scorecardresearch

लक्ष्मीची पाऊले.. : ‘ती’ अंडय़ांची टोपली आणि आपला ‘बीएएफ’ 

दीर्घकालीन गुंतवणूक उद्दिष्टांसाठी याचा उपयोग केला जातो. यात गुंतवणूकदाराच्या वयपरत्वे मालमत्ता वर्ग विभाजन केले जाते.

समीर नेसरीकर sameernesarikar@gmail.com

गुंतवणुकीतील ‘एकूण जोखीम’ कमी होण्यास मालमत्ता वर्ग-विभाजनामुळे (अ‍ॅसेट अलोकेशन) मदत होते. तथापि मालमत्ता विभाजनाचा विचार, हा गुंतवणुकीच्या आधीचा विचार असला पाहिजे. म्हणजेच परताव्याच्या विचाराआधी जोखीमविषयक पुरता बंदोबस्त हा अधिक महत्त्वाचा असतो.

गुंतवणूक क्षेत्रात एक प्रचलित वाक्य आहे, ‘डोन्ट कीप ऑल एग्स इन वन बास्केट.’ जेव्हा आपण सर्वंकष गुंतवणुकीचा विचार करतो तेव्हा पैसे कोणत्याही एका मालमत्ता वर्गात न ठेवता, एकाहून अधिक आणि परस्परसंबंध नसलेल्या मालमत्ता वर्गात ठेवणे ही एका सुदृढ पोर्टफोलिओची गरज असते. हे मालमत्ता वर्ग म्हणजे समभाग किंवा समभागसलंग्न म्युचुअल फंड, रोखे, सोने अशा अनेक स्वरूपांत असू शकतात. इतिहासाने दाखवून दिलंय की, प्रत्येक मालमत्ता वर्गाची जोखीम आणि त्यातला परतावा कालपरत्वे वेगवेगळा असतो. आपल्या पोर्टफोलिओची ‘एकूण जोखीम’ कमी होण्यास या मालमत्ता वर्ग-विभाजनामुळे (अ‍ॅसेट अलोकेशन) मदत होते. तसेच जेव्हा आपण समभागसंलग्न मालमत्ता वर्ग असे म्हणतो त्यातही पुन्हा देशांर्तगत आणि परदेशी भांडवली बाजारातील गुंतवणूक अशीही पोटविभागणी करता येते. स्थावर मालमत्ता म्हटले की, देशी आणि परदेशी मालमत्ता घेणे अथवा स्थावर मालमत्ता या संकल्पनेवर आधारित म्युचुअल फंड घेणे अशीही फोड करता येते. आपण पाहिले तर दरवर्षी निफ्टी ५० निर्देशांक, १० वर्षे मुदतीचे भारतीय रोखे आणि सोने अशा मालमत्ता वर्गाचा परतावा वेगवेगळा असतो. या तीनही मालमत्ता वर्गाचे डायनॅमिक्स (चलनशास्त्र) विभिन्न आहेत. तसेच या तिन्हींच्या तुलनेत अमेरिकी भांडवली बाजाराचा दरवर्षीचा परतावा वेगळा असतो. मालमत्ता विभाजन हे आपली जोखीम-परतावा गुणोत्तर सुधारण्यासाठी केले जाते. मालमत्ता विभाजनाचा हा विचार हा गुंतवणुकीच्या आधीचा विचार असला पाहिजे.

मालमत्ता विभाजन दोन प्रकारे करता येते – 

* स्ट्रॅटेजिक अ‍ॅसेट अलोकेशन :

दीर्घकालीन गुंतवणूक उद्दिष्टांसाठी याचा उपयोग केला जातो. यात गुंतवणूकदाराच्या वयपरत्वे मालमत्ता वर्ग विभाजन केले जाते.

तरुणांसाठी मुख्यत्वे समभागसलंग्न गुंतवणूक सुचवली जाते, जसे वय वाढते त्याप्रमाणे रोखे गुंतवणुकीला प्राधान्य दिले जाते. त्याचबरोबरीने जोखीम क्षमतेनुसारसुद्धा गुंतवणूक केली जाते.

टॅक्टिकल अ‍ॅसेट अलोकेशन :

‘गुड पोजिशन्स डोन्ट विन गेम्स, गुड मूव्ह्ज डू’ याप्रमाणे काही विशिष्ट काळात (छोटय़ा कालावधीत) कोणत्या मालमत्ता वर्गात पैसे गुंतविल्यास जास्त फायदा मिळू शकेल, याचा विचार करून गुंतवणूक केली जाते. अशा प्रकारच्या मालमत्ता वर्ग विभागणीत आपल्या पोर्टफोलिओचा वार्षिक आढावा आणि मालमत्ता वर्ग पुर्नसतुलनाचे खूप महत्व आहे.

हा पोटफोलिओ पुर्नसतुलनाचा धागा पकडून आपण आता ‘बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंड (बीएएफ)’ या म्युच्युअल फंडांच्या एका बहुचर्चित श्रेणीबद्दल जाणून घेऊया.  ‘सेबी’च्या २०१७ च्या परिपत्रकानुसार ‘डायनॅमिक अ‍ॅसेट अलोकेशन’ म्हणजेच ‘बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंडां’ची सुरुवात झाली. मार्च २०२२ अखेरीस उपलब्ध माहितीनुसार गुंतवणूकदारांनी (४२ लाख फोलिओ) साधारणत: १,७८,८६२ कोटी रुपये बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंड या श्रेणीमध्ये गुंतविलेले आहेत. नावाप्रमाणेच या फंडात ‘डायनॅमिक अ‍ॅसेट अलोकेशन’ केले जाते, म्हणजेच जेव्हा भांडवल बाजार तेजीत असतो तेव्हा समभाग गुंतवणूक कमी करत आणायचे आणि भांडवल बाजार पडलेला असतो (उदाहरणार्थ मार्च २०२०) तेव्हा समभागांत सर्वात जास्त गुंतवणूक करायची, अशी ही गुंतवणुकीची पद्धत असते. म्हणजेच फंड व्यवस्थापक ‘पोर्टफोलिओ पुन:संतुलनाचेह्ण काम आपल्या वतीने करत असतात. परिणामी ‘समभागसंलग्न’(प्युअर इक्विटी) योजनेपेक्षा बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंडात पोर्टफोलिओमधील एकूण जोखीम कमी राहते. प्रत्येक बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंड काही विशिष्ट साच्यानुसार ‘नेट इक्विटी’ (ग्रॉस इक्विटी – आर्बिट्राज) नंबर ठरवत असते. परंतु त्यात हे पाहिलं जातं की ‘टोटल इक्विटी’ ६५ टक्क्यांपेक्षा जास्त राहील, जेणेकरून कर आकारणी ‘इक्विटी’प्रमाणे होईल. जेव्हा भांडवल बाजार खूप उंचावर असतो तेव्हा इक्विटीमधील ‘हेजिंग’ वाढवलं जातं त्याचबरोबरीने रोख्यांमधील गुंतवणुकीचे प्रमाण वाढवलं जातं.  बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंडात ‘नेट इक्विटी’ नंबर ठरवताना सर्वसाधारणपणे मूल्यांकनावर आधारित गुणोत्तर (पी/ई, पी/बी), तसेच बाजाराचा कल पाहून फंड व्यवस्थापकांकडून निर्णय घेतला जातो. वाचकांसाठी फंडांची काही उदाहरणे देत आहे. मार्च २०२२ रोजी, मागील तीन वर्षांचा इतिहास बघितला तर एचडीएफसी बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज, आयसीआयसीआय प्रु. बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज,कोटक बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज, एडेल्वाइझ बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज आणि आदित्य बिर्ला सन लाइफ बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज या फंडांनी अनुक्रमे १२.३५ टक्के, ११.८९ टक्के, ११.४९ टक्के, १४.६९ टक्के, १०.९१ टक्के असा परतावा दिला आहे. प्रत्येक फलंदाजाची शैली वेगवेगळी असते, पण उद्दिष्ट सामना जिंकणे हेच असते, त्याचप्रमाणे आपण फंडांचा विचार केला तर! एचडीएफसी बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज हा फंड मुख्यत्त्वे ‘अनहेज्ड’ पद्धतीने चालविला जातो. आयसीआयसीआय प्रु. बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज हा त्यांच्या ‘प्राइस टू बुक’ या गुणोत्तराच्या आधारे पुढे जातो. आदित्य बिर्ला सन लाइफ बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंडाचा प्रमुख आधार त्यांच्या ‘अ‍ॅडजस्टेड पीई रेंज ऑफ एस अँड पी बीएसई १००’ आहे, तर कोटक बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेजमध्ये ‘ट्रेिलग निफ्टी ५० पीई’ यांचा आधार घेऊन निर्णय घेतला जातो. या श्रेणीत फंडांची इक्विटीमधील गुंतवणूक करताना लार्ज कॅप समभागांना प्राधान्य दिलेले सामाईकपणे आढळून येते. कोणताही फंड निवडताना फंड व्यवस्थापकाने एक विशिष्ट परतावा मिळविताना किती जोखीम घेतली आहे हे पाहिले पाहिजे, निव्वळ परताव्यावर आधारित निर्णय योग्य नाही. बाजार खाली आल्यावर फंड किती खाली आला याचे उत्तर ‘डाऊनसाइड कॅप्चर रेशो’मधून मिळते, तो चांगला सूचक आहे, गुंतवणुकीपूर्वी तोही जरूर अभ्यासावा.

शेवटी, जर तुमचं आर्थिक उद्दिष्ट लांबचे (साधारणत: पाच वर्षांपुढील) असेल आणि तुलनेने तुमची जास्त जोखीम घेण्याची क्षमता असेल तर बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंडांसोबतच तुम्ही समभागसलंग्न म्युचुअल फंडात (प्युअर इक्विटी) गुंतवणूक करणे अधिक हितावह ठरू शकेल. अर्थात प्रत्येकाचा स्वत:चा एक अभ्यास, कल, प्राधान्यक्रम असतो याची जाणीव आहेच, पण आपल्याला जर मदत लागली तर एक अनुभवी ‘नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार’ आपल्याला ‘गुंतवणुकीतील बॅलन्स’ साधण्यास नक्कीच मदत करू शकेल.

(लेखक मुंबईस्थित गुंतवणूकविषयक अभ्यासक)

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tips for asset allocation for investors zws

ताज्या बातम्या