सुधीर जोशी – sudhirjoshi23@gmail.com

गेल्या सप्ताहात बाजाराला एकामागोमाग अनेक कारणांनी विक्रीचे तडाखे बसले. कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णयावर बाजाराची तात्काळ प्रतिक्रिया सरकार आर्थिक सुधारणांना दुय्यम स्थान देत असल्याची झाली व बाजारात मंदीचा भडका उडाला. त्याला रिलायन्सने पेट्रोकेमिकल्स व्यवसायातील २० टक्के हिस्सा आराम्को या सौदी अरब कंपनीला विकण्याचा करार रद्द केल्याच्या घोषणेने आणखी इंधन पुरविले. बाजाराच्या निर्देशांकातील महत्त्वाचा घटक असलेला रिलायन्सचा समभाग पहिल्याच दिवशी साडेचार टक्कय़ांनी खाली आला. बाजाराने सावरण्याचे केलेले प्रयत्न दक्षिण आफ्रिकेतील विषाणूच्या नव्या उद्रेकाने निष्फळ ठरवले. परदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीचा मारा सुरूच राहिला. मासिक सौदेपूर्तीचा दबावही या सप्ताहात बाजारावर होता. परिणामी आरोग्य सेवा क्षेत्र वगळता सर्वच क्षेत्रीय निर्देशांक एक ते आठ टक्क्यांनी, तर प्रमुख निर्देशांक चार टक्कय़ांहून जास्त घसरले.

असाही इंडिया ग्लास: वाहन क्षेत्रासाठी लागणाऱ्या विविध काचा तसेच बांधकाम क्षेत्र व गृहसजावटीसाठी लागणारी काचेची तावदाने बनविणारी ही कंपनी गेली ३५ वर्षे या क्षेत्रात असून वाहन उद्योगातील मागणीतील ७० टक्के वाटा या कंपनीकडून पुरविला जातो. दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या विक्रीत २४ टक्के, तर नफ्यात दुप्पट वाढ झाली होती. सोमवारी बाजारात झालेल्या मोठय़ा घसरणीतही या कंपनीचा समभाग तीन टक्के वर गेला होता. वाहन व गृह निर्माण क्षेत्रातील वाढ या कंपनीला लाभकारक ठरेल. पुढील सहा महिन्यांच्या मुदतीमध्ये मोठा फायदा मिळवून देणारा हा समभाग आहे.

भारती एअरटेल: अखेर कंपनीने मोबाइलच्या प्रीपेड ग्राहकांसाठीचे दर साधारण २० टक्क्य़ांनी वाढविले. या ग्राहकांचा कंपनीच्या उत्पन्नात ९० टक्के वाटा आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्यांच्या काळात या दरवाढीचा फायदा कंपनीच्या उत्पन्नात दिसू लागेल. नुकत्याच केलेल्या  भांडवल उभारणीने कंपनीचा ताळेबंद मजबूत झाला आहे. सरकारचे धोरणही दूरसंचार कंपन्यांना दिलासा देणारे झाले आहे. व्होडा-आयडियानेदेखील २० ते २५ टक्के दरवाढ केली आहे. रिलायन्स जिओकडूनही दरवाढ अपेक्षित आहे. भारती एअरटेलचे पतमानांकन ‘मूडीज्’ने वाढविले आहे. सध्याच्या बाजारभावात वर्षभराच्या मुदतीसाठी खरेदीची संधी आहे.

स्टेट बँक: स्टेट बँकेच्या बुडीत कर्जाचे प्रमाण सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सर्वात कमी ४.९ टक्क्य़ांवर आले आहे. बँकेने सतरा हजार कोटींचा विक्रमी नफा सप्टेंबरअखेरच्या तिमाहीत मिळविला होता. बँकेने बुडीत जाऊ  शकणाऱ्या कर्जाच्या ८८ टक्के तरतूद केली आहे. डीएचएफएलला दिलेल्या कर्जाची परतफेड झाली आहे. एसबीआय कार्ड व म्युच्युअल फंड व्यवसायाने चांगली नफा क्षमता सिद्ध केली आहे. मात्र विमा व्यवसायाला करोनामुळे थोडा फटका बसला आहे. थकीत कर्जावर पुरेसे नियंत्रण, डिजिटल सेवांवर दिलेला भर यामुळे पुढील दोन वर्षांत बँक चांगली कामगिरी करू शकेल. सध्याच्या भावात खरेदी चांगला फायदा मिळवून देईल.

एचसीएल टेक्नॉलॉजी: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची उन्नती अजून काही वर्षे अशीच सुरू राहणार आहे. या कंपन्यांच्या समभागातील क्वचित होणारी घसरण त्यामध्ये गुंतवणूक वाढविण्याची संधी देते. सध्या या दृष्टीने एचसीएल टेक्नॉलॉजीचे समभाग उजवे वाटतात. कंपनीला नवीन मिळालेली कंत्राटे, वाढलेले मनुष्यबळ या काही जमेच्या बाजू आहेत. कंपनीने नक्त नफ्याच्या ७५ टक्के वाटा भागधारकांना द्यायचे धोरण ठरविले आहे. बाजारातील सध्याच्या भावातील खरेदी एक वर्षांच्या मुदतीमध्ये चांगला फायदा मिळवून देईल.

सीमेन्स: भारतातील इंजिनीअरिंग, ऊर्जा व्यवस्थापन, आरोग्याशी निगडित तंत्रज्ञान, ऑटोमेशन व कंट्रोल, रेल्वे सिग्नलिंग व सुरक्षा प्रणाली अशा अनेक उच्च तांत्रिक सेवा देणाऱ्या या कंपनीने सप्टेंबरअखेरच्या वर्षांचे निकाल जाहीर केले. कंपनीने करोनापूर्व काळाची व्यवसाय पातळी गाठली आहे. कंपनीकडे १३,५०० कोटींच्या मागण्या आहेत. सरकारी व खासगी भांडवली प्रकल्पातील संधी घेण्यासाठी सीमेन्सच्या समभागांमध्ये गुंतवणूक करता येईल. निकाल जाहीर झाल्यावर नफ्याचे प्रमाण कमी असल्यामुळे समभागात घसरण झाली आहे, पण ही खरेदीची संधी आहे. बाजारात आलेल्या अशा मंदीच्या लाटांचे संधीत रूपांतर करणे हे ‘पोर्टफोलियो’ व्यवस्थापनांतील मोठे कसब आहे. अशा वेळी हातात रोकड सुलभता असण्यासाठी सुगीच्या काळात केलेली नफावसुलीच कामी येते. जर ती नसेल तर अल्प मुदतीसाठी घेतलेले समभाग भले तोटय़ात विकावे लागले तरी ते विकून दीर्घ मुदतीसाठी घेतलेल्या दिग्गज कंपन्यांच्या समभागांची खरेदी करून गुंतवणुकीची सरासरी किंमत कमी करता येते. गेल्या काही दिवसांत प्राथमिक समभागांच्या विक्रीने बाजारातील रोकड तरलता कमी केली आहे. परदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीचा सपाटा सुरूच आहे. चालू महिन्यात पंचवीस हजार कोटी रुपये मूल्याच्या समभागांची त्यांनी विक्री केली आहे. ती वर्षअखेपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. करोनाच्या नव्या विषाणूने गुंतवणूकदारांच्या मनात भीती निर्माण केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील याची गंभीर दखल घेतली आहे. परिणामी गुंतवणूकदारांना ‘पोर्टफोलिओ’च्या फेररचनेची संधी अजूनही मिळेल.