बाजाराचा तंत्र-कल : जीवनात ही घडी अशीच राहू दे!

या मंदीचा कालावधी काय असेल? या गुंतवणूकदारांना पडलेल्या विविध प्रश्नांचा हा आढावा..

आशीष ठाकूर

मंदीचे ताजे घातक उतार हे तेजीमग्न गुंतवणूकदारांची झोप उडवून टाकणारे आहेत. निर्देशांक किती खालपर्यंत घरंगळेल? या मंदीचा कालावधी काय असेल? या गुंतवणूकदारांना पडलेल्या विविध प्रश्नांचा हा आढावा..

सरलेल्या सप्ताहातील सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांत दिवसांतर्गत घातक चढ-उतार झाल्याने सर्व गुंतवणूकदारांची पाचावर धारण बसली. पण निफ्टी निर्देशांकावर बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसांमध्ये भरीव सुधारणा झाल्याने, आश्वासक तेजीच्या वातावरणाची निर्मिती झाली. त्यामुळे सर्व गुंतवणूकदारांच्या मनी ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’ अशी भावना निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स: ५७,६९६.४६

निफ्टी : १७,१९६.७०

निफ्टी निर्देशांक जेव्हा १८,६००च्या पातळीवर होता तेव्हा समभागांची नफारूपी विक्री करून नफा व मुद्दल सुरक्षित ठेवण्याचा सल्ला या सदरातून दिला गेला होता. कारण त्या वेळेला आलेखावर घातक मंदीचे स्पष्ट संकेत मिळत होते. घडलेही तसेच अवघ्या दीड महिन्यांत १,८०० अंशांचा घातक उतार येऊन गेला. निफ्टी निर्देशांक १८,६००च्या पातळीवर असताना या सदरात विचारला गेलेला – हे ‘बाळसं आहे की, सूज’ या प्रश्नाचे उत्तर आता आपसूकच मिळून गेले आहे.

निसर्गनियमाप्रमाणे दिवसानंतर रात्र येते, समुद्राला भरतीनंतर ओहोटी येते त्याचप्रमाणे तेजीनंतर मंदी येते व नुकताच मंदीचा घातक उतार अनुभवल्यामुळे आता निर्देशांकावरील सुधारणेचे वरचे लक्ष्य काय असेल? या सुधारणेनंतर जी घसरण येईल त्यात सरलेल्या सप्ताहातील सोमवारचा निफ्टी निर्देशांकावरचा १६,७८२ चा नीचांक तग धरेल काय? की निफ्टी निर्देशांक १६,५०० ते १६,००० पर्यंत घरंगळेल? तसेच या मंदीचा कालावधी काय असेल या गुंतवणूकदारांना पडलेल्या विविध प्रश्नांचा आज आढावा घेऊया.

अगोदरच्या मंदीचा आढावा घेता हर्षद मेहताची १९९२ सालची मंदी, केतन पारेखची २००० सालची, २००८ ची जागतिक महामंदी, २०२० सालची करोनाची व नुकतीच घडून गेलेली ऑक्टोबर २०२१ ची मंदी या सर्वाचे व्यवच्छेदक लक्षण एकसारखेच. त्या त्या वेळच्या उच्चांकावर आणखी मोठय़ा तेजीच्या लक्ष्याचे पतंग उडवले जायचे, पण मध्येच कुठे माशी शिंकायची कोण जाणे? की तेजीचे पर्यावसान घातक मंदीत व्हायचे. १९९२ ते २०२१ पर्यंतच्या मंदीचा इतिहास पाहता.. 

मंदीच्या शेवटच्या चरणात, जी आता सुरू झाली आहे त्याचा कालावधी महिन्याभराचा असेल, या नीचांक प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेत जी काही उलथापालथ जबरदस्त घुसळण (व्होलेटॅलिटी)होते त्यात बाजारातील सर्व गुंतवणूकदारांचे दिवसांतर्गत अंदाज प्रथम बाजार चुकीचे ठरवतो, पण निर्देशांकाचा बंद भाव त्यांनी अगोदर भाकीत केलेल्या स्तरावरच होतो. यावर बाजाराचे एक सुभाषित आहे.. आपल्या अभ्यासाचा आदर ठेवा, पण सर्वोच्च काही असेल तर तो बाजारच आहे. म्हणजेच बाजार देत असलेल्या सूचनांचा, इशाऱ्यांचा विचार करा, पण अभ्यासाच्या जोरावर बाजाराला कधीही सूचना अथवा आदेश देऊ नका. ‘(रिस्पेक्ट टू यूवर स्टडीज्, बट मार्केट इज सुप्रीम, टेक अ क्लूयू फ्रॉम मार्केट अ‍ॅण्ड नेव्हर एव्हर डिक्टेट टू मार्केट)’

वरील सर्व विवेचनांचा आता विचार करण्याची गरज अशासाठी आहे की सरलेल्या सप्ताहातील सोमवार, मंगळवारच्या उलथापालथीत बाजारांनी नीचांक प्रस्थापित केला की आपण नीचांकासमीप आहोत हे जाणून घेणे गरजेचे आहे.

मंदीच्या आजवरच्या १९९२ ते २०२१ पर्यंतच्या अंतिम चरणात बाजारात जीवघेणी उलथापालथ असते व त्या क्षणी निर्देशांकावर नीचांक प्रस्थापित होतो. याचे डोळ्यासमोरील उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सरलेल्या सप्ताहातील सोमवार, मंगळवारची दिवसांतर्गत जीवघेणी उलथापालथ. प्रत्येकाला वाटत होतं, निफ्टी निर्देशांक १७,००० चा स्तर राखेल. पण सोमवारी दिवसांतर्गत १७,००० चा स्तर तोडत सर्वाचे ‘स्टॉप लॉस’ होत निफ्टी निर्देशांकांने १६,७८२ चा नीचांक मारला. इथे मंदी करायची, तर पुन्हा निफ्टी निर्देशांकाचा सोमवारचा बंद भाव १७,००० वर, मार्केटच्या बोलीभाषेत म्हणायचे तर..‘खाया पिया कुछ नहीं, ग्लास फोडा बारा आना’ असे काहीसे सोमवारी घडले. तर मंगळवारी निर्देशांकाचा बंद भाव १७,००० च्या खाली. सर्व जण हवालदिल होऊन निफ्टी निर्देशांकाचे १६,५००-१६,००० च्या खालच्या लक्ष्याचा विचार करायला लागले, तर बुधवार, गुरुवारी अशी काही सुधारणा झाली की,निफ्टी निर्देशांकाने १६,७८२ चा नीचांक सरलेल्या सप्ताहातील पूर्वार्धात मारला होता हे सांगून खोटे वाटेल.    

प्राबल्य कुणाचे राहील?

येणाऱ्या दिवसांत निर्देशांकावर तेजीवाल्यांचे प्राबल्य असेल की मंदीवाल्यांचे हे जाणून घेण्यासाठी आपण निफ्टी निर्देशांकावर १७,००० च्या स्तरावर लक्ष्य केंद्रित करूया, हा स्तर राखल्यास निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे १७,२५० ते १७,६०० असेल. हा स्तरच निफ्टी निर्देशांकाची भविष्यकालीन तेजी-मंदीची वाटचाल निर्धारित करणार आहे. भविष्यात निफ्टी निर्देशांक १७,६०० वर सातत्याने टिकल्यास जीवनात परतलेली ही तेजीची घडी अशीच राहील. भविष्यात निफ्टी निर्देशांक १७,६०० चा स्तर पार करण्यास आणि १७,००० चा स्तर राखण्यास अपयशी ठरल्यास, उच्चांकावरून १,००० अंशांची म्हणजे निफ्टी निर्देशांकावर १६,६०० ते १६,००० च्या नीचांकाची मानसिक तयारी ठेवावी लागेल.

(क्रमश:)

लेखक भांडवली बाजार विश्लेषक ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Stock market review for next week indian stock market zws

ताज्या बातम्या