वसंत माधव कुळकर्णी

मागे, २० जानेवारी २०२० रोजी या सदरातून ऑक्टोबर-डिसेंबर २०१९ तिमाहीतील कामगिरीनुसार ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंडां’ची यादी प्रसिद्ध झाली होती. त्या यादीतील फंड पाहून अनेकांना धक्का बसला. काहींनी मेल लिहून आश्चर्य व्यक्त केले. पुढे फेब्रुवारी महिन्यात क्रिसिलने जाहीर केलेल्या मानांकन यादीत, ‘लोकसत्ता कर्ते’ यादीतील फंडांनी ‘क्रिसिल टॉप आणि अपर मिडल क्वार्टाइल’मध्ये स्थान मिळविलेले दिसले. त्यातील चार फंडाचे निधी व्यवस्थापक आणि एलआयसी म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी असलेले सचिन रेळेकर यांचे. रेळेकर यांची ओळख विश्लेषकांना गुंतवणुकीत उत्तम जोखीम व्यवस्थापन करणारे निधी व्यवस्थापक अशी आहे. जे निधी व्यवस्थापक फंड गटाच्या दीर्घकालीन परताव्याच्या सरासरीपेक्षा सरस कामगिरी सातत्याने करतात असे निधी व्यवस्थापक मानांकन यादीवर वर्चस्व राखून असतात.

businessman was cheated
धक्कादायक! इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा व्हिडीओ वापरुन व्यावसायिकाची दहा लाखांची फसवणूक
mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips
MPSC मंत्र : भूगोल मूलभूत अभ्यास
loksatta editorial on manoj jarange patil controversial statement on devendra fadnavis
अग्रलेख : करेक्ट कार्यक्रम!
Interpol
विश्लेषण : ‘इंटरपोल’च्या नोटिसांचा वापर राजकीय हेतूने केला जातो? या संस्थेचं नेमकं काम काय? जाणून घ्या…

अनेकदा सक्रिय व्यवस्थापन असणारे निधी व्यवस्थापक आणि निष्क्रिय निधी व्यवस्थापन असलेल्या फंडांचे निधी व्यवस्थापक आणि त्यांनी दिलेला परतावा हा नेहमीच वादाचा विषय असतो. एकदा निधी व्यवस्थापक जेव्हा फंड गटाच्या परताव्याच्या सरासरीपेक्षा अधिक परतावा सातत्याने मिळवितो तेव्हा त्याची गणना गुंतवणूक परिभाषेत सर्वात वरील चतुर्थाश (टॉप क्वार्टाईल आणि अपर मिडल क्वार्टाईल) मधील निधी व्यवस्थापकांमध्ये होते. साहजिकच सर्वच निधी व्यवस्थापकांचे लक्ष्य सर्वाधिक जोखीम-समायोजित परतावा देण्याकडे लागलेले असते. सचिन रेळेकर निधी व्यवस्थापक असलेल्या चारही फंडांना क्रिसिल मानांकनात अव्वल स्थान मिळाले आहे. सर्वसाधारणपणे ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंड’ निवडीसाठी वापरात येणारी पद्धत क्रिसिल, मॉर्निंगस्टारसहित वेल्थ मॅनेजर वापरतात. फंड परताव्यापेक्षा निधी व्यवस्थापकाच्या जोखीम व्यवस्थापनाचे कौशल्य तपासून पाहण्यात ज्या पद्धतीत भर दिला जातो. साहजिकच लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंडाच्या आदर्श पोर्टफोलिओमध्ये मोठी मालमत्ता असलेले परंतु संपत्तीचा विध्वंस करणाऱ्या वलयांकित निधी व्यवस्थापकांना स्थान नाही. ‘मॉर्निंगस्टार’ने मागील तिमाहीच्या कामगिरीनुसार मागील पाच वर्षांत संपत्तीची निर्मिती न केलेल्या (निर्देशांकापेक्षा किती तरी कमी परतावा दिलेल्या) एका वलयांकित निधी व्यवस्थापकाच्या फंडांची पत कमी केल्यामुळे फंड जगतात चिंता व्यक्त होत आहे. या निधी व्यवस्थापकाचा केवळ एकच फंड २०१४ मध्ये या यादीचा भाग होता. तसाही हा फुगा एक दिवस फुटणार याची खात्री असल्याने मागील सहा वर्षांपासून या निधी व्यवस्थापकाला केवळ सांख्यिकीय निकषांवर गुंतवणूक शिफारशीच्या परिघाबाहेर ठेवण्यात आले.

संशोधन पद्धती निश्चित करणे आणि सातत्याने या संशोधन पद्धतीत अधिकाधिक अचूकता आणणे गरजेचे असते. गुंतवणुकीचे एक अंग विज्ञान आहे. कारण गुंतवणुकीत संख्याशास्त्राचा मोठय़ा प्रमाणावर वापर होतो. गुंतवणूक एक कलासुद्धा आहे. कारण विज्ञानाप्रमाणेच गुंतवणूक प्रक्रिया रचनात्मक आणि पुन्हा तुलनात्मक निर्मितीतून पोर्टफोलिओची निर्मिती होत असते. किमान पाच वर्षे निधी व्यवस्थापक असलेल्यांच्या मागील पाच वर्षांच्या जोखीम व्यवस्थापनाच्या कामगिरीनुसार चार निधी व्यवस्थापक निश्चित केले यापैकी पहिले सचिन रेळेकर आहेत.

पूर्वी भारतात म्युच्युअल फंडांची कामगिरी तपासण्यासाठी पुरेसे आधार बिंदू उपलब्ध नव्हते. सार्वजनिकरीत्या उपलब्ध माहितीच्या आधारे प्रवाहपतित निधी व्यवस्थापक आणि प्रवाहाविरुद्ध आपल्या गुंतवणूक तत्त्वांशी एकनिष्ठ राहणारे निधी व्यवस्थापक सहज ओळखता येतात. गुंतवणूकदारांच्या जोखमीचे व्यवस्थापन कोणती गुंतवणूक प्रक्रिया अधिक उत्तम रीतीने करू शकेल याचा अधिक विचार करतात जे निधी व्यवस्थापक गुंतवणूकदारांच्या नजरेत भरण्यासाठी जोखीम व्यवस्थापनाला महत्त्व देत नाहीत असे निधी व्यवस्थापक अनेकदा तोंडघशी पडल्याची उदाहरणे सहज नजरेला पडतात. ‘‘बाजार नेहमीच म्युच्युअल फंड गुंतवणूकदराचा कस पाहतो तसा आमचासुद्धा कस पाहतो. शर्यतीत मागे पडण्याची भीती, खरेदी केलेला समभाग दीर्घकाळ एका परिघात रेंगाळत राहतो, किंवा खाली जातो. अपेक्षित असलेले ‘यश’ देत नाही तेव्हा जोखीम व्यवस्थापनाचे निकष पातळ केले जातात. आमचे जोखीम व्यवस्थापनाचे निकष पक्के असल्याने जोखीम व्यवस्थापन कायमच आमच्यासाठी कळीचा मुद्दा राहिला आहे,’’ मोकळेपणे सचिन रेळेकर सांगतात.

भारतामध्ये एखाददुसरा अपवाद वगळता फंड व्यवस्थापकापेक्षा फंड घराण्यावरून फंडांची गुंतवणुकीसाठी निवड केली जाते. विकसित बाजारपेठात फंडांची निवड दर्जेदार निधी व्यवस्थापकावरून होते. एलआयसी म्युच्युअल फंडांचे समभाग गुंतवणूक प्रमुख आणि चार फंडांचे निधी व्यवस्थापक हे असेच एक दर्जेदार निधी व्यवस्थापक आहेत. त्यांच्या फंडांच्या तौलनिक कामगिरीचा तपशील सोबतच्या कोष्टकात दिला आहे. ते व्यवस्थापक असलेल्या फंडांची मालमत्ता आजही गुंतवणुकीसाठी फंड निवड सिद्ध निकषांपेक्षा ऐकीव माहितीवर निर्माण झालेल्या प्रतिमेवर होते या गृहीतकाची सत्यता पटवून देते.

मराठी साहित्यातले युगप्रवर्तक कवी बाळ सीताराम मर्ढेकर यांनी ते मुंबई आकाशवाणी केंद्रावर कार्यरत असताना- ‘बदकांचे गुपित’ एक संगीतिका लिहिली होती. या संगीतिकेत अपत्यहीन दाम्पत्याच्या जगण्यातलं एकसुरीपण अधोरेखित केले गेले होते. आज म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराला प्रदीर्घकाळ ‘एसआयपी’ करूनही परताव्याअभावी गुंतवणुकीतील फोलपणा जाणवत आहे. मर्ढेकरांची बदकं ही जीवनातल्या बोचणीची प्रतीके आहेत. ही बोचणी लागायला कारण असलेल्या अनेक शक्यतांपैकी चुकीच्या निधी व्यवस्थापकाच्या फंडांची निवड हे असू शकेल. इथून पुढे फंड निवड करताना फंड घराण्याच्या प्रतिमेपेक्षा जोखीम व्यवस्थापनाला महत्त्व दिलेल्या निधी व्यवस्थापकाच्या फंडांची निवड केल्यास संपत्ती निर्मितीला सुरक्षिततेचे कोंदण लाभेल, असे खात्रीने सांगता येईल. श्रावणातल्या शिवामुठीच्या माध्यमातून उत्तम जोखीम व्यवस्थापन असलेल्या चार निधी व्यवस्थापकांची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न आहे.

सचिन रेळेकर गुंतवणूक प्रमुख असलेल्या एलआयसी म्युच्युअल फंडांचा तपशील

 

shreeyachebaba@gmail.com

म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती  देणारे साप्ताहिक सदर