बाजाराचा तंत्र-कल : जल्लोष स्वातंत्र्याचा!

हल्ली तरुण व मध्यमवयीन पिढीला निवृत्ती वेतन नाही, त्यात मुदत ठेवींवर ५.५ टक्क्यांचे जेमतेम व्याज, कामाच्या अतिरिक्त व्यापामुळे, धावपळीमुळे इच्छा असूनही आपल्या समभाग संचाकडे गुंतवणूकदार म्हणावे तसे लक्ष देऊ शकत नाहीत.

बाजाराचा तंत्र-कल : जल्लोष स्वातंत्र्याचा!

आशीष ठाकूर
आज आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आनंदात, उत्साहात जगभरात साजरा होत आहे. अशा समयी बाजारातदेखील नितांत सुंदर तेजी अवतरल्याने सर्वत्र उत्साह, आनंद आणि जल्लोषाने वातावरण भारलेलं आहे. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या. येणाऱ्या दिवसात निफ्टी निर्देशांकाला १७,८०० ते १७,९०० स्तराचा अडथळा असेल. या स्तरावरून एक हलकीफुलकी घसरण अपेक्षित असून या घसरणीत निफ्टी निर्देशांकाला प्रथम १७,४५० व त्यानंतर १७,००० स्तराचा आधार असेल. या स्तराचा आधार घेत निफ्टी निर्देशांक फिरून १७,८०० ते १८,१०० च्या स्तराला गवसणी घालेल.

हल्ली तरुण व मध्यमवयीन पिढीला निवृत्ती वेतन नाही, त्यात मुदत ठेवींवर ५.५ टक्क्यांचे जेमतेम व्याज, कामाच्या अतिरिक्त व्यापामुळे, धावपळीमुळे इच्छा असूनही आपल्या समभाग संचाकडे गुंतवणूकदार म्हणावे तसे लक्ष देऊ शकत नाहीत. अशा वेळेला तांत्रिक विश्लेषण व मूलभूत विश्लेषण (फंडामेंटल ॲनालिसिस) शास्त्रातील सोनेरी नियमांची सांगड घालण्याची साधे, सोपे तंत्र वापरात आणता येईल. मूलभूत विश्लेषणात – पी/ई, ईपीएस, बुक व्हॅल्यू, इबिटा, निव्वळ विक्री, नफा, तर तांत्रिक विश्लेषणातील मूव्हिंग ॲव्हरेजेस, फिबोनासी रिट्रेसमेंट, विविध पॅटर्न ज्यात ट्रेंड लाइन, ट्रँगल, हेड अॅण्ड शोल्डर इत्यादी संकल्पनांना एकत्र करून, विविध प्रमेयांच्या उत्तरांच्या संख्यांची गोळाबेरीज करत, त्यातून गुंतवणूकदारांसाठी अभ्यासपूर्वक एक सर्वसामाईक उत्तर शोधले गेले आहे. ते एका संख्येत परावर्तित करत ‘महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर’ ही संकल्पना गुंतवणूकदारांच्या वरील समस्येच्या समाधानासाठी विकसित केली आहे. प्रत्यक्ष वित्तीय निकाल जाहीर होण्याअगोदर हे विश्लेषण गुंतवणूकदारांना मिळाले तर गुंतवणूकदार त्यावर चिंतन, मनन, तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मानसिक, आर्थिक तयारी करू शकतात. प्रत्यक्ष वित्तीय निकाल जाहीर झाल्यावर विश्लेषण केलेल्या समभागांचा बाजारभाव जर महत्त्वाच्या केंद्रिबदू स्तरावर टिकला तर जाहीर झालेला वित्तीय निकाल चांगला व नमूद केलेली प्रथम, द्वितीयवरची लक्ष्यदेखील साध्य होणार. अल्प मुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांना पर्यायी उत्पन्नाची ही संधी ठरते, पण जे गुंतवणूकदार या क्षेत्राकडे दीर्घ मुदतीची गुंतवणूक जसे की मुलांच्या उच्च शिक्षणासाठीची अथवा निवृत्तीनंतरची तजवीज, अशा दृष्टीने बघत असल्यास ‘महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर’ संकल्पनेचा त्यांना काही फायदा झाला का? यासाठी एक वर्षांपूर्वीचा या स्तंभातील १२ जुलै २०२१ च्या लेखातील ‘इन्फोसिस लिमिटेड’ समभागाचा आढावा घेऊ या. त्या समयी इन्फोसिस लिमिटेडचा ९ जुलैचा बंद भाव १,५६२.७५ होता. महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर हा १,४८० होता. प्रत्यक्ष तिमाही वित्तीय निकालानंतर इन्फोसिस लिमिटेडने १,४८० रुपयांचा स्तर राखत, लेखात नमूद केलेले १,७०० रुपयांचे वरचे लक्ष्य १८ ऑगस्टला १,७५५ चा उच्चांक मारत साध्य केले. आता दीर्घ मुदतीची गुंतवणूक धारणा असलेले गुतंवणूकदार चांगल्या प्रतीचे, काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेल्या कंपन्यांच्या समभागात जीवनभराची पुंजी गुंतवितात, ज्यायोगे निवृत्तीनंतरचे जीवन सुखात जाईल, पण निसर्ग नियमानुसार सूर्योदयानंतर सूर्यास्त, भरतीनंतर ओहोटी त्याप्रमाणे तेजीनंतर मंदी ठरलेली, तसेच कंपनी कितीही प्रथितयश, नावाजलेली असो कंपनीच्या विक्री, नफ्यात चढ-उतार होत असतात, तेव्हा मंदीत हा समभाग कितीपर्यंत खाली येऊ शकतो त्यात १९ ऑक्टोबर २०२१ च्या निफ्टी निर्देशांकाच्या १८,६०४ च्या उच्चांकापासून १७ जून २०२२ च्या १५,१८३ च्या नीचांकापर्यंतच्या मंदीच्या दाहकतेत इन्फोसिस किती खाली घसरू शकतो? या प्रश्नाचे उत्तरदेखील महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर या संकल्पनेतच दिलेले.

भविष्यात वरचे इच्छित लक्ष्य साध्य झाल्यावर अथवा बाजाराच्या मंदीतील वाटचालीतदेखील इन्फोसिसने महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर राखला पाहिजे अथवा त्या वेळेला नमूद केलेल्या निराशाजनक निकाल लागल्यानंतर नमूद केलेल्या खालच्या लक्ष्यापर्यंत तो घसरलेला दिसावा. किंबहुना हेच खालचे लक्ष्य सर्वसाधारण मंदीत गृहीत धरत इन्फोसिस या स्तरापर्यंत घसरू शकतो, असे अनुमान गुंतवणूकदार काढू शकतात. हे खालचे लक्ष्य त्या वेळेला १,३७० राहण्याचे १२ जुलै २०२१ च्या लेखात नमूद केलेले होते. प्रत्यक्षात इन्फोसिसची वाटचाल काळाच्या कसोटीवर तपासता, मंदीच्या दाहकतेत १७ जून २०२२ ला इन्फोसिसने दिवसांतर्गत १,३६७ चा नीचांक मारत, या स्तरावरून सावरत २८ जूनला १,४८० च्या महत्त्वाच्या केंद्रिबदू स्तराला पुन्हा गवसणी घातली. सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारचा १२ ऑगस्टचा इन्फोसिसचा बंद भाव १,५९४ आहे. अशा रीतीने साधी, सोपी एका संख्येत व्यक्त होणारी गुंतवणूकदारांच्या समस्या निवारण्यासाठी विकसित केलेली ‘महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर’ ही संकल्पना, वर्षांहून अधिक कालावधी, त्यातही दातखीळ बसवणाऱ्या मंदीतदेखील काळाच्या कसोटीवर उतरली याचे निश्चितच समाधान वाटते.

चिकित्सा ‘महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर’ संकल्पनेची
शुक्रवारचा बंद भाव :
सेन्सेक्स : ५९,४६२.७८
निफ्टी : १७,६९८.१५
लेखक भांडवली बाजार विश्लेषक
ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
करावे कर-समाधान : कर कायद्यांच्या इतिहासात डोकावताना..
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी