बाजाराचा तंत्र-कल: तेजीत सहभागी व्हावं की नाही, हाच प्रश्न?

अवघ्या दीड महिन्यांत निफ्टी निर्देशांकावर २,००० अंशांची भूमिती श्रेणीतील तेजी. त्याची वेळही कोणती? रशिया-युक्रेन युद्धाचं भिजत पडलेलं घोंगडं.

बाजाराचा तंत्र-कल: तेजीत सहभागी व्हावं की नाही, हाच प्रश्न?

आशीष ठाकूर
अवघ्या दीड महिन्यांत निफ्टी निर्देशांकावर २,००० अंशांची भूमिती श्रेणीतील तेजी. त्याची वेळही कोणती? रशिया-युक्रेन युद्धाचं भिजत पडलेलं घोंगडं. ते निस्तरत नाही तोवर चीन-तैवान युद्धसदृश परिस्थिती. त्यात आपल्याकडे तर्कसंगत विचारसरणीच्या विरोधातील वर्तणूक – युद्ध म्हटलं की आपल्या बाजारात तेजीला बहर. अशा गोंधळून टाकणाऱ्या घटनाक्रमामुळे गुंतवणूकदारांच्या मनातही ‘तेजीत सहभागी व्हावं की नाही’ असा संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

जेव्हा युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनिश्चितता, संभ्रमावस्था असते तेव्हा आपल्या बाजारात तेजीचा बार उडत असतो. युद्धाच्या पार्श्वभूमीवर सामान्य गुंतवणूकदार तर्कसंगत विचारसरणीच्या आधारे थोडा सावध पवित्रा घेतो. रोकड राखून ठेवण्याचा कल तो अवलंबतो. हे सामान्य गुंतवणूकदारांचे धोरण अतिशय योग्य, समयोचितदेखील असते. पण हे काही आमच्या बाजाराला रुचत नाही. आमच्या बाजाराची धारणा..‘डर के आगे जीत है’ अशा धाटणीची असल्यामुळे, युद्ध म्हटल की ‘तेजीचा बार’ ठरलेला! खरं वाटत नाही ना? यासाठी मागील घटनांचा आढावा घेऊया..

यापूर्वी १९९९ सालचं ‘कारगिल युद्ध’ प्रत्यक्ष भारतभूमीत घडलेले. त्या वेळेलादेखील ३ मे ते २६ जुलै या युद्धकाळात निफ्टी निर्देशांक ९६८ वरून १,३६७ पर्यंत झेपावला. पुढे याच तेजीचा विस्तार पावत, तिचे ‘संगणक व माहिती-तंत्रज्ञान’ तेजी म्हणून नामकरण झाले. ज्यातून निफ्टी निर्देशांकाने फेब्रुवारी २००० मध्ये १,८१८ चा उच्चांक नोंदवला.

तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेण्याच्या कालावधीत १ मे ते १५ ऑगस्ट २०२१ या कालावधीत, ३ मेला निफ्टी निर्देशांक १४,४१६ वरून १३ ऑगस्टला १६,५४३ पर्यंत झेपावला, या युद्धात २,००० अंशांची तेजी निफ्टी निर्देशांकावर अवतरली. चालू वर्षांतील रशिया-युक्रेन युद्धाच्या वेळेस (२४ फेब्रुवारीला सुरू झाले, जे अजून चालूच आहे) ८ मार्च ते ४ एप्रिलच्या दरम्यान निफ्टी निर्देशांक १५,६७१ वरून १८,११४ वर झेपावला. म्हणजे युद्ध टिपेवर असताना निफ्टी निर्देशांकावर २,४४३ अंशांची तेजी अवतरली.

आता चालू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत, निफ्टी निर्देशांकाला १७,००० स्तराचा आधार असेल. हा स्तर राखल्यास निफ्टी निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष्य १७,५०० ते १७,७५० आणि द्वितीय लक्ष्य १८,१०० असेल. या स्तरावर अत्यल्प मुदतीची गुंतवणूक धारणा (शॉर्ट टर्म ट्रेडर) असलेल्या गुंतवणूकदारांनी, निफ्टी निर्देशांकाच्या प्रत्येक वाढीव टप्प्यावर, २० टक्क्यांच्या पाच तुकडयांत समभागाची विभागणी करून, आपल्या समभागांची नफारूपी विक्री करून मुद्दल व नफा सुरक्षित करावा. हेच गुंतवणूकदारांना पडलेल्या ‘तेजीत सहभागी व्हावं की नाही’ या समयोचित प्रश्नाचे उत्तर. वरील विवेचनातून ते देण्याचा प्रयत्न केला आहे.

निकालपूर्व विश्लेषण
१) इंडियन हॉटेल कंपनी लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल – सोमवार, ८ ऑगस्ट
५ ऑगस्टचा बंद भाव – २६९.८० रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – २६५ रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २६५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २९५ रुपये, द्वितीय लक्ष्य ३२० रुपये.
ब)निराशादायक निकाल : २६५ रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत २४० रुपयांपर्यंत घसरण.

२) टाटा केमिकल्स लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल- मंगळवार, ९ ऑगस्ट
५ ऑगस्टचा बंद भाव – ९४८.५० रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ९२० रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ९२० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ९९० रुपये, द्वितीय लक्ष्य १,०६० रुपये.
ब)निराशादायक निकाल : ९२० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ८८० रुपयांपर्यंत घसरण.

३) हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, १० ऑगस्ट
५ ऑगस्टचा बंद भाव – ४१०.८० रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ४१० रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ४१० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४२५ रुपये, द्वितीय लक्ष्य ४५० रुपये.
ब) निराशादायक निकाल : ४१० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ३७५ रुपयांपर्यंत घसरण.

४) टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, १० ऑगस्ट
५ ऑगस्टचा बंद भाव – ७८४.८० रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ८०० रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ८०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ८२५ रुपये, द्वितीय लक्ष्य ८५० रुपये.
ब) निराशादायक निकाल : ८०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ७६० रुपयांपर्यंत घसरण.

शुक्रवारचा बंद भाव :
सेन्सेक्स : ५८,३८७.९३
निफ्टी : १७,३९७.५०

लेखक भांडवली बाजार विश्लेषक
ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
लक्ष्मीची पाऊले.. : ‘एसडब्ल्यूपी’ सेवानिवृत्तीनंतरचा नवा दोस्त
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी