माझा पोर्टफोलियो : दीघरेद्देशी कामगिरीसाठी ‘अल्प बीटा’ शिलेदार

कंपनीचे सप्टेंबर २०२१ साठी संपलेल्या तिमाही/ सहामाहीचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून ते अपेक्षेपेक्षा चांगले आहेत.

अजय वाळिंबे

ट्रॅक्टर्ससाठी डिझेल इंजिन्स उत्पादित करणाऱ्या स्वराज इंजिन्सची स्थापना ३२ वर्षांपूर्वी म्हणजे १९८९ मध्ये झाली. त्या वेळी पंजाब ट्रॅक्टर्स आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन्स प्रवर्तक असलेली स्वराज इंजिन्स आज २२ ते ६५ अश्वशक्तीपर्यंत विविध प्रकारच्या डिझेल इंजिन्सचे उत्पादन करते. कंपनी इंजिन्सच्या सुटय़ा भागांचेदेखील उत्पादन आणि वितरण करते. स्वराज माझ्दा आणि महिंद्र ट्रॅक्टर हे कंपनीचे प्रमुख ग्राहक आहेत. कंपनीचा उत्पादन प्रकल्प पंजाबमधील मोहाली येथे आहे. गेल्या तीन दशकांत कंपनीने सातत्याने उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. आजवर १० लाखांहून अधिक इंजिन्स पुरविणाऱ्या स्वराज इंजिन्सची उलाढाल १,००० कोटींहून अधिक असून कंपनीकडे ८००हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. पंजाब ट्रॅक्टर्सचा हिस्सा महिंद्र समूहाने ताब्यात घेतल्यापासून सध्या कंपनीचे प्रवर्तक महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र (३४.७६ टक्के) तसेच किर्लोस्कर इंडस्ट्रीज (१७.४३ टक्के) आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कंपनीने आपल्या उत्पादनांत वेळोवेळी आवश्यक बदल करून आपले स्थान पक्के ठेवले आहे. 

कंपनीचे सप्टेंबर २०२१ साठी संपलेल्या तिमाही/ सहामाहीचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून ते अपेक्षेपेक्षा चांगले आहेत. या सहामाहीत कंपनीने उलाढालीत ६०.८ टक्के वाढ नोंदवून ती ६५८.३० कोटींवर गेली आहे, तर नक्त नफ्यात तब्बल ९२.८ टक्के वाढ होऊन तो ३४.९६ कोटींवरून ६७.४२ कोटींवर गेला आहे. 

सध्या शेअर बाजारातील अनिश्चितता वाढली आहे. अशा वेळी कुठलेही कर्ज नसलेली केवळ ०.२ बीटा असलेली स्वराज इंजिन्ससारखी कंपनी गुंतवणूक योग्य वाटते. सध्या १,७०० रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर थोडा महाग वाटत असला तरीही जाणकार आणि अनुभवी प्रवर्तक, गुणवत्ता तसेच सातत्याने केलेली उत्तम कामगिरी यामुळे एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून स्वराज इंजिन्स तुमच्या पोर्टफोलियोमध्ये असायला हरकत नाही.

स्वराज इंजिन्स लिमिटेड

(बीएसई कोड – ५००४०७)

शुक्रवारचा बंद भाव : रु. १,७२१/-

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक : रु. २,००० / १,२५५

बाजार भांडवल : रु. २,०८९ कोटी

भरणा झालेले भागभांडवल : रु. १२.१४ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक         ५२.१५    

परदेशी गुंतवणूकदार      १.४७     

बँक/ म्यु. फंड/ सरकार   ९.०७     

इतर/ जनता     ३७.३१

संक्षिप्त विवरण

* शेअर गट    : स्मॉल कॅप

* प्रवर्तक       : महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र,                किर्लोस्कर इंडस्ट्रीज

* व्यवसाय क्षेत्र  :   डिझेल इंजिन्स

* पुस्तकी मूल्य : रु. २१८

* दर्शनी मूल्य : रु. १०/-

* गतवर्षीचा लाभांश : ६९०%

शेअर शिफारसीचे निकष

*  प्रति समभाग उत्पन्न :      रु. १०२.९८

*  पी/ई गुणोत्तर :      १६.७

*  समग्र पी/ई गुणोत्तर : २०.६

*  डेट इक्विटी गुणोत्तर :       ००

*  इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :    —

*  रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड :       ४८.१

*  बीटा :      ०.२ सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Swaraj engines limited company profile zws

Next Story
‘अर्थ’पूर्ण : जेवढय़ा लवकर सुरू कराल तेवढे चांगले!
ताज्या बातम्या