डॉ. आशीष थत्ते
कंपन्यांमध्ये विशेषत: मोठय़ा अधिकाऱ्याला उत्तराधिकारी निवडताना हुबेहूबतेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. अर्थात असे होतेच असे नाही, पण तरीही सल्ला मात्र दिला जातो. म्हणजे जेव्हा एखाद्या मोठय़ा अधिकाऱ्याला त्याचा उत्तराधिकारी निवडण्याची जबाबदारी येते तेव्हा तो असा माणूस निवडतो जो हुबेहूब त्याच्या सारखा असतो. म्हणजेच दिसण्यात नाही तर इतर काही गोष्टी आणि गुणांमुळे. उत्तराधिकारी कुठल्या विद्यापीठात शिकला किंवा कुठले शिक्षण घेतले वगैरे. याशिवाय कंपन्यांमध्ये अजून देखील काही निकष असतात. कुठे पहिली नोकरी केली किंवा कोणत्या विभागामध्ये सुरुवात केली. मोठय़ा पदासाठी उत्तराधिकारी निवडताना जी काळजी घेतली जाते त्याचप्रमाणे कनिष्ठ पदासाठी मुलाखती घेताना देखील असे निकष लावले जातात. मात्र अशावेळेला त्या अधिकाऱ्याला निवडीपासून दूर ठेवण्यात येते किंवा मुलाखतीसाठी समिती/ मंडळ बनवून मुलाखत घेतली जाते म्हणजे हुबेहूबतेच्या निकषांचे दुष्परिणाम टाळता येतात.

डॉपेलगँगर किंवा हुबेहूबता तशी काही आपल्याला नवीन नाही. जगात एकसारखी दिसणारी सात माणसे असतात असे म्हटले जाते. आपल्या घरात देखील आपण हुबेहूबता आणण्याचा प्रयत्न करतो. घरातील लहान मुले मोठय़ांचे अनुकरण करतात. हे म्हणजे एक प्रकारे हुबेहूबताच आणण्याचा प्रयत्न असतो. तो बऱ्याचदा नकळत होतो पण तरीही होतो हे मात्र निश्चित. डॉक्टर घरात मुलांना आपसूकच डॉक्टर होण्याची प्रेरणा मिळते, व्यवसाय करणाऱ्यांच्या व्यावसायिक घराण्यात मुले त्याच किंवा त्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारच्या व्यवसायाकडे वळतात. आपल्या आजूबाजूला हुबेहूबतेची अनेक उदाहरणे दिसतील. फक्त दिसण्यात नाही तर जीवनात काहीतरी करण्यात त्याचे प्रतििबब असते. अर्थात हा एक व्यवस्थापनाचा नियम असल्याने शंभर टक्के लागू होतो असे नाही. मात्र सामान्यपणे राजकारण्यांची मुले राजकारणात, नटनटय़ांची मुली/मुले अभिनय क्षेत्रात किंवा अगदी खेळाडूंची मुले त्याच खेळात उतरतात. याचे मुख्य कारण म्हणजे उतराधिकारी निवडतानाचे निकष. जेणेकरून पुढे जाऊन लोकांनी त्यांना त्याच्या आई/वडिलांचे उत्तराधिकारी म्हणून पाहावे.

आपले सध्याचे मुख्यमंत्री असेच त्यांच्या राजकीय गुरूंचे उत्तराधिकारी आहेत. त्यांची सगळय़ांनी उत्तराधिकारी म्हणून निवड करताना त्यांच्या लोकसेवेच्या भावनेला निश्चित बघितले असेल. पण त्यांचे गुरूंसारखे दिसणे हे एक कारण असू शकते. किंबहुना त्यांच्यावरील चित्रपटात थोडीशी झलक मिळते. उत्तराधिकारी निवडतानाची हुबेहूबता बघायची असेल तर जुन्या गोलमाल चित्रपटात उत्पल दत्त जेव्हा अमोल पालेकर यांची मुलाखत घेतात तो भाग नक्की पहा. अगदी आचार विचार नाही तर पोशाख, आवडनिवड किंवा मिशी देखील असावी असा आग्रह होतो. कंपन्यांमध्ये उत्तराधिकारी निवडताना किंवा सामान्यपणे उत्तराधिकारी ठरवताना हुबेहूबता हा निकष मोठय़ा प्रमाणात प्रभाव टाकतो. मग काय उत्तराधिकारी होताय का शोधताय?