अग्रिम कर: कोणी आणि किती भरावा?

आपलेही करविषयक प्रश्न असतील तर ते आपण pravin3966@rediffmail.com या ई-मेलवर अथवा लोकसत्ता कार्यालय, ‘अर्थ वृत्तान्त’, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई- ४०००२१ या पत्त्यावर पाठवू शकता.

आपलेही करविषयक प्रश्न असतील तर ते आपण pravin3966@rediffmail.com या ई-मेलवर अथवा लोकसत्ता कार्यालय, ‘अर्थ वृत्तान्त’, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई- ४०००२१ या पत्त्यावर पाठवू शकता. अथवा ई-मेल: arthmanas@expressindia.com

प्रश्न: मी माझ्याकडील एका सूचिबद्ध कंपनीचे ३०० शेअर्स २.३५ लाख रुपयांना मे २०१४ मध्ये माझ्या मित्राला विकले. हे शेअर्स मी जुलै २००४ मध्ये ४५ हजार रुपयांना विकत घेतले होते. या शेअर्सवर झालेला नफा करपात्र आहे का? असेल तर मला या नफ्यावर किती कर भरावा लागेल?
– अरविंद शिंदे
उत्तर: आपण केलेल्या विक्रीवर शेअर उलाढाल कर (STT) भरला नसल्यामुळे शेअर्स विक्रीतून झालेला नफा हा करपात्र आहे. या नफ्यावर कर भरताना आपल्याकडे दोन पर्याय आहेत. पहिले पर्याय महागाई निर्देशांक विचारात घेऊन येणाऱ्या नफ्यावर २०% कर भरणे आणि दुसरा महागाई निर्देशांक विचारात न घेऊन येणाऱ्या नफ्यावर १०% कर भरणे. दोन्ही पर्यायांपकी एक पर्याय आपण निवडू शकता. दोन्ही पर्यायानुसार नफा आणि कर हा खालीलप्रमाणे :


 प्रश्न: मी फेब्रुवारी २०१३ मध्ये ११ लाख रुपयांना एक घर विकत घेतले आणि ते मी ऑगस्ट २०१४ ला १७ लाख रुपयांना विकले, तर या व्यवहारात मला किती कर भरावा लागेल?

दिलीप गोडबोले
उत्तर : आपण घर विकत घेतल्या दिवसापासून तीन वर्षांत विकल्यामुळे आपल्याला झालेला भांडवली नफा हा लघु मुदतीचा आहे. त्यामुळे आपल्याला ६ लाख (विक्री किंमत रु. १७ लाख – खरेदी किंमत रु. ११ लाख) रुपये भांडवली नफ्यावर आपल्या उत्पन्नाच्या ‘स्लॅब’प्रमाणे कर भरावा लागेल.

प्रश्न: मी शैक्षणिक कर्ज घेतले आहे. कर्जाच्या मुद्दल परतफेडीची आणि भरलेल्या व्याजाची उत्पन्नातून वजावट मिळेल का? वजावट मिळाल्यास कोणत्या कलमान्वये मिळेल?
’खंडेराव कोकाटे
उत्तर: शैक्षणिक कर्जावरील व्याजाची वजावट ही कलम ८०ई नुसार मिळते. या कलमाप्रमाणे काही शर्तीची पूर्तता करावी लागते. ही वजावट फक्त वैयक्तिक करदात्याला मिळते. हे कर्ज बँक, काही आíथक संस्था किंवा धर्मादाय संस्था यांच्याकडून घेतले तरच व्याजाची वजावट मिळते. हे कर्ज पूर्णवेळ उच्च शिक्षणासाठी घेतले असले पाहिजे. कर्ज हे स्वत:साठी, पती/पत्नीसाठी, मुलांसाठी किंवा ज्या मुलाचा करदाता कायदेशीर पालक आहे अशांसाठी घेतले असले पाहिजे. शैक्षणिक कर्जावरील फक्त व्याजाची वजावट ही कलम ८०ई नुसार मिळते. मुद्दल परतफेडीची वजावट मिळत नाही.

प्रश्न : अग्रिम कर कोणी भरावा? आणि किती भरावा?
मेघना कुलकर्णी
उत्तर : ज्या व्यक्तींच्या उत्पन्नावरील देय कर हा १० हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्याने अग्रिम कर भरला पाहिजे. हा देय कर काढतांना उत्पन्नावर झालेला कर कपात स्त्रोत (ळऊर) वजा करावी. हा कर कंपन्या व्यतिरिक्त व्यक्तींसाठी तीन हफ्त्यांमध्ये भरावा लागतो. पहिला हफ्ता हा एकूण अंदाजित देय कराच्या ३०% इतका १५ सप्टेंबरपूर्वी दुसरा हफ्ता अंदाजित देय कराच्या ६०% इतका १५ डिसेंबरपूर्वी आणि १००% हा १५ मार्चपूर्वी भरावा लागतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी यात सवलत दिली आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या उत्पन्नामध्ये धंदा किंवा व्यवसायापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश नसेल त्यांना अग्रिम कर भरावा लागत नाही.

प्रश्न: मी नुकतेच बांधकाम चालू असलेल्या इमारतीत एक घर विकत घेतले आहे. या घरासाठी मी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क १.७० लाख रुपये २१ एप्रिल २०१४ रोजी भरले. या घरासाठी मी ३० लाख रुपये गृह कर्ज घेतले आहे आणि त्याचा २७,८०० रुपये हफ्ता बँकेत भरतो आहे. मला घराचा ताबा जून २०१५ मध्ये मिळणार आहे. मला मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क आणि कर्जाच्या मुद्दल रकमेच्या परतफेडीची वजावट कलम ८०क मध्ये मिळेल का? गृहकर्जाच्या व्याजाची वजावट आíथक वर्ष २०१४-१५ साठी घेता येईल का?
अंकुश पाटील
उत्तर: आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये आपण भरलेल्या मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क आणि कर्जाच्या मुद्दल रकमेच्या परतफेडीची वजावट कलम ८०क मध्ये घेऊ शकता. या कलमानुसार जास्तीत जास्त १.५० लाख रुपयांची वजावट आपण घेऊ शकता. व्याजाची वजावट ही फक्त घराचा ताबा ज्या आíथक वर्षांत घेतला त्या आíथक वर्षांनंतर मिळते. घराचा ताबा आपल्याला आíथक वर्ष २०१५-१६ मध्ये मिळत असल्यामुळे २०१४-१५ या आर्थिक वर्षांत गृह कर्जाच्या व्याजाची वजावट घेता येणार नाही. परंतु ताबा घेण्यापूर्वी भरलेल्या व्याजाची वजावट ही पुढील पाच वर्षांत विभागून म्हणजे दर वर्षी एक-पंचमांश इतकी अतिरिक्त घेऊ शकता. जर आपले घर हे एकच असले तर एकूण व्याजाची वजावट ही आर्थिक वर्ष २०१४-१५ पासून दोन लाख रुपये इतकी आहे.

प्रश्न : माझे शेतीचे वार्षकि उत्पन्न १.६० लाख रुपये इतके आहे. माझ्याकडे गाई असून त्याचे दूध मी डेअरीमध्ये विकते. त्याचे दरमहा उत्पन्न ११ हजार रुपये आहे. मला किती व कोणत्या उत्पन्नावर कर भरावा लागेल?
मानसी देशमुख
उत्तर : दूध विक्रीतून मिळणारे उत्पन्न हे शेतीच्या उत्पन्नात गणले जात नाही. त्यामुळे ते करपात्र आहे. शेतीतून मिळणारे उत्पन्न हे करमुक्त आहे. परंतु आपले बिगरशेतीचे उत्पन्न हे करपात्र उत्पन्नाच्या मर्यादेच्या (२.५० लाख रुपये) खाली असल्यामुळे आपल्याला कर भरावा लागणार नाही.

प्रश्न : मी आíथक वर्ष २०१३-१४ मध्ये दोन कंपन्यांमध्ये नोकरीला होतो. एका कंपनीकडून मला ४.३५ लाख रुपये करपात्र उत्पन्न मिळाले. स्त्रोतातून कर कपात (ळऊर) २२,१४५ रुपये इतकी केली आणि दुसऱ्या कंपनीकडून मला ३.२५ लाख रुपये इतके करपात्र उत्पन्न मिळाले त्यांनी १०,८१५ रुपये स्त्रोतातून करकपात (ळऊर) केली. दोन्ही कंपन्यांनी कलम ८७अ नुसार २ हजार रुपयांची कर सवलत दिली होती. कारण एका कंपनीतून मिळणारे माझे उत्पन्न हे ५ लाखांपेक्षा कमी होते. आता मला विवरणपत्र भरावयाचे असून किती कर अजून भरावा लागेल?
विलास जोशी
उत्तर: कलम ८७अ प्रमाणे कर सवलत ही २ हजार रुपये इतकी आहे. आपल्या बाबतीत ती दोनदा घेतली गेली असल्यामुळे आपल्याला आर्थिक वर्ष २०१३-१४ साठी खालील प्रमाणे कर भरावा लागेल :
पगारातील करपात्र उत्पन्न १ : ४,३५,०० रुपये
पगारातील करपात्र उत्पन्न १ : ३,२५,००० रुपये
एकूण उत्पन्न : ७,६०,००० रुपये
उत्पन्नावर कर:
पहिल्या २ लाख रुपयांवर : शून्य
२ ते ५ लाख रुपयांवर : ३०,००० रुपये
उर्वरित २.६० लाख रुपयांवर : ५२,००० रुपये
—————————————————————-
देय कर : ८२,००० रुपये
शैक्षणिक कर : २,४६० रुपये
——————————– ——————————–
एकूण कर : ८४,४६० रुपये
—————————————————————-
स्त्रोतातून कर कपात १ (टीडीएस) : २२,१४५ रुपये
स्त्रोतातून कर कपात २ (टीडीएस) : १०,८१५ रुपये
एकूण स्त्रोतातून कर कपात (टीडीएस) : ३२,९६० रुपये
कर देय                                         : ५१,५०० रुपये
याशिवाय या देय करावर कलम २३४ब आणि २३४क प्रमाणे व्याज भरावे लागेल. विवरणपत्र भरण्याची मुदत ही ३१ जुलै २०१४ रोजी संपली. त्यामुळे कलम २३४अ प्रमाणेसुद्धा व्याज भरावे लागेल. आपल्या बाबतीत मूळ करमुक्त उत्पन्न हे दोनदा गणले गेले आणि कलम ८७अ प्रमाणे कर सवलत हीसुद्धा दोनदा घेतली गेली. दोन्ही कंपन्यांकडून मिळणारे उत्पन्न हे ५ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यामुळे आपल्याला कलम ८७अ ची कर सवलत मिळू शकत नाही. इतर वजावटी आपण वरील उत्पन्नातून वजा केल्या आहेत, असे गृहीत धरले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Solution on tax related questions and answers

ताज्या बातम्या