सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

वेगाने वर जाणाऱ्या बाजारासाठी सरलेला सप्ताह थोडा निराशाजनक राहिला. अवास्तव तेजीने वधारलेल्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील मिडकॅप कंपन्यांचे समभाग, आयआरसीटीसी, अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्ट, एशियन पेंट्स आणि अल्ट्राटेक सिमेंट अशा काही कंपन्यांची तिमाही आर्थिक कामगिरी सकारात्मक राहिली, तरीही नफावसुलीमुळे त्यांच्या समभागात मोठी घसरण झाली. व्यापक बाजारातील मिडकॅप व स्मॉलकॅप कंपन्यांच्या समभागात अपेक्षेप्रमाणे प्रथम घसरणीला सुरुवात झाली. त्यांचे निर्देशांक प्रत्येकी सहा टक्कय़ांपर्यंत घसरले. बँकिंग क्षेत्राने मात्र बाजाराला आधार दिल्याने सप्ताहअखेर बाजाराचे प्रमुख निर्देशांक केवळ एक टक्कय़ाने खाली आले.

’ आयआरसीटीसी – या समभागात सरलेल्या सप्ताहात झालेली २७ टक्कय़ांची घसरण गुंतवणूकदारांना धडा देणारी ठरली. संस्थात्मक गुंतवणूकदारांनी अचानक नफावसुली केल्यामुळे या समभागातील अवास्तव वाढ अखेर थांबली. करोना संसर्गाचा धोका संपून आता लोक प्रवासाला निघतील या भावनेने या समभागात उशिराने गुंतवणुकीला सुरुवात केलेल्या अनेक सामान्य गुंतवणूकदारांनी मात्र उच्चांकी भावाला समभाग खरेदी केले. त्यांना आता समभाग किंमत वाढीसाठी थोडी अधिक प्रतीक्षा करावी लागेल.

’ हिंदुस्तान युनिलिव्हर- कंपनीने सरलेल्या दुसऱ्या तिमाहीत विक्रीमध्ये नऊ  टक्के वाढ नोंदविली असली तरी ती उत्पादनांच्या किमती वाढवल्यामुळे होती. इंधन तेल व खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीमुळे नजीकच्या काळात कंपनीच्या नफाक्षमतेवर दबाव राहणार आहे. दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी कायम हवासा वाटणारा हा समभाग आणखी खालच्या किंमत पातळीवर खरेदीची संधी देईल.

’  लार्सन अँड टुब्रो – या समभागांने बाजाराच्या तेजीत सहभाग घ्यायला सुरुवात केली आहे. गेल्या सप्ताहात कंपनीच्या समभागांनी वार्षिक उच्चांक गाठला. दिल्लीमधील ‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पात कंपनीला तीन इमारती बांधण्याचे कंत्राट मिळाले आहे. लार्सन अँड टुब्रो समूहात असलेल्या एल अँड टी इन्फोटेक आणि माईंडट्री यांनी सरलेल्या सप्टेबर तिमाहीत चांगली कामगिरी बजावली आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रातील ही अग्रेसर कंपनी नजीकच्या काळात गुंतवणूकदारांना चांगला फायदा करून देईल.

’ आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाईफ इन्शुरन्स – या कंपनीने सरलेल्या दुसऱ्या तिमाही नफ्यात ४८ टक्के वाढ नोंदविली आहे. कंपनीच्या गुंतवणुकीवरील मिळकतीत ७० टक्के तर एकूण विम्याच्या प्रीमियममध्ये ८ टक्के वाढ साधली आहे. कंपनीच्या नवीन विमा पॉलिसींमध्ये ४५ टक्के वाढ झाली आहे. पारंपरिक विम्यापेक्षा अधिक फायद्याच्या मुदत विमा योजनांमधील वाढ कंपनीच्या समभागात गुंतवणुकीसाठी प्रेरक आहे.

’ नायका – एफएसएन ई-कॉमर्सची सौंदर्यप्रसाधने उत्पादनातील ‘नायका’ या सुप्रसिद्ध नाममुद्रेअंतर्गत व्यवसाय चालविणाऱ्या कंपनीची प्राथमिक समभाग विक्री येत्या २८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मोठय़ा लाभासाठी गुंतवणूकदारांनी प्राथमिक समभाग विक्रीद्वारे सहभाग घेऊ न नशीब अजमावायला हरकत नाही. 

’ अल्ट्राटेक सिमेंट – सप्टेंबरअखेर तिमाहीत या कंपनीने महसुलात १५ टक्के वाढ नोंदविली. कोळशाच्या किमती दुपटीने तर इतर इंधन खर्चात १६ टक्के वाढ झाली तरी कंपनीने ऊर्जा वापरात केलेल्या बचतीमुळे नफा गेल्या वर्षांतील तिमाहीच्या पातळीवर कायम राखता आला. लवकरच कंपनी १.२ दशलक्ष टन उत्पादन क्षमता असलेल्या स्वत:च्या कोळसा खाणीमधून उत्पादन सुरू करेल. येत्या काळात बांधकाम क्षेत्रातील वाढत्या मागणीचा फायदा कंपनीला नक्कीच मिळेल. सिमेंट क्षेत्रातील ही पहिल्या क्रमांकाची कंपनी आहे. तिमाही निकालानंतर समभागात झालेली घसरण दीर्घकालीन गुंतवणुकीची संधी ठरेल.

’ ज्युबिलंट फूडवर्क्‍स – डॉमिनो पिझ्झा विक्री करणाऱ्या या कंपनीने दुसऱ्या तिमाहीत विक्रीची करोनापूर्व पातळी गाठली. दुसऱ्या तिमाहीत साठ नवी दुकाने उघडून आता कंपनीच्या एकूण दुकानांची संख्या १,४८४ वर पोहोचली आहे. कंपनी आता मध्यम व लहान शहरात विक्रीचे जाळे वाढवत असून व्यवसाय विस्तार करत आहे. जरी समभाग ‘पी/ई रेशो’प्रमाणे महाग वाटत असला तरी सध्या बाजारभावात झालेली घसरण दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरेल.

’  इक्वि टास स्मॉल फायनान्स बँक  – सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांना कर्जपुरवठा करणाऱ्या इक्वि टास स्मॉल फायनान्स बँकेचा गुंतवणुकीसाठी विचार करता येईल. २०१६ साली बँकेत रूपांतर झालेल्या या संस्थेमार्फत मोठय़ा बँकांकडून कर्ज मिळू न शकणाऱ्या उद्योगांना व लहान व्यावसायिकांना कर्ज दिले जाते. अशा उद्योगांची भारतातील संख्या सहा कोटींहून अधिक आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने २०२१ साली बँकेच्या ग्राहकांची संख्या ३०० पटीने वाढली. कंपनीच्या कर्जपुरवठय़ाचे प्रमाण गेल्या पाच वर्षांत दरसाल सरासरी २४ टक्यांनी वाढले आहे. सध्याचा भाव खरेदीसाठी रास्त आहे.

तिमाही निकालांचा आतापर्यंतचा कल बघता अर्थचक्र नव्याने वेग घेताना ग्राहकपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ, घरे, रसायने यांची मागणी वाढत असली तरी इंधन व कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे या उत्पादकांना नफ्याचे प्रमाण राखता आलेले नाही. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात महसुलात व नफ्यात चांगली वाढ झालेली दिसत असून पुढेही कायम राहील. इंधन व कच्च्या मालाचे उत्पादन करणाऱ्या उत्पादकांच्या नफ्यात मोठी वाढ अपेक्षित आहे. सिमेंट, धातू, ऊर्जा व पायाभूत सुविधा क्षेत्राचे अर्थचक्र वरच्या दिशेने फिरत आहे. तसेच बँकिंग क्षेत्राला चांगले दिवस येत आहेत. मात्र महागाई वाढण्याचा धोका बाजाराला घातक ठरू शकतो. गुंतवणूकदारांनी पुढील काही महिन्यांसाठी गुंतवणूक करताना या गोष्टींचा विचार नक्कीच करायला हवा.