रपेट बाजाराची : उत्सवाची सुरुवात

टीसीएसच्या तसेच इन्फोसिसच्या निकालानंतर एकाच दिवसांत समभागात घसरण झाली.

सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

व्यापक बाजारातील मिडकॅप व स्मॉलकॅपच्या संगतीने गेले दोन आठवडे वर जाणाऱ्या बाजाराला गेल्या सप्ताहात अखेर बँकिंग क्षेत्राची साथ मिळाली आणि बाजारात नव्या उत्सवाला सुरुवात झाली. बँक-निफ्टी चार टक्कय़ांच्या वाढीने ३९ हजारांवर गेला. तर सेन्सेक्स व निफ्टीने ६१,००० व १८,००० हजारांवरील नव्या शिखरांकडे कूच केली. गेल्या आठवडय़ात बोलबाला राहिला तो टाटा समूहाच्या समभागांचा. आधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे टाटा मोटर्समध्ये ७५०० कोटी रुपये गुंतवण्याचा करार ‘टीपीजी’ या परदेशी गुंतवणूक कंपनीने के ला तो टाटांच्या विद्युत शक्तीवर चालणाऱ्या वाहनांच्या नव्या प्रकल्पासाठी. यामध्ये बॅटरी निर्मितीसाठी टाटा केमिकल्सची तर बॅटरी चार्जिंग स्टेशन्ससाठी टाटा पॉवरची साथ मिळणार आहे. टाटा एलेक्सी संशोधन व विकास कामात सहभागी होणार आहे. त्यामुळे टाटा मोटर्सचे समभाग बाजारात घसरणीचा फायदा घेऊ न जमवता येतील.

टीसीएसच्या तसेच इन्फोसिसच्या निकालानंतर एकाच दिवसांत समभागात घसरण झाली. याला नकारात्मक प्रतिक्रिया म्हणण्यापेक्षा निकालापूर्वीच्या वाढीव अपेक्षांनंतर झालेली नफावसुली म्हणता येईल. या क्षेत्रातील सर्वात वरच्या क्रमांकाच्या या समभागांनी गेल्या वर्षांत ३७ ते ४० टक्क्यांची वाढ नोंदविली. सध्या झालेली घसरण ही समभाग जमवण्याची संधी आहे. टीसीएस व इन्फोसिसच्या पाठोपाठ या क्षेत्रातील विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजीसारख्या आघाडीच्या व माईंडट्री या मिडकॅप कंपनीचे तिमाही निकाल गेल्या सप्ताहात जाहीर झाले. सर्वांच्या नफा वाढीमधे झालेली दोन अंकी वाढ बाजाराच्या अपेक्षेनुसार होती.

टायटनने दुसऱ्या तिमाहीच्या जाहीर केलेल्या आकडेवारीत दागिन्यांच्या व्यवसायात ७८ टक्के वाढ झाल्याचे जाहीर केले तर घडय़ाळांचा पारंपरिक व्यवसायाने करोनापूर्व काळाची पातळी गाठल्याचे म्हटले. दोन हजार कोटींची रोकड हाताशी असणारी कंपनी दागिन्यांच्या संचित मागणीचा व लोकांच्या चांगल्या नाममुद्रेकडे वळण्याच्या फायदा घेऊ  शकेल. कंपनीच्या समभागांनी उसळी घेतली असली तरी थोडी संधी मिळताच गुंतवणूक करण्यासारखी कंपनीची कामगिरी असेल.

अ‍ॅडव्हान्स एन्झाइम्स ही एन्झाइम्स व प्रोबायोटिक्सच्या क्षेत्रात संशोधन व विकास करणारी स्मॉलकॅप कंपनी आहे. जगात सर्वत्र नैसर्गिक औषध प्रणालीकडे कल वाढत असल्यामुळे या कंपनीच्या उत्पादनांना चांगली मागणी असेल. कंपनीची उत्पादने अनेक खाद्यपदार्थाशी निगडित उद्योगात वापरली जातात व त्यातील ५० टक्के निर्यात होतात. कंपनीने पहिल्या तिमाहीत उत्पन्नात २४ टक्के तर नफ्यामधे ११ टक्के वाढ केली होती. थोडी जोखीम घेऊ  शकणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी सध्याच्या बाजारभावात खरेदीची संधी आहे.

दीर्घ मुदतीच्या खरेदीसाठी डिजिटल युगाचा फायदा मिळणारी अ‍ॅफल इंडिया या कंपनीचा विचार करता येईल. मोबाईल व इंटरनेटवरून खरेदी करण्याच्या वाढत्या कलेचा फायदा घेऊ  शकणारी अ‍ॅफल इंडिया ग्राहकांच्या आवडी निवडींचा आपल्या खास प्रणालीद्वारे मागोवा घेते व कंपन्यांना जाहिरात सेवा तसेच आपल्या उत्पादनांची डिजिटल जाहिरात करण्यास मदत करते. स्मार्टफोनद्वारे खरेदीच्या वाढत्या प्रमाणामुळे अ‍ॅफल इंडियाच्या उत्पन्नात २५ ते ३० टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. सध्याच्या चढय़ा भावामधे थोडी घसरण होईल तेव्हाच खरेदीचा विचार करावा. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताचा विकासदर या वर्षी साडे नऊ  टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. सप्टेंबर महिन्याच्या किरकोळ किमतींवर आधारित महागाईचा दर गेल्या सहा महिन्यांच्या नीचांकाला ४.३५ टक्यांवर आला व औद्योगिक उत्पादनांत ११.९ टक्यांची वाढ झाली. आर्थिक आकडेवारीच्या या सकारात्मकतेने बाजाराला मोठे बळ मिळाले आहे. चीनने धातू उत्पादन कमी केले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांंच्या मंदीच्या चक्रातून नुकत्याच बाहेर पडलेल्या टाटा स्टील, जिंदाल, वेदान्तासारख्या कंपन्यांना त्याचा फायदा मिळेल. धातूंच्या किमतीमधील सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे दुसऱ्या तिमाहीचे निकाल दमदार येतील. वाढत्या मागणीमुळे गृहनिर्माण क्षेत्रातील कंपन्या, ग्राहकपयोगी वस्तू क्षेत्रातील कंपन्यांचे निकालही उत्साहवर्धक असणे अपेक्षित आहे. वाढणारी आर्थिक उलाढाल व बुडीत कर्जासाठीच्या तरतुदीमधील कपात यामुळे बँकिंग क्षेत्रही अधिक नफ्याकडे वाटचाल करेल. या सप्ताहातही विविध मोठय़ा कंपन्यांच्या तिमाही निकालांची घोषणा होईल. बाजाराच्या तेजीला कंपन्यांच्या दुसऱ्या तिमाहीच्या मिळकतीची साथ मिळेल असा विश्वास वाटतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Stock market analysis stock market technical analysis zws

Next Story
‘अर्थ’पूर्ण : जेवढय़ा लवकर सुरू कराल तेवढे चांगले!
ताज्या बातम्या