बाजाराचा   तंत्र-कल : पाहिले न मी तुला…

अपेक्षेनुरूप सरलेल्या सप्ताहात निर्देशांकावरील तेजीची चाल थोडी मंदावली.

|| आशीष ठाकूर
गेल्या तीन महिन्यांत निफ्टी निर्देशांकाने मंदीला आणि मंदीने निफ्टीला असे दोहोंनी एकमेकांना पाहिलेले नाही. ‘पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले’ अशी ही परिस्थिती आहे. या तेजीतच कधी कुठे मन वेडे गुंतले ते कळलेच नाही. या वेड्या मनाला सावध करायचा प्रयत्न या स्तंभातील गेल्या लेखात केला होता. अपेक्षेनुरूप सरलेल्या सप्ताहात निर्देशांकावरील तेजीची चाल थोडी मंदावली. या पार्श्वभूमीवर या आठवड्याच्या वाटचालीकडे वळू या.

गुरुवारचा बंद भाव :

सेन्सेक्स: ५८,३०५.०७

निफ्टी : १७,३६९.२५

आज आपण निफ्टी निर्देशांकाच्या वाटचालीचा परीघ पुन्हा रेखाटण्याचा प्रयत्न करू या. निफ्टी निर्देशांकाने आपल्या भोवती ३०० अंशांचा परीघ निर्माण केला आहे. जसे की… १६,९००-१७,२००-१७,५०० यात १७,२०० हा स्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर असेल. या स्तरावर बारीक नजर ठेवून निफ्टीची पुढील वाटचाल रेखाटू या. आगामी दिवसांत येणाऱ्या हलक्याशा घसरणीत निफ्टी निर्देशांकावर १७,२०० चा स्तर राखला गेल्यास वरचे लक्ष्य हे १७,५००, १७,८००, १८,००० असेल. अन्यथा १७,२०० चा स्तर राखण्यास निर्देशांक अपयशी ठरल्यास निफ्टी निर्देशांक १६,९०० पर्यंत खाली घसरू शकतो. निफ्टी निर्देशांक १६,९००-१६,८०० चा स्तर राखण्यास यशस्वी ठरल्यास तेजीचे अंतिम चरण सुरू होऊन निफ्टी निर्देशांकांचे वरचे लक्ष्य १७,५००, १७,८०० ते १८,००० असे असेल.

चिकित्सा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ या संकल्पनेची

‘निर्देशांक उच्चांकावर असताना त्यात आपली कंपनी ही त्या क्षेत्रातील वलयांकित, ताराकिंत प्रथितयश कंपनी. त्यामुळे तिमाही वित्तीय निकाल खराब आल्यास समभागाचा भाव थोडाच खाली येणार?’ अशी धारणा बाळगणाऱ्या गुंतवणूकदारांना सिप्ला, मारुती, कोल इंडिया या समभागांनी दाखविलेल्या वर्तनाने धक्का दिला आहे.

आता याच्या अगदी विरूद्ध ती कंपनी त्या क्षेत्रातील गुणवत्तेचा मापदंड जोपासणारी, त्या क्षेत्रात गुंतवणूक करायचे ठरल्यावर या कंपन्यांची नावे अग्रक्रमांकावर – पहिल्या तीनांत येणारी. त्यात या कंपनींचा तिमाही निकाल अतिशय चांगला आला व त्यात नितांत सुंदर तेजीची भर… अशा वेळेला निकालापश्चात समभागाच्या भावात नमूद केलेल्या वरच्या लक्ष्यापलीकडे भरभक्कम अशी वाढ झाली तर काय हरकत? पण या ‘स्थितप्रज्ञ कंपन्या’ तेजीने हुरळून जाणार नाहीत की मंदीने खचून जाणार नाहीत. जसे की, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, आयसीआयसीआय बँक,अ‍ॅक्सिस बँक, अंबुजा सिमेंट. यातील विलक्षण योगायोग म्हणजे वरील चारही कंपन्यांचे निकालपूर्व विश्लेषण हे या स्तंभातील १९ जुलैच्या ‘असावं की नसावं?’ या लेखात मांडले होते.

या स्तंभातील १९ जुलैच्या लेखात लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो या समभागाचे निकालपूर्व विश्लेषण केलेले. त्या समयी समभागाचा बाजारभाव १,६१९ रुपये होता. निकालापश्चात महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर हा १,५८० रुपये होता. निकालापश्चात लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोच्या समभागाने महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखत १,७०० रुपयांचे लेखात नमूद केलेले वरचे लक्ष्य अचूकपणे १ सप्टेंबरला १,७१८ रुपयांचा उच्चांक मारत साध्य केले. अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांना पाच टक्क्यांचा परतावा मिळाला. लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो समभागाचा ९ सप्टेंबरचा बंद भाव १,६७० रुपये होता.

२) बँकिंग क्षेत्रातील अग्रेसर अशा आयसीआयसीआय बँकेच्या समभागाचे निकालपूर्व विश्लेषण याच लेखात केलेले. त्या समयी समभागाचा बाजारभाव ६६० रुपये होता. महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर हा ६५० रुपये होता. निकालापश्चात आयसीआयसीआय बँकेच्या समभागाने महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखत ७०० रुपयांचे लेखात नमूद केलेले प्रथम वरचे लक्ष्य ४ ऑगस्टला ७१७ रुपयांचा उच्चांक मारत साध्य केले. अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांनी सहा टक्यांचा परतावा मिळविला. आयसीआयसीआय बँकेच्या समभागाचा ९ सप्टेंबरचा बंद भाव ७२० रुपये होता.

३) सिमेंट क्षेत्रातील दिग्गज अशा अंबुजा सिमेंट या समभागाचे निकालपूर्व विश्लेषणही १९ जुलैच्या लेखात केले होते. त्या समयी समभागाचा बाजारभाव ३८३ रुपये होता. निकालापश्चात महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर हा ३६० रुपये होता. निकालापश्चात अंबुजा सिमेंट समभागाने महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखत ४२५ रुपयांचे लेखात नमूद केलेले प्रथम वरचे लक्ष्य ४ ऑगस्टला ४२७ चा उच्चांक मारत साध्य केले. अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांनी १० टक्क्यांचा परतावा मिळविला. अंबुजा सिमेंटचा ९ सप्टेंबरचा बंद भाव ४३८ रुपये होता.  (क्रमश:)

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sensex nifty index share market akp 94