कामगिरीत उज्ज्वलता!

भांडवली वस्तू या गटात मोडणारी स्विस ग्लासकोट इक्विपमेंट्स लि. ही एक छोटय़ा चणीची कंपनी.

av-06स्विस ग्लासकोट इक्विपमेंट्स लिमिटेड
* भांडवली वस्तू या गटात मोडणारी स्विस ग्लासकोट इक्विपमेंट्स लि. ही एक छोटय़ा चणीची कंपनी. ग्लास वूल आच्छादनासाठी विविध रसायने आणि तेलशुद्धीकरण उद्योगात वापरावयाच्या उपकरणांची व सुटय़ा भागांची निर्मिती व विक्री ही कंपनी करते. देशांत आणि परदेशातील बाजारपेठेत कंपनीच्या उत्पादनांची विक्री होत आहे. कंपनीच्या प्रमुख उत्पादनांत इव्हॅप्युरेशन व्हेसल्स, ग्लास लाइन्ड रिअ‍ॅक्टर, हिट एक्स्चेंजर, ब्लेंडर्स, अ‍ॅजिटेटेड फिल्टर्स, प्रोसेस टँक, ग्लास लाइन्ड फिल्टर्स, कंडेन्सर्स, ग्लास लाइन्ड फिटिंग्ज व पाइप्स यांचा समावेश होतो. कंपनीची उत्पादने औषध निर्माण, डाइज व पिग्मेंट, रासायनिक खते या उद्योगात वापरली जातात. ग्लास वूल हे उत्पादन उष्णतेचे वहन होऊ नये म्हणून लोखंडी पाइप व इतर यंत्रसामग्रीवर रसायनाच्या सहाय्याने चिकटविले जाते.
गुजरात राज्यात १९९१ मध्ये स्विस ग्लासकोट या कंपनीचे कार्यान्वयन झाले. कंपनीचे भागभांडवल पाच कोटी रुपयांचे असून, भागभांडवलात प्रवर्तकांचा वाटा ३५.७२ टक्के आहे. १६.५१ कोटी रुपयांची तिच्याकडे रोख गंगाजळी आहे. कंपनीचे पुस्तकी मूल्य ३१ मार्च २०१४ रोजी ४५.२९ रुपये होते. सप्टेंबर २०१४ अखेर म्हणजे आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीचे कंपनीचे निकाल अव्वल आहेत. विक्री १६.१६ कोटींवरून २४.२९ कोटी रुपये झाली आहे. प्राप्तिकरापोटी तरतुदीत सुमारे ५० टक्क्य़ांनी वाढ होऊन निव्वळ नफाही ५० टक्क्य़ांनी वाढून १.१८ कोटी रुपये झाला आहे. संपूर्ण वर्षांची विक्री १०० कोटी आणि नफा पाच कोटी रुपयांवर जाण्याची अपेक्षा आहे.

मूल्यांकन: कंपनीच्या समभागाच्या विद्यमान भावाचे २०१५ च्या उत्सर्जनाशी (ईपीएस) प्रमाण १०.७ पट आहे. आणि २०१६ च्या अपेक्षित उत्सर्जनाशी हे प्रमाण ८.७ पट आहे. कंपनी सातत्याने लाभांश जाहीर करीत असून, २०१४ सालात तिने २२ टक्के लाभांश दिला आहे. पुढील एका वर्षांसाठी समभागाचे १२५ रुपयांचे लक्ष्य निर्धारीत करीत आहोत.
सचिन सेठ (शेअरखान या दलाली पेढीचे विश्लेषक)
ई-मेल: s.seth@sharekhan.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Swiss glascoat equipments ltd

ताज्या बातम्या