकर मुक्त असेल. ही व्यक्ती त्याच्या वयाच्या ७५ व्या वर्षी निधन पावली. समजा त्यावेळेला व्याजाची रक्कम धरून एकूण देय रक्कम झाली २६,००,००० रुपये आणि या व्यक्तीच्या निधनानंतर समजा त्या घराची किंमत त्यावेळी ६०,००,००० रुपये झाली आहे. अशा परिस्थितीत बँक या घराची विक्री करून २६,००,००० रुपये वसुल करेल आणि राहिलेले ३४,००,००० रुपये त्या व्यक्तीच्या वारसदाराला (बेनिफिशरी) देईल. समजा त्यांची पत्नी कर्ज घेतेवेळी सह-कर्जदार असेल तर पतीच्या निधनानंतर त्यांना पुढची पाच वर्ष दरमहा १०,००० रुपये मिळत राहतील. आणि त्यानंतर कर्जाची परतफेड होईल.