माझा पोर्टफोलियो : इथेनॉलपूरक ‘मधुर’ धोरण

कंपनीचा ‘मधुर’ हा साखरेचा ब्रँड प्रसिद्ध आहे. देशांतर्गत कंपनीचा ब्रँडेड साखर बाजारातील हिस्सा २५ टक्के आहे.

अजय वाळिंबे
शेअर बाजारातील गुंतवणूक ही बेभरवशाची असते याबद्दल कुणाचंच दुमत नसावं. परंतु याच शेअर बाजारात गुंतवणूक करताना अशी काही क्षेत्रे आहेत, त्यातील गुंतवणूक कायमच धोक्याची आणि अनिश्चित ठरली आहे. धातू, विमानोड्डाण उद्योग आणि साखर उत्पादन ही ती धोक्याची तीन क्षेत्रे होय. या क्षेत्रातील कंपन्यातील गुंतवणूक धोकादायक अशा करता की, जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि सरकारी धोरणे या क्षेत्रांशी जास्त निगडित आहेत. आज पोर्टफोलियोसाठी निवडलेला शेअर हा असाच साखर उत्पादक क्षेत्रातील कंपनीचा आहे.

नरेंद्र मुरकुंबी यांनी १९९८ मध्ये आंध्र प्रदेशातील निजाम शुगर ताब्यात घेऊन श्री रेणुका शुगरची स्थापना केली. त्यानंतर कंपनीने आपला विस्तारीकरण कार्यक्रम राबवून कर्नाटक आणि महाराष्ट्रात अनेक प्रकल्प उभे केले. ब्राझीलमधील गुंतवणुकीमुळे कंपनी तोटय़ात गेली आणि कंपनीचे मूळ प्रवर्तक मुरकुंबी पायउतार झाले. आज रेणुका शुगर ही सिंगापूरमधील विलमार इंटरनॅशनल या समूहाची उपकंपनी असून भाग भांडवलात त्यांचा हिस्सा ६२.५ टक्के आहे. कंपनीचे भारतात सात उत्पादन प्रकल्प असून त्यातील पाच कर्नाटक तर दोन महाराष्ट्रात आहेत. रेणुका शुगर ही केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील एक मोठी साखर उत्पादक कंपनी म्हणून ओळखली जाते. कंपनीची एकत्रित साखर उत्पादन क्षमता ३७,५०० टन प्रति दिन, साखर रिफायनिंग क्षमता ५,५०० टन प्रति दिन तर इथेनॉल उत्पादन क्षमता ७३० किलो लिटर प्रति दिन आहे. आता कंपनीने ब्राझीलमधील तोटय़ातील गुंतवणूक काढून टाकली आहे. कंपनीचा ‘मधुर’ हा साखरेचा ब्रँड प्रसिद्ध आहे. देशांतर्गत कंपनीचा ब्रँडेड साखर बाजारातील हिस्सा २५ टक्के आहे.

खनिज तेलाच्या वाढत्या किमती आणि भारतातील त्याची मागणी पाहता भारताच्या एकूण आयातीमधील खनिज तेलाचा हिस्सा मोठा आहे. आयात खर्चाचे हे ओझे कमी करण्याकरिता सरकारने इथेनॉलचा वापर पर्यायी इंधन म्हणून करण्यावर भर दिला आहे. २०२५ पर्यंत इथेनॉलमिश्रित इंधन बंधनकारक करण्याचा सरकारचा इरादा असून इथेनॉलचे प्रमाण २० टक्क्य़ांपर्यंत असेल. सध्या हे प्रमाण केवळ ७-८ टक्के आहे.  इथेनॉलची वाढती मागणी पाहता कंपनी आपली इथेनॉल उत्पादन क्षमता सध्याच्या ७३० किलो लिटर प्रति दिन वरून १,४०० किलो लिटर प्रति दिन वाढवत आहे. गेल्या दोन वर्षांत कंपनीने आपला कर्जाचा बोजा १,३३२ कोटीवरून ५४८ कोटीवर आणला आहे. कंपनीची प्रगती पाहता पतमापन संस्थेने कंपनीची पत दर्जा देखील ‘बीबीबी’ वरून ‘ए-’ असा सुधारला आहे.

जून २०२१ साठी संपलेल्या तिमाहीत कंपनीची आर्थिक कामगिरी चांगली झालेली नाही. कंपनीने या कालावधीत उलाढालीत ४० टक्के घट नोंदवून केवळ ७९५ कोटी रुपयांची उलाढाल केली आहे, तर तोटा ११ कोटींवरून तब्बल २२८ कोटींवर गेला आहे. मात्र तरीही एकूणच साखर उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना आता इथेनॉलमुळे चांगले दिवस येतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे श्री रेणुका, बलरामपूर शुगर किंवा तत्सम कंपन्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अनुभवी परदेशी गुंतवणूकदार (विलमार), बदललेले सरकारी धोरण आणि सर्वात जास्त उत्पादन क्षमता असलेली श्री रेणुका शुगरमधील मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणूक म्हणूनच फायद्याची ठरू शकेल.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

श्री रेणुका शुगर्स लिमिटेड

(बीएसई कोड – ५३२६७०)

शुक्रवारचा बंद भाव :          रु. २५.४५

उच्चांक/ नीचांक :             रु. ४८/८

बाजार भांडवल :             रु. ५,४०० कोटी

भरणा झालेले भागभांडवल :      रु. २१२.८० कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न             (%)

प्रवर्तक                              ६२.४८

परदेशी गुंतवणूकदार            १.८४

बँक/ म्यु. फंड/ सरकार         १२.३४

इतर/जनता                        २३.३४

संक्षिप्त विवरण

* शेअर गट    :                स्मॉल-कॅप

* प्रवर्तक       :                विल्मर शुगर होल्डिंग्स, सिंगापूर

* व्यवसाय क्षेत्र  :            साखर, इथेनॉल

* पुस्तकी मूल्य :              रु. (३.२)

* दर्शनी मूल्य :                रु. १/-

* लाभांश      :                   ० %

शेअर शिफारसीचे निकष

*  प्रति समभाग उत्पन्न :               .    —

*  पी/ई गुणोत्तर :                             —

*  समग्र पी/ई गुणोत्तर :                  १२.८

*  डेट इक्विटी गुणोत्तर :                   —

*  इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :            ०.६

*  रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड :     १५.७

*  बीटा :                                         ०.५

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shree renuka sugars limited company profile zws

ताज्या बातम्या