आपलेही करविषयक प्रश्न असतील तर ते आपण pravin3966@rediffmail.com या ई-मेलवर अथवा लोकसत्ता कार्यालय, ‘अर्थ वृत्तान्त’, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई- ४०००२१ या पत्त्यावर पाठवू शकता. अथवा ई-मेल: arthmanas@expressindia.com
प्रश्न : मी नुकतेच एक घर ५८ लाख रुपयांना विकले. हे घर मी २००८ मध्ये २० लाख रुपयांना खरेदी केले होते. या घराच्या विक्रीतून मिळालेले पसे मी खालील प्रमाणे वापरणार आहे :
१. गृह कर्जाच्या परतफेडीसाठी ७ लाख रुपये
२. माझ्या आणि भावाच्या नावाने घेतलेल्या गृह कर्जाची परतफेड २० लाख रुपये
३. दुसऱ्या घरासाठी १५ लाख रुपये
४. माझ्या सासऱ्यांच्या घरावर एक मजला बाधण्यासाठी ६ लाख रुपये
    या शिवाय माझ्याकडे ९ लाख रुपये उरतात.
मला नेमका किती कर भरावा लागेल?
 एक वाचक
उत्तर : या साठी आपल्याला भांडवली नफा किती झाला आहे ते काढावा लागेल. हा भांडवली नफा  खालील प्रमाणे :
घराची विक्री किंमत     ५८ लाख रुपये
खरेदी किंमत     २० लाख रुपये
महागाई निर्देशाकानुसार
खरेदी मूल्य :    ३५,१८,९०० रुपये
(महागाई निर्देशांक २००८-०९ = ५८२;
महागाई निर्देशांक २०१४-१५ = १०२४)
भांडवली नफा     २२,८१,१०० रुपये
हा भांडवली नफा जर तुम्ही दुसऱ्या घरात गुंतविला तर तुम्हाला कलम ५४ प्रमाणे कर भरावा लागणार नाही. या रकमेतून आपण स्वत:च्या किंवा भावाच्या कर्जाच्या परतफेडीची केली तर याची वजावट कलम ५४ प्रमाणे मिळू शकत नाही. हे नवीन घर तुमच्या मालकीचे असले पाहिजे. त्यामुळे तुम्ही सासऱ्यांच्या घरावर एक मजला बांधण्यासाठी ६ लाख रुपये खर्च केले तर त्याचीसुद्धा वजावट या कमलाप्रमाणे मिळू शकत नाही. आपण नवीन घरासाठी १५ लाख रुपये दिले आहेत. त्याचा ताबा आपल्याला जर घर विकत घेतले तर दोन वर्षांत घेतला पाहिजे किंवा घर बांधले तर तीन वर्षांत बांधून पूर्ण झाले पाहिजे. त्यामुळे आपल्याला फक्त १५ लाख रुपयांची वजावट या कलमाप्रमाणे मिळू शकते आणि आपल्याला ७,८१,१०० रुपये (भांडवली नफा २२,८१,१०० रुपये वजा १५,००,००० रुपये कलम ५४ प्रमाणे गुंतवणूक) इतक्या रकमेवर २०% कर भरावा लागेल.
प्रश्न :  माझी भाची अनिवासी भारतीय आहे. तिला तिच्या जवळच्या नातेवाईकाकडून एक घर भेट मिळाले होते. तिला जर हे घर विकावयाचे असेल तर कोणत्या रकमेवर किती कर भरावा लागेल? कर भरल्या ॉनंतर हे पसे ती भारताबाहेर पाठवू शकते का?
    – प्रभाकर नाईक
उत्तर : प्राप्तीकर कलम ४९ प्रमाणे जर घर भेट म्हणून मिळालेले असेल तर त्याचे खरेदी मूल्य हे आधीच्या मालकाने ज्या किमतीला विकत घेतले होते ते विचारात घेतले जाईल. या शिवाय खरेदी मूल्य महागाई निर्देशांक मुल्यानुसार काढून त्यावर कर भरावा लागेल.
उदा. हे घर ज्या नातेवाईकाने भेट दिले आहे त्यांनी १९८६ मध्ये १५ लाख रुपयांना विकत घेतले आणि ते त्यांनी १९९८ मध्ये आपल्या भाचीला भेट दिले. हे घर भाचीने २०१४ मध्ये ८० लाख रुपयांना विकले तर भांडवली नफा काढताना १९९८-९९ चे आणि २०१४-१५ चे महागाई निर्देशांक मूल्य विचारात घ्यावे लागेल. या रकमेवर कर भरावा लागेल. कर भरल्यानंतर हे पसे आपल्याला भारता बाहेर पाठवता येतात त्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागते.
प्रश्न : मी डिसेंबर २०१२ मध्ये एक व्यावसायिक जागा १० लाख रुपयांना विकत घेतली होती. ही जागा मी सप्टेंबर २०१४ मध्ये १६,०९,००० रुपयांना विकली मला किती कर भरावा लागेल? कर वाचविण्यासाठी काही उपाय आहे का?
    – जी. टी. गराले
उत्तर : ही जागा खरेदी केल्या दिवसापासून तीन वर्षांच्या आत विकल्यामुळे यावर होणारा भांडवली नफा हा लघु मुदतीचा आहे. कलम 54F आणि कलम 54EC प्रमाणे वजावट ही फक्त दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यासाठी उपलब्ध असल्यामुळे आपल्याला त्याचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे झालेल्या नफ्यावर ६,०९,००० रुपये (विक्री किंमत १६,०९,००० रुपये वजा खरेदी किंमत १० लाख रुपये) हा इतर उत्पन्नामध्ये मिळवला जाऊन आपल्या स्ल्यॅबप्रमाणे कर भरावा लागेल.

प्रश्न :  प्राप्तीकर कायद्यात ज्येष्ठ नागरिकांचे दोन गट आहेत एक ज्येष्ठ नागरिक ६० ते ८० वर्ष आणि दुसरा अति ज्येष्ठ नागरिक ८० वर्षांपेक्षा जास्त. मला नोव्हेंबर २०१४ मध्ये वयाची ८० वर्ष पूर्ण होतात. आíथक वर्ष २०१४-१५ मध्ये मला अति ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी ५ लाख रुपयांची सवलत मिळू शकेल का? माझे करपात्र उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे. तेव्हा मला विवरण पत्र भरणे बंधनकारक आहे का?
– माधव लळीत
उत्तर : आíथक वर्षांत ज्यांचे वय ६० किंवा ६० वर्षांपेक्षा जास्त आणि ८० वर्षांपेक्षा कमी आहे ते ज्येष्ठ नागरिक आहेत. आणि ज्यांचे वय आíथक वर्षांत ८० किंवा ८० वर्षांपेक्षा जास्त आहे ते अतिज्येष्ठ नागरिक होतात. आपल्याला आíथक वर्ष २०१४-१५ मध्ये वयाची ८० वर्षे पूर्ण होत असल्यामुळे करनिर्धारण वर्ष २०१५-१६ मध्ये अतिज्येष्ठ नागरिकांच्या सवलती घेता येतील. जर आपले उत्पन्न कमाल करमुक्त उत्पन्नापेक्षा कमी असले तर विवरणपत्र भरणे बंधनकारक नाही. परंतु २०१२ पासून ज्या निवासी भारतीयांची भारताबाहेर काही संपत्ती असेल किंवा भारताबाहेरील खाते असेल किंवा भारताबाहेरील खात्यात अधिकृत हस्ताक्षर असेल तर विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे.
    
प्रश्न : मी माझ्या आणि माझ्या अजाण मुलाच्या नावाने लोक भविष्य निधी (ढढा) अशी दोन खाती उघडली आहेत. या खात्यात मी प्रत्येकी दीड लाख रुपये जमा करू शकतो का? मला प्राप्तीकरामध्ये किती सवलत मिळू शकेल?
– एक वाचक
उत्तर : आपण स्वतच्या आणि अजाण मुलाच्या नावे असलेल्या लोक भविष्य निधी (ढढा) खात्यात एका वर्षांत एकूण दीड लाख रुपये जमा करू शकता. प्राप्तीकर खात्यातील तरतुदी प्रमाणे कलम ८० क खाली आपल्याला दीड लाखापर्यंत (कर निर्धारण वर्षां २०१५-१६ पासून) कर सवलत मिळू शकते.

प्रश्न : मी एक ज्येष्ठ नागरिक आहे. माझे वय ६६ वष्रे आहे. माझे आíथक वर्ष २०१४-१५ मध्ये उत्पन्न हे म्युच्युअल फंडातील लाभांश ५ लाख रुपये, बँकेतील ठेवीवरील व्याज १,१५,००० रुपये आणि बचत खात्यावरील व्याज हे २५,००० रुपये इतके असेल. या वर्षी मी एक घर विकले आहे. त्यावर मला दीर्घ मुदतीचा नफा झाला तो १२ लाख रुपये इतका आहे. मी हा नफा गुंतवू इच्छित नाही. मला किती कर भरावा लागेल? कर कसा कमी करता येईल.                          – एक वाचक
उत्तर : आपल्याला मिळालेला लाभांश हा करमुक्त असेल. आपले करपात्र उत्पन्न खालील प्रमाणे असेल :

बँकेतील ठेवीवरील व्याज     १,१५,००० रुपये
बचत खात्यावरील व्याज    २५,००० रुपये
भांडवली नफा     १२,००,००० रुपये
————————————————————-
एकूण उत्पन्न     १३,४०,०००० रुपये

कलम 80 ळळअ प्रमाणे बचत खात्यावरील व्याजावर वजावट     १०,००० रुपये
————————————————————-
करपात्र उत्पन्न     १३,३०,००० रुपये
भांडवली नफ्याव्यतिरिक्त
रकमेचे उत्पन्न     १,३०,००० रुपये  
भांडवली नफ्यावरील उत्पन्न     १२,००,००० रुपये

या रकमेवर देय कर
प्रथम ३,००,००० रुपयांवर कर  भरावा लागत नसल्यामुळे भांडवली नफ्याव्यतीरिक्त रकमेवर कर भरावा लागणार नाही. भांडवली नफ्यावरील कर हा (१२,००,००० रुपये वजा १,७०,००० रुपये (३,००,००० रुपये वजा १,३०,००० रुपये) म्हणजेच १०,३०,००० रुपयांवर २०% इतका २,०६,००० रुपये आणि त्यावर ३% शैक्षणिक अधिभार ६,१८० रुपये असे एकूण २,१२,१८० इतका भरावा लागेल. हा कर तुम्ही १,३०,००० रुपये कलम ८० क मध्ये गुंतवणूक केल्यास देय कर कमी होऊ शकतो. ही गुंतवणूक केल्यास तुमचे भांडवली नफ्याव्यतिरिक्त उत्पन्न ० असेल. तुमचा भांडवली नफ्यावरील कर हा (१२,००,००० रुपये वजा ३,००,००० रुपये म्हणजेच ९,००,००० रुपयांवर २०% इतका १,८०,००० रुपये आणि त्यावर ३% शैक्षणिक अधिभार ५,४०० रुपये असे एकूण १,८५,४०० इतका भरावा लागेल. भांडवली नफ्यातून कलम ८० च्या वजावटी घेता येत नाहीत.