सुधीर जोशी

निर्देशांकाचा साठ हजारांचा टप्पा ही नवी सुरुवात की त्याने गाठलेले टोक मानायचे? सामान्य गुंतवणूकदारांच्या दृष्टीने हा कळीचा प्रश्न. पण निर्देशांकाच्या आकडय़ाला ध्यानात घ्यावे काय? त्या पल्याड उपलब्ध संधी आणि अवकाशाचा मांडलेला हा पट..

गेल्या सप्ताहातील बाजाराच्या घडामोडींना एकूणच रोमांचकारी म्हणावे लागेल. पहिल्याच दिवशी चीनमधील घटनांचे परिणाम भारतीय बाजारावर उमटले. मोठय़ा खासगी कंपन्यांवर निर्बंध लादण्याच्या चीनच्या नव्या धोरणामुळे तेथील बडी बांधकाम व्यवसायातील कंपनी एव्हरग्रांड आर्थिक संकटात सापडली. त्याचे परिणाम जागतिक बँकिंग क्षेत्रावर होण्याच्या भीतीने सर्वच जागतिक बाजारांना ग्रासले. बांधकाम व्यवसायात मंदी येण्याच्या शक्यतेने चीनमध्ये लोह खनिजाच्या भावातही मोठी घसरण झाली. परिणामी, भारतातील पोलाद कंपन्यांच्या समभागांमध्ये झालेल्या घसरणीने बाजाराच्या पडझडीला मोठा हातभार लावला. पण नंतर बुधवारी झालेल्या अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या बैठकीमध्ये अर्थप्रोत्साहन मागे घेण्यासाठी व व्याज दर वाढविण्यास पुढील वर्ष उजाडेल असे संकेत मिळाले व बाजाराची दौड पुन्हा सुरू होऊन सेन्सेक्सचे साठ हजाराचे स्वप्न प्रत्यक्षात आले.

झी एंटरटेन्मेंट लिमिटेड (झील) व सोनी फिक्चर्सचे विलीनीकरण ही आणखी एक घटना बाजारातील मीडिया क्षेत्रातील कंपन्यांना चालना देऊन गेली. हे विलीनीकरण परस्पर पूरक असून झील या बाजारातील सूचिबद्ध कंपनीला आणखी सबळ बनविणार आहे. कंपनीच्या समभागाचा गेल्या काही वर्षांतील घसरता आलेख वर जाऊ लागला आहे. थोडय़ा घसरणीची वाट पाहून मीडिया क्षेत्रातील सहभागासाठी यात गुंतवणूक करायला हरकत नाही. विमान वाहतुकीवरील निर्बंध कमी होण्याच्या व पर्यटन क्षेत्राबाबत अनुकूल निर्णय घेण्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेमुळे हॉटेल व पर्यटन क्षेत्रातील समभागही गतिमान झाले. त्याचबरोबर गेल्या दोन आठवडय़ांत तेजीमध्ये आलेले क्षेत्र म्हणजे बांधकाम क्षेत्र. नव्या घरांना वाढती मागणी येत असल्याचे बाजारात संकेत आहेत. गोदरेज प्रॉपर्टीज, प्रेस्टीज, ओबेरॉय रिअ‍ॅल्टीसारखे समभाग नव्या जोमाने वर जाऊ लागले आहेत. घरांबरोबर नूतनीकरण व सुशोभीकरण यावरही लोक खर्च करीत आहेत. त्यामुळे सोमानी सिरॅमिक्स, ओरिएन्ट इलेक्ट्रिक, बजाज इलेक्ट्रिकसारख्या समभागांमध्ये गुंतवणूक करून या लाटेचा फायदा घेता येईल. बाजारातील तेजीमध्ये सध्या सिमेंट कंपन्यांचा सहभाग दिसत नाही. पावसाळ्यातील घटलेली मागणी व किमतींमधील घट याला कारणीभूत आहे. पण बांधकाम व्यवसायातील वाढती मागणी व सरकारी पायाभूत सुविधांच्या योजनांमुळे या क्षेत्राकडे परत गुंतवणूकदार वळतील. सध्याच्या भावात एसीसी व अल्ट्राटेक सिमेंट आकर्षक वाटतात.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी पीव्हीसी पाइप उत्पादक आहे. कंपनीच्या उत्पादन श्रेणीमध्ये मुख्यत: शेती आणि पिण्यायोग्य पाणीपुरवठय़ासाठी लागणारे पीव्हीसी पाइप्स आणि फिटिंग्ज तसेच रेझीन्सचा समावेश आहे. घरगुती उपयोगाच्या पाइप्सचेदेखील कंपनी उत्पादन करते. गेल्या दोन तिमाहीत कंपनीच्या विक्रीमध्ये भरघोस वाढ झाली होती. कंपनीचे लाभांश धोरण उदारमतवादी आहे. शेतकी उत्पादनातील समाधानकारक प्रगती, पिण्याच्या पाणी योजनांवरील भर, नवीन घरे व त्यांचे नूतनीकरण यावर असलेला लोकांचा वाढता कल या कंपनीतील दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी प्रेरक आहे.

करोनाचे संकट कमी होत असल्यामुळे अर्थव्यवस्था पुन्हा जोम धरत आहे. रोजगाराचे प्रमाण व वेतनवाढीचे प्रमाण तसे निर्देश देत आहेत. चांगल्या पावसाळ्यानंतर रब्बी पिकांचे उत्पन्न व खरिपाची पेरणी जोरात होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या हातातील पैसा वाढून ते गेल्या दीड वर्षांत न जमलेली खरेदी सुरू करतील अशी अपेक्षा आहे. ग्राहकांचा ओढा परत थोडय़ा महाग पण गुणवत्तापूर्ण वस्तूंकडे वळेल. याचा फायदा ग्राहकोपभोग्य वस्तूंच्या उत्पादकांना होईल. हिंदुस्तान युनिलिव्हर व ब्रिटानियासारख्या मोठय़ा कंपन्या याचा फायदा घेऊ शकतील. नुकत्याच आलेल्या तेजीनंतर ब्रिटानियाचा समभाग पुन्हा चार हजारच्या आसपास स्थिर होतो आहे. कंपनीने उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत व कंपनीची नवीन उत्पादने पारले कंपनीशी बाजारात मोठी स्पर्धा करीत आहेत. गेल्या दोन वर्षांत कंपनीने वितरण व्यवस्था चोख करून उत्पादन क्षमतेत मोठी वाढ केली आहे. भागधारकांना परतावादेखील चांगला दिला आहे. तिच्यासाठी डोकेदुखीचा विषय बनलेल्या, तिच्या समूह कंपन्यांतील ठेवीदेखील ४० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. वर्षभराच्या मुदतीसाठी सध्याच्या भावात ब्रिटानिया खरेदीची संधी आहे.

तीन महिन्यांपूर्वी सुचविलेल्या निओजेन केमिकल्सने ५० टक्के नफा दिला आहे. कंपनीच्या दहेज येथील कारखान्याचा पहिला टप्पा कार्यरत झाला आहे. कंपनीच्या समभागात अजूनही खरेदीसाठी वाव आहे.

बाजाराच्या थोडक्या घसरणीत खरेदीची लाट येण्याचा अनुभव या सप्ताहात परत एकदा आला. भारतीय बाजारावर जागतिक गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. बाजारात होणारी वाढ ही सर्वव्यापी आहे. रोकड सुलभता कमी होण्याची किंवा महागाई अथवा व्याज दर वाढण्याची सध्या शक्यता कमी दिसते. तसेच कंपन्यांची नफाक्षमतादेखील वाढली आहे. त्यामुळे साठ हजारांचा टप्पा ही तर आता नवी सुरुवात आहे.

sudhirjoshi23@gmail.com