भक्ती रसाळ

सरलेल्या आठवडय़ात रिझव्‍‌र्ह बँकेने क्रेडिट कार्डमार्फत होणाऱ्या खरेदीचे आकडे प्रसिद्ध केले. त्यातून क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खर्च करण्याचा कल वाढला असल्याचे निदर्शनास आले. एकूणच तीव्र महागाईच्या काळात देखील ग्राहकवर्ग विक्रमी खरेदी करत असल्याचे त्यातून निष्पन्न होते. क्रेडिट कार्डद्वारे वार्षिक खर्च सुमारे ११८ टक्के वेगाने वाढत असून आजपर्यंतच्या नोंदीनुसार, तो सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. पर्यटन आणि ऑनलाइन व्यवहारामुळे क्रेडिट कार्डचा अतिरिक्त वापर वाढला आहे. गृहोपयोगी वस्तू एकरकमी न घेता मासिक हप्तय़ांवर घेण्याची मानसिकता वाढते आहे.

गुंतवणूकदारांना काही मिनिटात, कमीत कमी कागदीप्रक्रियेद्वारे कर्जे, व्यक्तिगत कर्जे, सोने तारण कर्जे इंटरनेटच्या माध्यमातून अगदी कमी कालावधीत उपलब्ध होते आहे. करोना काळानंतर वाढलेली महागाई आणि गाठीला खेळता पैसा असावा अशा मानसिकतेमुळे कर्ज घेऊन वस्तू-सेवा उपभोग घेण्याची मानसिकता वाढते आहे. आर्थिक नियोजन करताना विमा, म्युच्युअल फंड यांचाच विचार करून गुंतवणूक करणे अपेक्षित नसते. गुंतवणूकदारांचे उत्पन्न कोणत्या मार्गाने खर्च होत आहे याचा विचार होणे तितकेच महत्त्वाचे आहे. मिळकतीच्या किती प्रमाणात मासिक कर्जाचे हप्ते असावेत याचे गुणोत्तर मांडावे लागते. ग्राहकाला कमीत कमी व्याजदराद्वारे मासिक हप्ते फेडण्यास प्रवृत्त करणे गरजेचे ठरते.

सामान्य गुंतवणूकदार वर्ग गृहकर्जे, वाहनकर्जे, प्रासंगिक व्यक्तिगत कर्जे, विमा योजनांवरील कर्जे, तसेच म्युच्युअल फंड आणि भाग भांडवल गुंतवणुकांवरही कर्जे घेताना आढळतो. प्रत्येक कर्जाच्या मागील आर्थिक निकड वेगवेगळी असते. व्याजदर आणि मुदतही कर्जाच्या प्रकारानुसार बदलते.

कर्जाची रक्कम आणि ग्राहकांचे उत्पन्न याचे सुसूत्रीकरण करणे गरजेचे ठरते. बऱ्याच ग्रहकवर्गाने उत्तमी बचत गाठीशी असताना देखील मासिक हप्तय़ांची बांधिलकी पत्करलेली आढळते. बदलत्या व्याजदरांमुळे मासिक हप्तय़ात बदल न होता कर्जाची मुदत वाढते. मासिक हप्ता न बदलल्याने व्याजदरांचा वाढीव ताण जाणवत नाही. मात्र वाढीव मुदतकाळामुळे अतिरिक्त बोझा आर्थिकदृष्टय़ा गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान करतो. लवकरात लवकर कर्जमुक्त होणे आणि मासिक हातात फेडण्यापेक्षा गुंतविला जाणे हिताचे आहे. ग्राहकाच्या मिळकतीचा कमाल तीस टक्के हिस्सा कर्जफेडीसाठी वापरला जाणे अपेक्षित आहे. असे असून देखील कोणतेही सबळ कारण नसताना महागडी कर्जे घेऊन जीवनशैली सुधारण्यासाठी धडपड करताना ग्राहकवर्ग दिसतो आहे. क्रेडिट कार्डवरील विक्रमी खर्चाचे आकडे हाच धोकादायक कल दर्शवतो आहे. म्युच्युअल फंडातील शिस्तबद्ध गुंतवणूक पर्याय असलेल्या एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी प्रथम स्वत:च्या मासिक खर्चातील अनाठायी खर्चाचा आढावा घेणे गरजेचे आहे. कर्जाद्वारे होणारा खर्च आटोक्यात आणल्यानंतर गुंतवणूक करणे योग्य आहे. किमान १० ते १५ टक्के घरातील व्यक्तिगत कर्जे फेडताना म्युच्युअल फंडाद्वारे १० ते १२ टक्के गुंतवणूक करणे शहाणपणाचे नाही.

१) व्याजदरानुसार कर्जाची परतफेड करण्याची आखणी –

सर्वात प्रथम महागडे कर्ज म्हणजेच ज्या कर्जावर सर्वाधिक व्याजदर आकारले जाते असे व्यक्तिगत क्रेडिट कार्ड कर्ज फेडावे. अत्यावश्यक आणि अनावश्यक गरज लक्षात घेऊन क्रमवारीमुसार कर्जमुक्त होण्यासाठी योजना तयार करणे.

२) मुदतपूर्व गृहकर्जे आणि वाहन कर्जे फेडण्याकरता योजना-

मासिक गुंतवणुकीद्वारे मुदतपूर्व कर्जफेडीसाठी समांतर गुंतवणूक करून कर्जमुक्त होण्याची तजवीज करणे.

३) व्याजदरानुसार कर्जाची किंमत नोंदवणे.

आपण फेडत असलेल्या कर्जाची किती किंमत मोजत आहोत हे निश्चितपणे ग्राहकास ठाऊक नसल्याने मोठा ग्राहकवर्ग मासिक मिळकतीची तडजोड करत असतो. त्यामुळे एकूण व्याजापोटी किती मिळकत खर्च होत आहे याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

४) मासिक हप्तय़ाचे मिळकतीशी गुणोत्तर आपल्या मिळकतीचा किती भाग कर्जे फेडण्यात खर्च करणे योग्य आहे याचे नियम पाळणे गरजेचे आहे. वाहनकर्ज मिळकतीच्या १५ टक्के, गृहकर्ज कमाल ४०टक्के असावे.

५) कर्जे मिळण्याची सुविधा आहे म्हणून अनावश्यक कर्जे काढू नयेत. गृहोपयोगी वस्तू शक्यतो एकरकमी घेणे हिताचे असते.

६) कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेची गुंतवणूक सध्याच्या अत्यंत अस्थिर काळात कर्जे घेऊन गुंतवणूक करणे धोक्याचे ठरते. कर्जाचे व्यवस्थापन गुंतवणूक करण्याइतकेच महत्त्वाचे आहे. मासिक हप्त्यांची बचत करून ती बचतयोग्य पर्यायांनी वृद्धिंगत करणे समंजसपणाचे ठरते..