नीलेश साठे

प्रत्येकाच्या जीवनांत आयुर्विम्याची साथ असायलाच हवी आणि आयुर्विमा घेण्याचा निर्णय शक्य तितक्या लवकर घेतला जायला हवा. तथापि तुमचा निर्णय चुकीचा ठरून पश्चातापाची वेळ येऊ नये या साठी लक्षात ठेवायच्या बाबी –

१. योग्य रकमेचा विमा घ्या. मासिक उत्पन्नाच्या किमान १०० पट विमा असायला हवा. विमा प्रकारातील ‘टर्म इन्शुरन्स’ (मुदत विमा) सर्वाकडेच असायला हवा. या विमा प्रकारात कमी विमा हप्त्यात अधिक रकमेचे विमा संरक्षण मिळते.

२. विमा घेण्याचा आपला उद्देश काय आहे हे लक्षात घ्या. केवळ विमा प्रतिनिधी सांगतो म्हणून तो विमा प्रकार घेऊ  नका.

३. जर बचत आणि गुंतवणुकीसाठी लागणारी शिस्त आपल्याजवळ नसेल तर विम्याकडे बचतीचा अनिवार्य मार्ग म्हणून बघा. कारण असे निदर्शनास आले आहे की, जेवढय़ा सहजपणे म्युच्युअल फंडातील रक्कम काढली जाते किंवा बँकेतील मुदत ठेव मोडली जाते, तेवढय़ा सहजपणे विमा पॉलिसीचे प्रत्यार्पण (सरेंडर) करून रक्कम काढली जात नाही. शिवाय पॉलिसी सरेंडर करून मिळणारी रक्कम ही भरलेल्या रकमेपेक्षा सामान्यत: कमी मिळत असल्याने आणि पॉलिसी सरेंडर केल्यानंतर विमा छत्र नाहीसे होत असल्याने पॉलिसी सरेंडरचा पर्याय सहसा शेवटचा पर्याय म्हणून निवडला जातो. 

४. दीर्घ मुदतीचा विमा घ्या. दीर्घ मुदतीचा विमा घेतल्याने वार्षिक विमा हप्ता कमी भरावा लागतो आणि आयुष्यावरील जोखीम संरक्षण दीर्घ काळ उपलब्ध होते.

५. विमा घेताना विमा प्रतिनिधीला पुरेसा वेळ देऊन सर्व शंकांचे समाधान करून घ्या. त्याने दिलेला विमा योजनेचा प्रस्ताव आपल्याला आपल्या गरजांचा विचार करून योग्य आहे ना याची खात्री करून घ्या. ‘मला वेळ नाही, कुठे सह्य़ा करू सांगा’ असा घिसाडघाईने निर्णय घेऊ  नका. नवीन फ्रीज किंवा टीव्ही घेताना आपण चार दुकाने हिंडतो, आपल्या ‘बजेट’चा विचार करतो, त्या उपकरणाची नीट माहिती करून घेतो. विमा हा दीर्घ मुदतीचा करार असल्याने किमान तेवढा तरी चौकसपणा विमा खरेदी करताना दाखविणे आवश्यक आहे.

६. आजकाल बँका देखील विमा विक्री करतात. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावावर लगेच सही करून मोकळे होऊ  नका. प्रस्ताव घरी नेऊ न पती-पत्नीने आपापसात चर्चा करून मगच योग्य तो निर्णय घ्या.

७. विम्याचा करार हा ‘अटमोस्ट गुड फेथ’ म्हणजे परस्पर विश्वासावर आधारित असतो. तेव्हा विमा प्रस्तावात सर्व माहिती अचूक आणि खरी द्या. विमा प्रतिनिधीने ती माहिती प्रस्तावपत्रात बरोबर भरली आहे ना याची खात्री करून घ्या. 

८. विमा विक्री ही एक कला आहे. विमा प्रतिनिधीला विमा विक्री करताना जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवावा लागतो असे म्हटले जाते. याचा अर्थ त्याच्या गोड बोलण्यावर आपण भुलून जावे असे नाही. विचारपूर्वक आणि डोळसपणे निर्णय घ्या. विम्याची गरज नसेल तर विनयपूर्वक नकार द्यावा.

९. विमा प्रतिनिधीचे ‘कमिशन’ हा त्याचा मेहनताना असतो. योग्य सल्ला देण्याचे शुल्क त्याला विमा कंपनीकडून देण्यात येते. त्याला त्या सल्लय़ाचे शुल्क विमेदार देत नसतो. तेव्हा त्याला मिळणाऱ्या ‘कमिशन’च्या परताव्याची मागणी करू नका. विमा कायदाच्या ४१ व्या कलमान्वये तो गुन्हा ठरतो.

१०. विमा कंपनी निवडताना त्या कंपनीची जनमानसातील प्रतिमा, दावे-निपटारासंबंधीची तत्परता, सोयीची कार्यालये,             अधिकाऱ्यांची उपलब्धता अशा बाबी विचारात घ्या.

११. विमा प्रतिनिधीवर उपकार म्हणून वा त्याचे विमा पॉलिसींचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी म्हणून विमा घेऊ  नका. विमा आपण स्वत: साठी आणि आपल्या कुटुंबीयांसाठी घेत असतो, विमा प्रतिनिधीसाठी नाही, ही खूणगाठ पक्की ठेवा.

१२. उत्पन्न आणि महागाई वाढत असली तरी विम्याचा हप्ता मुदत संपेपर्यंत तेवढाच असतो, तो वाढत नाही. सबब, सुरुवातीस विमा हप्ता देणे कठीण वाटत असले तरी कालांतराने त्याचे ओझे वाटेनासे होते.

१३. प्राप्तिकरात सूट मिळते म्हणून विमा घेणे चुकीचे आहे. ही सूट कधीही बंद होऊ  शकते.

१४. ‘युनिट लिंक्ड इन्शुरन्स’ अर्थात युलिप योजना घेण्यापूर्वी हे समजून घ्या की, गुंतवणुकीची जोखीम विमा कंपनीने आपल्यावर टाकलेली आहे. युलिप योजना घेताना आपण ही जोखीम घेण्यास सक्षम आहोत ना याचा विचार करूनच हा विमा प्रकार निवडा.

१५. कंपनीच्या संकेतस्थळावर जाऊ न विमा प्रतिनिधीने दिलेल्या विमा प्रस्तावातील सत्यासत्यता पडताळून बघा.

१६. ‘सम अश्युअर्ड’ म्हणजे विमा रक्कम तसेच त्यावरील बोनस देण्याची हमी विमा कंपन्यांनी दिलेली असते. मात्र ‘बोनस’च्या दराची कुठलीही हमी विमा कंपनी देत नाही. विमा योजना समजावून घेताना याविषयी प्रतिनिधीकडून स्पष्टपणे खात्री करून घ्या.

१७. एवढे सगळे करूनही जर विमा पॉलिसी घेतल्यानंतर आपल्याला वाटले की, घेतलेली विमा पॉलिसी माझ्या हिताची नाही, तर पॉलिसी दस्तावेज मिळाल्यानंतरही १५ दिवसांच्या आत, कुठलेही कारण न देता, आपण विमा कंपनीला ती विमा पॉलिसी निरस्त करण्यासाठी परत करू शकता. मुद्रांक शुल्क तसेच काही किरकोळ रक्कम वजा करून बाकी सर्व रक्कम विमा कंपनी परत करते.

विम्याचा निर्णय घेण्यापूर्वी वरील सर्व प्रकारची काळजी घेतल्यास नंतर खेद करण्याची वेळ येणार नाही. विमा घ्या आणि निश्चिंत व्हा.

*  लेखक विमा नियामक ‘इर्डा’चे माजी सदस्य आणि ‘एलआयसी’मध्ये कार्यकारी संचालक पदावर कार्यरत होते. ई-मेल : nbsathe@gmail.com