taxआपलेही करविषयक प्रश्न असतील तर ते आपण pravin3966@rediffmail.com या ई-मेलवर अथवा लोकसत्ता कार्यालय, ‘अर्थ वृत्तान्त’, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई- ४०००२१ या पत्त्यावर पाठवू शकता. अथवा ई-मेल:arthmanas@expressindia.com
प्रश्न : माझ्या नावाने मुंबईत एक घर आहे. हे घर माझ्या पतीच्या निधनानंतर माझ्या नावाने झाले. ते त्यांनी १९७८ साली विकत घेतले होते. हे घर मी ६० ते ७० लाख रुपयांना विकून नाशिकला ४० ते ५० लाख रुपयांचे घर विकत घेण्याचा विचार करीत आहे. बाकीच्या पशात मी दुसरे घर विकत घेऊ शकते का? हे घर मी मुलाच्या नावाने घेतले तर मला कर भरावा लागेल का?
– सुशीला कसबे
उत्तर: कलम ५४ प्रमाणे एक घर विकून झालेला दीर्घ मुदतीचा भांडवली नफा जर दुसऱ्या घरात गुंतविला, तर त्यावर कर भरावा लागत नाही. या वर्षीच्या अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार फक्त एका घरामधील गुंतवणूक या सवलतीसाठी पात्र आहे. आपल्याला फक्त भांडवली नफ्याची गुंतवणूक करावयाची आहे. यासाठी १९८१ सालचे बाजारभाव मूल्य विचारात घेऊन महागाई निर्देशांकानुसार खरेदी मूल्य आणि विक्री किंमत यांचा फरक काढावा, हा भांडवली नफा असेल. या नफ्याएवढी किंवा जास्त गुंतवणूक एका घरात केली तर कर भरावा लागणार नाही. हे घर आपण मुलाच्या नावे घेतल्यास आपल्याला कर भरावा लागेल.

प्रश्न : मी एक ज्येष्ठ नागरिक आहे. निवृत्तिवेतन आणि बँकेतील विविध ठेवींवरील व्याज हे माझे उत्पन्न आहे. माझा आíथक वर्ष २०१४-१५ सालचा देय कर अंदाजे ३०,००० रुपये इतका आहे. मला अग्रिम कर किती भरावा लागेल?
जयंत पाटील<br />उत्तर: आपण ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे अग्रिम कराच्या तरतुदी आपल्याला लागू नाहीत. त्यामुळे हा कर आपल्याला विवरणपत्र भरण्यापूर्वी भरावा लागेल; परंतु जर ज्येष्ठ नागरिकाच्या उत्पन्नामध्ये धंदा किंवा व्यवसायाच्या उत्पन्नाचा समावेश असेल, तर त्यांना अग्रिम कर भरावा लागतो.

प्रश्न: माझा मुलगा २०१० साली अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेला. त्यानंतर त्याने तेथेच नोकरी स्वीकारली. तेव्हापासून तो तेथेच आहे. त्याने २०१३ पर्यंत विवरणपत्रे भरली. २०१४ चे विवरणपत्र भरले नाही. त्याचे बँकेत एनआरई खाते आहे आणि त्या खात्यावरील व्याज एवढेच उत्पन्न भारतात आहे. त्याला विवरणपत्र भरणे गरजेचे आहे का?
– दीपक सप्रे
उत्तर: आपला मुलगा २०१० पासून भारताबाहेर असल्यामुळे तो अनिवासी भारतीय आहे. त्याला मिळणारे एनआरई खात्यातील व्याज हे करमुक्त आहे. याशिवाय भारतात दुसरे उत्पन्न नसेल, तर विवरणपत्र भरणे बंधनकारक नाही.

प्रश्न : पोस्ट खात्यातील ‘सीनियर सिटिझन सेव्हिंग्ज स्कीम’च्या अंतर्गत ठेवलेल्या मुदत ठेवीवर ८० सीकलमाप्रमाणे सवलत मिळते का?
– निर्मल मुठा
उत्तर: सीनियर सिटिझन सेव्हिंग्ज स्कीम, २००४ च्या अंतर्गत ठेवलेल्या रकमेवर कलम ८० सीअंतर्गत वजावट घेता येते.

प्रश्न : मी माझ्या उच्च शिक्षणासाठी एका भारताबाहेरील विद्यापीठात १२ लाख रुपये शैक्षणिक शुल्क भरले आहे. यासाठी मी शैक्षणिक कर्ज घेतले होते. मला प्राप्तिकर कायद्याप्रमाणे ८० सीआणि ८० ई च्या सवलती मिळू शकतील का?
– श्रीनाथ कुलकर्णी
उत्तर: कलम ८० सीप्रमाणे मिळणारी सवलत ही फक्त भारतातच असलेल्या विद्यापीठ, शाळा, कॉलेज इत्यादींना भरलेल्या शिक्षण शुल्कासाठी मिळते. शिवाय ही सवलत जास्तीत जास्त दोन अपत्यांच्या शिक्षणासाठी मिळते, स्वत:च्या शिक्षणासाठी नव्हे. त्यामुळे ८० सीप्रमाणे सवलत आपल्याला मिळणार नाही. कलम ८० ईप्रमाणे मिळणारी सवलत जर त्यामधील अटींची पूर्तता केली असेल तर मिळू शकेल.

प्रश्न: माझ्या मित्राने मला ९०,००० रुपये भेट दिले. माझ्या माहितीप्रमाणे ५०,००० रुपयांच्या भेटी करमुक्त आहेत. मला कर ४०,०००  रुपयांवर भरावा लागेल की पूर्ण ९०,००० रुपयांवर?
    – अरिवद बने
उत्तर : कलम ५६ प्रमाणे एकूण रोखीने मिळालेल्या भेटी जर ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असतील, तर त्या भेटी करपात्र असतात. त्यामुळे आपल्याला मिळालेली भेट ९०,००० रुपये ही करपात्र आहे.

प्रश्न: माझे एक दुकान आहे. एकूण विक्री ही वर्षांला ५० लाख रुपयांपर्यंत आहे. त्यावर माझा नफा हा वार्षिक ३ लाख रुपये इतका आहे. मला माझ्या खात्याचे लेखा परीक्षण करणे गरजेचे आहे का?
– मयूरेश गोखले
उत्तर: ज्यांची धंद्यातील वार्षकि उलाढाल १ कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि व्यवसायाची उलाढाल ही २५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर कलम ४४ अबप्रमाणे त्यांना खात्याचे लेखा परीक्षण करून घेणे बंधनकारक असते. ज्यांची वार्षकि उलाढाल ही वरील रकमेपेक्षा कमी असेल, तर त्यांना खात्याचे लेखा परीक्षण करून घेणे बंधनकारक नाही; परंतु कलम ४४ अडच्या तरतुदीनुसार जर पात्र धंद्यातील उलाढाल ही एक कोटी रुपयांपेक्षा कमी असेल आणि त्यांनी उलाढालीच्या ८% पेक्षा कमी नफा दाखविला असेल, तर त्यांना खात्याचे लेखा परीक्षण करून घेणे बंधनकारक आहे. आपल्या धंद्याची उलाढाल ही एक कोटी रुपयांपेक्षा कमी आहे; परंतु आपण नफा ३ लाख रुपये म्हणजेच ६% इतका दाखविला आहे. त्यामुळे आपल्याला लेखा परीक्षण बंधनकारक आहे. जर आपण नफा ९% इतका म्हणजे ४ लाख रुपये इतका दाखविला, तर लेखा परीक्षण न करता विवरणपत्र दाखल करता येते.

प्रश्न: मी ज्येष्ठ नागरिक आहे. या वर्षी मला शेअर्स विक्रीतून २,५५,००० रुपयांचा अल्प मुदतीचा नफा झाला. माझे इतर उत्पन्न ७५,००० रुपये आहे. याशिवाय माझी ‘८० सी’अंतर्गत १,५०,००० रुपयांची गुंतवणूक आहे. शेअर्सच्या विक्रीवर रोखे उलाढाल कर (एसटीटी) भरला आहे. माझे इतर उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी आहे. मला २,५५,००० रुपयांवर १५% कर भरावा लागेल का?
– एक वाचक
उत्तर: आपले करपात्र उत्पन्न आणि देय कर हा खालीलप्रमाणे:
अल्पमुदतीचा नफा     ” २,५५,०००
इतर उत्पन्न     ” ७५,०००
    ——————-
एकूण उत्पन्न     ” ३,३०,०००
कलम ८० सी वजावट     “७५,०००       

 ——————-
करपात्र उत्पन्न      “२,५५,०००
तुमच्यासाठी करपात्र उत्पन्न २,५५,००० रुपये होईल आणि यावर कर भरावा लागणार नाही. कलम ‘८० सी’ची वजावट ही अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यासाठी मिळत नाही; तथापि तुमच्या बाबतीत अल्प मुदतीचा नफा हा करपात्र उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा कमी असल्यामुळे कर भरावा लागणार नाही.