बाजाराचा तंत्र-कल : ओळखून आहे सारे तुझे बहाणे!

सरलेल्या सप्ताहातील सोमवारी सेन्सेक्सने ४९,६१७ आणि निफ्टीने १४,९६६ चा उच्चांक नोंदवला.

संग्रहित छायाचित्र

आशीष ठाकूर

करोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता, पश्चिम बंगालमधील सत्ता भाजपला हस्तगत करण्यात आलेले अपयश अशा वातावरणात निफ्टी निर्देशांकावरील १४,००० चा स्तर आज तुटतो की उद्या असे वाटत होते. असे वाटत असतानाच १४,००० कडे ढुंकूनही न पाहता १४,४०० च्या स्तरावर मोहक गिरकी घेत, या स्तरावर निफ्टीने आपल्या शिडात तेजीची हवा भरली. पुढे अल्पावधीत १५,००० चे लक्ष्यही साध्य केले. १४,४०० ते १५,००० पर्यंतच्या वाटचालीत निफ्टी निर्देशांकाचा आविर्भाव, देहबोली मात्र १५,३०० चा स्तर हा ‘हाकेच्या अंतरावर आहे’ असा होता. तथापि, निफ्टीच्या १५,३०० च्या देहबोलीला भुलून आणि स्वप्नावर आश्वस्त होऊन तेव्हा खरेदी केली व त्यानंतर निफ्टी १४,७०० पर्यंत घसरल्याने फसगत झाल्यावर, निफ्टीला ‘लब्बाड कुठली’ म्हणणारे एका बाजूला, तर जोपर्यंत १५,००० चा स्तर पार होत नाही तोपर्यंत या मोहक गिरक्यांवर न भाळता ‘ओळखून आहे सारे तुझे बहाणे’ म्हणणारे दुसऱ्या बाजूला. गुंतवणूकदारांचे असे तट बाजारात असतातच, तसे या वेळीही होते.

निफ्टी निर्देशांकाच्या १४,४०० ते १५,००० च्या वाटचालीला ‘लब्बाड कुठली’ म्हणायचे की ‘ओळखून आहे सारे तुझे बहाणे’ म्हणायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न. या पाश्र्वभूमीवर या आठवड्याच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव : सेन्सेक्स: ४८,७३२.५५ / निफ्टी: १४,६७७.८०

गेल्या लेखात सूचित केल्याप्रमाणे, निर्देशांकांच्या, म्हणजे सेन्सेक्सवर ४८,९०० आणि निफ्टीवर १४,७०० च्या स्तराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा स्तर राखल्यास निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष्य सेन्सेक्सवर ५०,००० आणि निफ्टीवर १५,००० असे असेल. वरील वाक्य काळाच्या कसोटीवर उतरले का? सरलेल्या सप्ताहातील सोमवारी सेन्सेक्सने ४९,६१७ आणि निफ्टीने १४,९६६ चा उच्चांक नोंदवला. जो अगोदर नमूद केलेल्या निर्देशांकाच्या वरच्या लक्ष्यासमीप आहे. उच्चांक नोंदवून जी घसरण सुरू झाली त्या घसरणीत सेन्सेक्स ४८,९०० आणि निफ्टी १४,७०० च्या स्तरावर स्थिरावला. अशा रीतीने निर्देशांकांनी नमूद केलेल्या परिघातच आपले तेजी-मंदीचे आवर्तन पूर्ण केले आणि उपरोक्त स्तरांचे अनन्यसाधारण महत्त्व निर्देशांकांनी आपल्या वाटचालीतून अधोरेखित केले. तेजीच्या दृष्टिकोनातून सेन्सेक्स ४८,९०० आणि निफ्टी निर्देशांक १४,७०० च्या स्तरावर टिकल्यास निर्देशांकांचे वरच लक्ष्य हे सेन्सेक्सवर ५०,००० ते ५१,००० आणि निफ्टीवर १५,००० ते १५,३०० असे असेल. मात्र सेन्सेक्स ४८,९०० आणि निफ्टी निर्देशांक १४,७०० चा स्तर टिकवण्यास अपयशी ठरल्यास, निर्देशांकाचे खालचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ४८,००० ते ४७,००० आणि निफ्टीवर १४,४०० ते १४,१०० असे असेल.

निकालपूर्व विश्लेषण…

१) भारती एअरटेल लिमिटेड

*  तिमाही वित्तीय निकाल – सोमवार, १७ मे

*  १४ मेचा बंद भाव – ५६०.५५ रु.

*  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ५५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ५५० रुपयांचा स्तर राखत,प्रथम वरचे लक्ष्य ५८० रुपये, द्वितीय लक्ष्य ६१० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ५५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ५०० रुपयांपर्यंत घसरण.

२) कॅनरा बँक

*  तिमाही वित्तीय निकाल – मंगळवार, १८ मे

*  १४ मेचा बंद भाव – १४७.५० रु.

*  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १३५ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १३५ रुपयांचा स्तर राखत,प्रथम वरचे लक्ष्य १६५ रुपये, द्वितीय लक्ष्य १७५ रुपये.

ब) निराशादायक निकाल : १३५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १२५ रुपयांपर्यंत घसरण.

३) टाटा मोटर्स लिमिटेड

*  तिमाही वित्तीय निकाल – मंगळवार, १८ मे

*  १४ मेचा बंद भाव – ३१२.३५ रु.

*  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ३०५ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३०५ रुपयांचा स्तर राखत,प्रथम वरचे लक्ष्य ३२५ रुपये, द्वितीय लक्ष्य ३५५ रुपये.

ब) निराशादायक निकाल : ३०५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २७५ रुपयांपर्यंत घसरण.

४) हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड

*  तिमाही वित्तीय निकाल – शुक्रवार, २१ मे

*  १४ मेचा बंद भाव – ३८३ रु.

*  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ३७५ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३७५ रुपयांचा स्तर राखत,प्रथम वरचे लक्ष्य ४२५ रुपये, द्वितीय लक्ष्य ४५० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ३७५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३५० रुपयांपर्यंत घसरण.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Share market techniques article by ashish thakur abn

ताज्या बातम्या