आपलेही करविषयक प्रश्न   असतील तर ते आपण pravin3966@rediffmail.com  या ई-मेलवर अथवा लोकसत्ता कार्यालय,   ‘अर्थ वृत्तान्त’, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई- ४०००२१ या पत्त्यावर पाठवू शकता. अथवा ई-मेल: arthmanas@expressindia.com
* मी एका कंपनीचे ११ डिसेंबर २०१३ रोजी २०० शेअर्स विकत घेतले होते. मला २७ डिसेंबर २०१३ रोजी एक लाख रुपये लाभांश मिळाला. त्यासाठी रेकॉर्ड डेट २० डिसेंबर २०१३ ही होती. आता हे शेअर्स मी ३० डिसेंबर २०१३ रोजी विकले. यात मला रु. ९०,००० इतका अल्पमुदतीचा भांडवली तोटा झाला. मला मिळालेला लाभांश करमुक्त आहे का? मला झालेला अल्पमुदतीचा तोटा हा मला पुढल्या वर्षांकरिता वापरता येईल का?
– सुचीन्द्र पिसाट
उत्तर : प्राप्तिकर कायदा कलम ९४ (७) नुसार जर आपण रेकॉर्ड डेटच्या तीन महिन्याच्या आत शेअर्स खरेदी केले असतील आणि रेकॉर्ड डेटच्या तीन महिन्याच्या आत शेअर्स विकले असतील आणि त्यावर अल्पमुदतीचा भांडवली तोटा झाला असेल तर लाभांशाच्या रकमेएवढा किंवा त्यापेक्षा कमी तोटा हा विचारात घेतला जात नाही. तुम्हाला लाभांशापोटी १,००,००० रुपये (तोटय़ापेक्षा जास्त) मिळाले आहेत. त्यामुळे या तरतुदी प्रमाणे रु. ९०,००० हा तोटा आपल्याला पुढील वर्षांकरिता वापरता येणार नाही.

* माझ्याकडे एका कंपनीचे (कॅस्ट्रॉल) १० रु. दर्शनी मूल्य असलेले शेअर्स होते. कंपनीने आपले भागभांडवल कंपनी कायद्याप्रमाणे कमी केले. शेअर्सचे दर्शनी मूल्य कमी करून पाच रुपये केले आणि पाच रुपये भागधारकांना परत केले. हे पाच रुपये करमुक्त आहेत का?
– वर्षां कुलकर्णी
उत्तर : कंपनीने आपले भागभांडवल कंपनी कायद्याप्रमाणे कमी केले तरी कंपनीच्या एकूण जमा नफ्याएवढय़ा रकमेवर कंपनीला लाभांश वितरण कर भरावा लागतो. त्यामुळे आपल्याला कॅस्ट्रॉल कंपनीकडून मिळालेले पाच रुपये हे करमुक्त आहेत.

* माझ्याकडे माझ्या वडिलांनी घेतलेले काही शेअर्स आहेत. त्यांनी ते शेअर्स १९७५ साली विकत घेतले होते. त्यांच्या मृत्युपत्राप्रमाणे हे शेअर्स आता माझ्या नावाने झाले आहेत. ते आता मी माझ्या नावावर झाल्यावर एक वर्षांच्या आत विकले तर मला भांडवली नफ्यावर कर भरावा लागेल का?
– एक वाचक  
उत्तर : प्राप्तिकर कायद्याच्या कलम २ (४२अ) प्रमाणे आपण जर शेअर्स आता विकले तर आपल्याला होणारा भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा असेल. जर आपण हे शेअर्स रोखे बाजारात विकले आणि त्यावर रोखे विनिमय कर (एसटीटी) भरला असेल तर त्यावर आपल्याला प्राप्तिकर भरावा लागणार नाही.  

* मला या वर्षी शेअर्सच्या विक्रीतून ९५,००० रुपये इतका दीर्घ मुदतीचा तोटा झाला. ही विक्री रोखे बाजारात केली आहे आणि त्यावर रोखे विनिमय कर (एसटीटी) भरला आहे. याच वर्षी मला घर विक्रीतून ५,३२,००० रु. इतका दीर्घ मुदतीचा नफा झाला. शेअर्स विक्रीतून झालेला दीर्घ मुदतीचा तोटा हा मी घर विक्रीतून झालेल्या दीर्घ मुदतीच्या नफ्यातून वजा केला तर शिल्लक नफ्यावर कर भरावा लागेल काय?
– टी. के. जोशी
उत्तर : आपल्याला घर विक्रीतून झालेल्या दीर्घ मुदतीच्या नफ्यातून, शेअर्स विक्रीतून झालेल्या दीर्घ मुदतीचा तोटा वजा करता येणार नाही. दीर्घ मुदतीचा नफा ज्यावर रोखे विनिमय कर (एसटीटी) भरला आहे तो करमुक्त आहे. त्यामुळे त्या प्रकारचा तोटा आपल्याला इतर भांडवली नफ्यातून वजा करता येत नाही. त्यामुळे दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर म्हणजे ५,३२,००० रुपयांवर आपल्याला २०.६०% (शैक्षणिक अधिभारासहित) कर भरावा लागेल.

* माझे वय ७० वष्रे आहे. मला या वर्षी १,००,००० रु. इतके व्याज मिळाले आणि घर विक्रीतून मला ४,००,००० रु. दीर्घ मुदतीचा करपात्र नफा झाला आहे. आणि मला २५,००० रु. इतका कंपनीकडून लाभांश मिळाला आहे. मी १,००,००० रु. बँकेत मुदत ठेवीत (८० क कलमाप्रमाणे) गुंतविले आहेत, २०,००० रुपयांचा मेडिक्लेम विमा भरला आहे. मला कर किती भरावा लागेल?
– प्रभाकर सावंत
उत्तर : आपले करपात्र उत्पन्न आणि कर खालील प्रमाणे असेल :
    व्याज                                          १,००,०००
    दीर्घ मुदतीचा भांडवली नफा         ४,००,०००
                                              ————–
    एकूण उत्पन्न                              ५,००,०००
वजा :     ८० क गुंतवणूक                   १,००,०००
              ८० ड मेडिक्लेम                      २०,०००
                                              ————–
              एकूण वजावट                    १,२०,०००    
              (पात्र वजावट)                    १,००,०००
                                              ————–       
              करपात्र उत्पन्न                 ४,००,०००
    दीर्घ मुदतीचा भांडवली नफा         ४,००,०००
    इतर उत्पन्न                                शून्य
देय कर :
प्रथम रु. २,५०,००० वर                     शून्य
बाकी रु. १,५०,००० वर                      ३०,०००
२०% भांडवली कर    
                                              ————–
एकूण कर :                                     ३०,०००
+ शैक्षणिक अधिभार                             ९००
                                              —————
एकूण देय कर                                 ३०,९००
दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर ‘कलम ८० क’ ते ‘कलम ८० यू’च्या गुंतवणुका/ देणी वजा करता येत नाहीत. म्हणून आपल्या भांडवली नफ्याव्यतिरिक्त उत्पन्नातूनच ८० क आणि ८० ड कलमाची वजावट होऊ शकते. आपण ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे आपले रु. २,५०,००० पर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे. त्यामुळे आपल्याला बाकी रकमेवर (दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर) २०% कर भरावा लागेल. कंपनीकडून मिळालेला लाभांश मात्र करमुक्त आहे.

* मला आर्थिक वर्ष २०१२-१३ मध्ये शेअर्स विक्रीतून रु. १,७५,००० अल्पमुदतीचा भांडवली तोटा झाला होता. त्या वर्षांचे विवरण पत्र मी ५ ऑक्टोबर २०१३ रोजी भरले. मला अल्पमुदतीचा तोटा पुढील वर्षांसाठी वापरता येईल का?
– सुनीता जाधव
उत्तर : धंदा व व्यवसायातून झालेला तोटा किंवा भांडवली तोटा हा विवरण पत्र मुदतीपूर्वी भरला असेल तरच तो पुढील वर्षी वापरता येतो. आपण आपले विवरण पत्र मुदतीनंतर भरलेले असल्यामुळे शेअर्स विक्रीतून झालेला रु. १,७५,००० अल्पमुदतीचा तोटा हा पुढील वर्षांसाठी वापरता येणार नाही.

* मला कर निर्धारण वर्ष २०१२-१३ साठी कलम १४३ (१) प्रमाणे आदेश मिळाला. त्यामध्ये मी भरलेला रु. १२,००० अग्रीम कर विचारात घेतलेला नाही. त्यामुळे मला रु. १३,२४० इतका कर भरावा असे दाखविण्यात आले आहे. मी भरलेल्या विवरणपत्रानुसार माझा देय कर शून्य आहे. आता मी काय करावे?
– सुनील परब
उत्तर : आपण जर संगणक प्रणालीद्वारे ऑनलाइन विवरण पत्र भरले असेल तर आपल्याला उढउ बंगलोरवरून कलम १४३ (१) प्रमाणे आदेश मिळाला असेल. यासाठी आपल्या ढअठ वर लॉग इन करून कलम १५४ खाली दुरुस्तीसाठी ऑनलाइन निवेदन सादर करावे लागेल. जर आपण संगणकप्रणालीद्वारे विवरण पत्र भरले नसेल तर आपल्याला आपल्या प्राप्तिकर अधिकाऱ्याकडे कलम १५४ खाली अर्ज दाखल करावा लागेल. त्यासोबत अग्रीम कर भरल्याची प्रत जोडावी लागेल.