सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील इतर अनेक कंपन्यांच्या निकालांमधून या सप्ताहात बाजाराला बळ मिळेल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. कमाईचा हंगाम सुरू झाल्यामुळे, विशिष्ट क्षेत्रात बाजारात तेजीची शक्यता नाकारता येत नाही. तथापि लहान गुंतवणूकदारांनी या वाटचालीत नफावसुलीच्या संधींवरही लक्ष ठेवावे.

गेल्या आर्थिक वर्षांच्या निकालांची सुरुवात सरलेल्या सप्ताहात झाली. पण बाजाराने सावध पवित्रा घेतला होता. अमेरिकी बाजारातील ‘नॅसडॅक’च्या घसरणीचा परिणाम माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांवर दिसला. या क्षेत्राचा निर्देशांक सरलेल्या सप्ताहात तीन टक्क्यांनी घसरला. टीसीएसच्या दमदार निकालांचाही त्यावर काहीही परिणाम झाला नाही. किरकोळ महागाई निर्देशांक १७ महिन्यांच्या उच्चांकावर जाऊन त्याने रिझव्‍‌र्ह बँकेची सहा टक्क्यांची सहनशील मर्यादा ओलांडली. या अशा बाबींबरोबर जागतिक बाजारांतील कमकुवतपणाचे प्रतििबब भारतीय बाजारात तीनही दिवस पडले व प्रमुख निर्देशांक रोजच घसरणीने बंद झाले.

टीसीएस :

कंपनीने अपेक्षित असे निकाल जाहीर केले. गेल्या पूर्ण वर्षांसाठी उत्पन्नात व नफ्यात अनुक्रमे १८ व १७ टक्के वाढ झाली. शेवटच्या तिमाहीत उत्पन्नाने ५० हजार कोटींचा टप्पा गाठून एक विक्रम केला. गेल्या वर्षांत कंपनीने एक लाखाहून जास्त कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. एकूण कुशल कर्मचाऱ्यांतील ही ११ टक्क्यांची वाढ पुढील काळातील मोठय़ा उलाढालीचे संकेत देते. शेवटच्या तिमाहीत कंपनीने १,१०० कोटी डॉलरच्या कंत्राटी मागण्या नोंदवल्या. कंपनीच्या व्यवस्थापकांनी पुढील काळाच्या प्रगतीबाबत मोठा विश्वास व्यक्त केला आहे. कंपनी गुंतवणूकदारांना पुढील काळात स्थिर परतावा देईल.

इन्फोसिस :

इन्फोसिसच्या वार्षिक मिळकतीत २१ टक्के वाढ होऊन ती एक लाख २१ हजार कोटी रुपये झाली तर नफा १४ टक्क्यांनी वाढून २२ हजार कोटी रुपये झाला. शेवटच्या तिमाहीचे निकाल थोडे कमसर असले तरी वार्षिक तुलनेत कंपनीची प्रगती चांगलीच आहे. डिजिटल व क्लाऊड टेक्नॉलॉजीमध्ये वाढत असणारी मागणी कंपनीला उपकारक आहे. कंपनीच्या उत्पन्नात याचा ५९ टक्के वाटा आहे. हातात असणाऱ्या मागण्या व नफ्याच्या टक्केवारीतील वाढीचा अंदाज कंपनीमधील गुंतवणुकीला दिलासा देणारा आहे.

सुमिटोमो केमिकल्स :

कृषीपूरक रसायनांची उत्पादक असलेल्या सुमिटोमो केमिकल कंपनीला शेवटच्या तिमाहीत चांगला नफा होण्याची शक्यता आहे. कंपनीने नवीन उत्पादने बाजारात आणली आहेत. जागतिक बाजारात कृषी उत्पादनांच्या किमतीत नुकतीच वाढ झाल्याचा फायदा कंपनीला मिळेल. कंपनीने तिसऱ्या तिमाहीच्या निकालात गेल्या वर्षांच्या तुलनेत कंपनीच्या विक्रीत ६० टक्के तर नफ्यात ८० टक्क्यांची वाढीची नोंद केली होती. चालू आर्थिक वर्षांच्या नऊ महिन्यांत कंपनीच्या देशांतर्गत विक्रीत १२ टक्के तर निर्यातीत २५ टक्के वाढ झाली होती. उत्तम व्यवस्थापन, कृषी रसायनांची मूल्यवर्धित उत्पादने, प्रवर्तक कंपनीच्या पाठबळावर कंपनीला कंत्राटी उत्पादनाच्या संधी व भारतीय बाजारपेठेवरील पकड कंपनीला उच्चांकी नफा कमावायला मदत करेल. या कंपनीतील गुंतवणूक चांगला फायदा मिळवून देऊ शकते.

इन्फोसिसच्या व एचडीएफसी बँकेच्या निकालांवर बाजार या सप्ताहात प्रतिक्रिया देईल. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील इतर अनेक कंपन्यांचे निकाल या सप्ताहात जाहीर होतील. बाजाराला यामधून बळ मिळेल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. कमाईचा हंगाम सुरू झाल्यामुळे, विशिष्ट क्षेत्रात बाजारात तेजी येण्याची शक्यता आहे. पण महागाईचे आकडे, रोखे परताव्याचे वाढलेले दर व जून महिन्यांत होऊ शकणारी व्याजदर वाढ लक्षात घेऊन गुंतवणुकदारांनी नफावसुलीच्या संधी घेऊनच वाटचाल करायला हवी.

सप्ताहातील या घडामोडींवर लक्ष ठेवा: 

’ मुथ्थुट फायनान्स, एसीसी, आयसीआयसीआय सिक्युरिटीज, रॅलीज, टाटा कम्युनिकेशन्स, टाटा मेटालिक्स, आयसीआयसीआय लोम्बार्ड, सुंदरम फास्टनर, हिंदूस्तान झिंक या कंपन्या गेल्या आर्थिक वर्षांचे निकाल जाहीर करतील. ’ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सायन्ट, एल अँड टी इन्फोटेक, मास्टेक, माइंड ट्री, टाटा एलेक्सी, एचसीएल टेक्नॉलॉजी, एल अँड टी टेक्नॉलॉजी या कंपन्या गेल्या आर्थिक वर्षांचे निकाल जाहीर करतील.