scorecardresearch

माझा पोर्टफोलियो : ‘पोलादी’ मागणी, योग्य समयी विस्ताराची योजना

जगभरात आरएचआय मॅग्नेसिटाचे १६ देशांत ३५ मोठे उत्पादन प्रकल्प असून, १०० हून अधिक देशांना उत्पादने पुरविली जातात.

अजय वाळिंबे

आरएचआय मॅग्नेसिटा म्हणजेच पूर्वीची ओरिएंट रिफ्रॅक्टरीज लिमिटेड. आरएचआय मॅग्नेसिटा या जागतिक बाजारपेठेत रिफ्रॅक्टरीज उत्पादनांत आघाडीवर असलेल्या बहुराष्ट्रीय कंपनीने गेल्या वर्षी ओरिएंट रिफ्रॅक्टरीजचा ७० टक्के हिस्सा ताब्यात घेतला. कंपनी विशेष रिफ्रॅक्टरी उत्पादने आणि प्रणालींची निर्मिती व विपणनाच्या व्यवसायात आहे. भारत आणि जागतिक स्तरावर स्टील उद्योगासाठी ही विशेष सेवा आहे. भारतातील स्पेशल रिफ्रॅक्टरीजसाठी आरएचआय मार्केट लीडर असून कंपनीचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उत्पादनांसाठी अनेक जागतिक ग्राहक आहेत. कंपनीच्या एकूण महसुलापैकी सुमारे ७४ टक्के रिफ्रॅक्टरीजच्या उत्पादनातून, तर २२ टक्के रिफ्रॅक्टरी वस्तूंच्या उलाढालीतून आहे. रिफ्रॅक्टरीजची मागणी प्रामुख्याने पोलाद उद्योगावर अवलंबून असते, जी एकूण विक्रीपैकी ७५ टक्के आहे. कंपनीचे भारतात भिवडी, राजस्थान आणि टांगी, ओडिशा येथे असे दोन प्रमुख उत्पादन प्रकल्प असून कंपनीने कटक, ओडिशा येथे असलेल्या मनीश्री रिफ्रॅक्टरीज अँड सिरॅमिक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकल्पाची काही मालमत्ता खरेदी केली. या प्रकल्पाची क्षमता १०,००० टन एमजीयू विटांची असून, ती १८,००० टनांपर्यंत वाढवली गेली आहे. तसेच आपला विस्तारीकरण कार्यक्रम राबवण्यासाठी कंपनीने स्टील उत्पादनांतील उपकरणांच्या निर्मितीसाठी इंटरमेटल इंजिनीयर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ताब्यात घेतली. कंपनीची पोलाद उद्योगाखेरीज सिमेंट, पेपर, फाउंड्री, ग्लास, वीजनिर्मिती इ. उद्योगांना पूरक अशी भरपूर उत्पादने असून ती सर्व ब्रॅण्डेड उत्पादने आहेत. जगभरात आरएचआय मॅग्नेसिटाचे १६ देशांत ३५ मोठे उत्पादन प्रकल्प असून, १०० हून अधिक देशांना उत्पादने पुरविली जातात.

डिसेंबर २०२१ अखेर संपलेल्या तिमाहीसाठी अपेक्षेप्रमाणे कंपनीने उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीने उलाढालीत ४२ टक्के वाढ नोंदवून, ती ५४५ कोटींवर गेली आहे, तर नक्त नफ्यात ७३ टक्के वाढ होऊन तो ७६ कोटींवर गेला आहे. तर नऊ महिन्यांसाठी संपलेल्या कालावधीत कंपनीने १,८१२ कोटींच्या (३९ टक्के वाढ) उलाढालीवर २१२ कोटींचा (६८ टक्के वाढ) निव्वळ नफा कमावला आहे. मार्च २०२२ अखेर संपुष्टात येणाऱ्या आर्थिक वर्षांचे निकाल लवकरच जाहीर होतील. मात्र या वर्षांकरितादेखील कंपनीची कामगिरी चांगलीच असेल अशी अपेक्षा आहे.

करोनापश्चात आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे पोलाद उद्योगाला उत्तम दिवस आले असून वाढत्या मागणीमुळे आगामी दोन वर्ष तरी या क्षेत्राला भरभराटीची जातील अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीचा शेअर सध्या ५२ आठवडय़ांच्या उच्चांकावर आहे. मात्र तरीही, उत्तम बहुराष्ट्रीय प्रवर्तक, कुठेलेही कर्ज नसलेली आणि केवळ ०.५ बिटा असलेली आरएचआय मॅग्नेसिटा एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून आकर्षक वाटते.

सध्याची शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण अवलंबिले जावे.

आरएचआय मॅग्नेसिटा इंडिया लिमिटेड

(बीएसई कोड – ५३४०७६)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ६५०/-

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक :

रु. ६६८ / २२०

बाजार भांडवल :

रु. १०,४६० कोटी

भरणा झालेले भागभांडवल : रु. १६.१० कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक             ७०.१९   

परदेशी गुंतवणूकदार      ०.३८   

बँक/ म्यु. फंड/ सरकार   ९.३२   

इतर/ जनता           २०.११

संक्षिप्त विवरण

* शेअर गट           :  स्मॉल कॅप

* प्रवर्तक         :      मॅग्नेसिटा एनव्ही, ऑस्ट्रिया

* व्यवसाय क्षेत्र :        रिफ्रॅक्टरीज

* पुस्तकी मूल्य :        रु. ५२.९

* दर्शनी मूल्य         :  रु. १/-

* गतवर्षीचा लाभांश :     २५० %

शेअर शिफारसीचे निकष

*  प्रति समभाग उत्पन्न :    रु. १३.१

*  पी/ई गुणोत्तर :            ४९.६ 

*  समग्र पी/ई गुणोत्तर :       २२.७

*  डेट इक्विटी गुणोत्तर :       ०.०७

*  इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :   ४६.१

*  रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड : २३.४

*  बीटा :                  ०.५ 

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rhi magnesita india ltd company profile zws

ताज्या बातम्या