रपेट बाजाराची : तेजीचा प्रवाह कायम

गुंतवणूकदारांनी कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीकडे व अर्थव्यवस्थेतील संकेतांकडे पाहून खरेदीचे धोरण कायम ठेवले.

सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

गेल्या सप्ताहातील बाजाराच्या कामगिरीने दिवाळीनंतरही तेजी कायम असल्याचे संकेत दिले. अमेरिकेतील महागाई निर्देशांकात झालेली वाढ व त्यामुळे तेथील बाजारात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला होता. परदेशी गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्यामुळे बाजारात थोडी घसरण झाली. पण ही भीती अल्पकाळच टिकली. गुंतवणूकदारांनी कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीकडे व अर्थव्यवस्थेतील संकेतांकडे पाहून खरेदीचे धोरण कायम ठेवले.

लार्सन अ‍ॅँड टुब्रो : बाजारात सर्वत्र मंदीचा जोर असला तरी या पायाभूत सुविधा क्षेत्रातील या कंपनीच्या समभागांत गेले काही दिवस तेजीचा माहोल टिकून आहे. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात आधीच कार्यरत असलेल्या दोन उपकंपन्या व माईंड ट्रीचे अधिग्रहण यामुळे करोनाकाळातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रास आलेल्या मागणीचा पुरेपूर फायदा कंपनीला घेता आला. नफ्याचा ४५ टक्के वाटा या कंपन्यांमधून येत आहे. कंपनीचा मूळ व्यवसाय करोनाकाळातील कंत्राटी कामगारांच्या स्थलांतराने संकटात सापडला होता. पण त्यात आता सुधारणा होत आहे. कंपनीच्या प्रकल्पावरील कामगारांची संख्या मे २०२१ मधील १.७० लाखांवरून ऑक्टोबर महिन्यात २.५१ लाखांवर गेली आहे. हाती घेतलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यात कंपनीची खासियत आहे. कंपनीच्या इंजिनीयरिंग व बांधकाम उद्योगाकडे पुढील तीन वर्षे पुरतील इतकी कामे आहेत व त्यात वार्षिक १० टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे पुढील काळात कंपनी र्सवकष प्रगती करण्याचे संकेत आहेत. गुंतवणूकदारांनी समभाग राखून ठेवावेत व संधी मिळेल तेव्हा त्यात वाढ करावी.

ब्रिटानिया इंडस्ट्रीज : कंपनीने सप्टेंबरअखेर तिमाही नफ्यात २३ टक्क्यांची घट जाहीर केली. कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींचा फटका जसा इतर एफएमसीजी कंपन्यांना बसला तसा तो ब्रिटानियालाही बसला. कंपनीच्या खर्चावरील नियंत्रण ठेवण्याची धोरणे, उत्पादनांच्या किमतीत केलेली वाढ, इंधन व खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात ठेवण्याचे सरकारचे प्रयत्न व ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत असलेले सणासुदीचे दिवस यामुळे समभागांत मोठी घसरण अपेक्षित नाही. आपल्या जवळचे समभाग राखून ठेवावेत.

मनोरमा इंडस्ट्रीज : ही कंपनी अनेक मूल्यवर्धित टेलर-मेड उत्पादनांची एकमेव निर्माती आहे जी ‘कोको बटर इक्विव्हॅलंट्स – सीबीई’चे घटक असणारी तेले, आंब्याच्या कोयींपासून बनवणारे फॅट्स, कोकम बटर इत्यादी बनवते. ‘सीबीई’ हा कोको बटरचा स्वस्त पर्याय आहे, जो चॉकलेटची चव, घनता आणि पोत सुधारतो. मनोरमा इंडस्ट्रीज जागतिक स्तरावर ‘सीबीई’च्या सात उत्पादकांपैकी एक आहे. अन्न आणि सौंदर्यप्रसाधन उद्योगातील सीबीई आणि त्याच्या मूल्यवर्धित उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेऊन कंपनी उत्पादनक्षमता १५ हजार टनांवरून ४० हजार टनांपर्यंत वाढवत आहे. कंपनीला कच्च्या मालाची उपलब्धता मुबलक आहे. गेले तीन महिने मर्यादित पातळीत हालचाल करणारा हा समभाग मर्यादित गुंतवणुकीसाठी चांगला आहे.

नायका : एफएसएन ई-कॉमर्स या कंपनीच्या समभागांचे बाजारात जोरदार पदार्पण झाले व गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले. सौंदर्य उत्पादनांचा व्यवसाय करणारी ही एक फायद्यात असलेली कंपनी आहे. कंपनीचे बाजार मूल्य झोमॅटोपेक्षा कमी आहे. कंपनीचे समभाग एकदा बाजारात स्थिर झाले की त्यात थोडी गुंतवणूक करण्यास हरकत नाही. पूर्वी बाजारात आलेल्या अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्ट (डी-मार्ट) सारखी या कंपनीची बाजारात प्रगती राहील.

झोमॅटो : बाजारात नव्याने सूचीबद्ध झालेल्या या कंपनीच्या तिमाही उलाढालीत गेल्या वर्षांच्या तुलनेत १४० टक्क्यांची वाढ होऊन ती एक हजार कोटींच्या पुढे गेली. पण तोटा मात्र ८७ टक्क्यांनी वाढून ४३० कोटी रुपये झाला. बाजाराने तरीही त्यावर नकारात्मक प्रतिक्रिया दिली नाही. कारण नव्या कंपन्यांसाठी गुंतवणूकदार फायद्यापेक्षा उद्योग विस्ताराला जास्त महत्त्व देत आहेत व कंपनीच्या प्रवर्तकांमध्ये असलेली प्रयोगशीलता त्यांना भावते आहे. तोटय़ात जाऊ शकणारे व्यवसाय त्वरेने बंद करून नव्या स्टार्टअपमध्ये भांडवल गुंतवण्याच्या निर्णयांचे गुंतवणूकदारांनी स्वागत केले. कंपनीने क्युअरफिटमध्ये भांडवली सहभाग घेतला आहे. या कंपनीत टाटा समूहाचा देखील सहभाग आहे. तसेच ग्रोफर्स, शिपरॉकेट, मॅजिकपिनसारख्या नव-उद्योगात कंपनी गुंतवणूक करीत आहे.

टाटा स्टील : कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीतील नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत आठपट वाढला जे बाजाराला अपेक्षित होते त्यामुळे समभागात मोठी वाढ झाली नाही; किंबहुना थोडी घसरणच झाली. अर्थव्यवस्थेने घेतलेला वेग, बांधकाम व वाहन क्षेत्रात वाढलेली मागणी यामुळे पोलादाच्या मागणीतही वाढ होत राहील. गुंतवणूकदारांनी आपले समभाग राखून ठेवावेत. या आर्थिक वर्षांच्या पुढील सहा महिन्यांतही कंपनीची अशीच कामगिरी करेल. भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढण्याच्या मार्गावर असण्याचा अर्थमंत्रालयाच्या मासिक अवलोकन अहवालाचा दावा आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही असेच मत व्यक्त केले आहे. इंधनावरील करकपातीचा निर्णय किरकोळ महागाईवर काहीसे बंधन आणेल. धातू क्षेत्रातील दरवाढीचा वेग देखील आता कमी होत आहे. त्यामुळे दीर्घ मुदतीचा विचार करता बाजार तेजी टिकवून ठेवेल. अधूनमधून येणाऱ्या विक्रीच्या लाटा चांगले समभाग घेण्याच्या संधी देतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Stock market update stock market analysis zws