सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

आधीच्या सप्ताहातील विक्रीच्या लाटेला थोपवण्यात तेजीवाल्यांना यश मिळून दिवसाआड तेजी-मंदीचे हेलकावे घेत बाजाराने पुन्हा आपले शिखर स्थान पक्के केले. जागतिक बाजारातील तेजीची साथ मिळून ‘सेन्सेक्स’ पुन्हा ६० हजार पार होऊन नव्या उच्चांकावर, तर ‘निफ्टी’ १८ हजाराच्या लक्ष्यासाठी मार्गस्थ झाला. ‘बँक निफ्टी’कडून फारशी साथ नसली तरी मिडकॅपमधील अनेक दिग्गज कंपन्या, त्याचप्रमाणे रिलायन्स आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील मातब्बर कंपन्यांच्या पाठिंब्याने बाजाराची घोडदौड सुरूच राहिली.

युरोपमधील इलेक्ट्रिक वाहनांचे यश, भारतातील मालवाहतुकीच्या वाहनांची विक्री, फोर्ड कंपनीच्या कारखान्याचे संभाव्य हस्तांतर अशा कारणांमुळे टाटा मोटर्सचे समभाग गेल्या सप्ताहात चर्चेत राहिले. कंपनीच्या व्यवसायांची पुनर्रचना व परदेशी गुंतवणूक कंपनीकडून नवीन भांडवल उभारणीची शक्यता यामुळे कंपनी परत गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटू लागली आहे.

टीसीपीएल पॅकेजिंग ही गेली पंधरा वर्षे सातत्याने १७ टक्क्य़ांनी व्यवसाय वृद्धी करणारी कंपनी आहे. कागद व पुठ्ठय़ाचा वापर करून बनविलेले पर्यावरणस्नेही घडीचे खोके बनविणारी ही एक स्मॉलकॅप कंपनी आहे. सध्या जगात सर्वत्र अशा तऱ्हेच्या पॅकेजिंगला वाढती मागणी आहे. पुढील वर्षी कंपनीची आणखी एक उत्पादन सुविधा सुरू होऊन त्यामुळे फ्लेक्सिबल पॅकेजिंगच्या क्षमतेत दुपटीने वाढ होईल. भारतात ई-कॉमर्सच्या वाढत्या प्रभावाने पॅकेजिंगची मागणी खूप वाढत आहे. पुढील दोन वर्षांच्या   उद्दिष्टाने या कंपनीत गुंतवणुकीला संधी आहे.

एम्फॅसिस या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने ‘ब्लिंक’ या सिएटलस्थित तंत्रज्ञान कंपनीचे अधिग्रहण केले. यामुळे कंपनीला ग्राहकाभिमुख सेवा प्रणाली बनविण्यास तांत्रिक बळ मिळेल व अमेरिकेतील अ‍ॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, स्टारबक्ससारख्या बडय़ा कंपन्यांबरोबर व्यवसाय करण्याची संधी प्राप्त होईल. एम्फॅसिस सध्याच्या बाजारभावात घेण्याची संधी आहे.

जगात सर्वत्रच इंधनाच्या व गॅसच्या किमती वाढत आहेत. भारतातसुद्धा गॅस वितरण कंपन्यांनी दर वाढविले आहेत. गुजरात गॅसचा समभाग या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये उजवा वाटतो. कारखान्यांना गॅस पुरविण्यात कंपनीचा मोठा वाटा आहे. आता गुजरातमधील मोरबीजवळचे सर्व उद्योग करोनापूर्व क्षमतेने सुरू झाले आहेत. प्रदूषण कमी करण्यासाठी इंधन म्हणून गॅसचा वापर वाढत आहे.

घरांच्या विक्रीत गेल्या तीन महिन्यांत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे गृहनिर्माण क्षेत्रातील गोदरेज, शोभा, ओबेरॉयसारखे समभाग वर जात आहेत. याचा अप्रत्यक्ष लाभार्थी म्हणून बजाज इलेक्ट्रिकल्सचा विचार करता येईल. घर सजावटीच्या व नित्योपयोगी इलेक्ट्रिकल वस्तू बनविणारी ही शंभर वर्षे जुनी नामवंत कंपनी आहे.

मूडीज् या जागतिक पतमानांकन संस्थेने भारताविषयीचा पत-दृष्टिकोन ‘निगेटिव्ह’वरून ‘स्टेबल’ असा वाढविला आहे. आर्थिक स्थैर्य, अर्थव्यवस्थेतील वाढ व लसीकरणाची प्रगती अशा गोष्टींचा यात विचार केला गेला आहे. त्याचबरोबर मूडीज्ने काही खासगी कंपन्या व सहा भारतीय बँकांचेही पतमानांकन ‘निगेटिव्ह’वरून ‘स्टेबल’ असे सुधारले आहे. खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय, अ‍ॅक्सिस व एचडीएफसी तर सरकारच्या मालकीच्या एसबीआय, पंजाब नॅशनल या महत्त्वाच्या बँकांचा त्यात समावेश आहे. अपेक्षेप्रमाणे रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदर कायम ठेवले व विकास वाढीचा दर ९.५ टक्क्य़ांवर कायम ठेवला. इंधन दर वाढत असले तरी मान्सूनची दमदार कामगिरी व खरीप हंगामाचे चांगले उत्पादन यामुळे महागाईचा दर सहनशील मर्यादेत राहील अशी आशा तिने व्यक्त केली आहे. त्यामुळे बाजाराच्या घसरणीला सध्या काही ठोस कारण दिसत नाही. एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे देऊन सरकारने अनेक वर्षांचा प्रलंबित निर्णय मार्गी लावला. एअर इंडियाला कर्जे देणाऱ्या सरकारी बँकांना त्यामुळे दिलासा मिळेल. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राच्या सहामाही निकालांकडून बाजाराच्या मोठय़ा अपेक्षा असल्यामुळे या क्षेत्राचा निर्देशांक साडेचार टक्क्य़ांनी वर गेला होता. टीसीएसचे निकाल बाजार बंद झाल्यावर आले. नफ्यामधील १४ टक्के वाढ व सर्वच व्यवसाय क्षेत्रांमधे दोन आकडी वृद्धीने बाजाराच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. त्यावरची प्रतिक्रिया बाजार या आठवडय़ात देईल व त्यापाठोपाठ इन्फोसिस, विप्रो व एचसीएल टेक्नॉलॉजीच्या निकालांकडे बाजार मोठय़ा अपेक्षेने पाहताना दिसेल.