डी. पी. सिंग

व्याजदरात हळूहळू पण वाढ होणे येत्या काळात अपरिहार्य दिसत आहे. अशा समयी गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओला सुरक्षितता आणि स्थिरतेचा पैलू जोडण्यासाठी आणि केवळ इतकेच नव्हे, तर कर कार्यक्षमता सुधारण्यासाठी गुंतवणूकदारांना काय करता येईल?

भू-राजकीय संकट, करोना साथीचे अथक सुरू राहिलेले आर्थिक परिणाम, वाढती महागाई आणि जागतिक धोरणातील बदल यामुळे बाजारातील अस्थिरतेच्या अलीकडील भीतीदायी लाटांनी गुंतवणूकदारांमध्ये कमालीची चिंता वाढली आहे. या घटनांमुळे निर्माण झालेली अस्थिरता ही स्थिर उत्पन्न बाजारवर्गातही मध्यम कालावधीसाठी राहण्याची शक्यता आहे. तरीही, डेट अर्थात रोखेसंलग्न म्युच्युअल फंडांकडे पाठ फिरविली जाऊ नये हे मुद्दामहून सांगावेसे वाटते. केवळ गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओला सुरक्षितता आणि स्थिरतेचा पैलू जोडण्यासाठी नव्हे, तर कर कार्यक्षमता सुधारण्यासाठीदेखील हे आवश्यक ठरेल. कसे ते पाहू या.

गुंतवणूकदारांची उत्सुकता आणि डेट म्युच्युअल फंडातील स्वारस्य नक्कीच वाढले आहे. तथापि, गुंतवणूकदारांना अद्याप या फंडांची आणि ते देऊ शकणाऱ्या अतिरिक्त फायद्यांची संपूर्ण माहिती नाही. व्याजदर हळूहळू वाढत आहेत हे लक्षात घेता, गुंतवणूकदारांना त्यांच्या पोर्टफोलिओला काहीशी स्थिरता  देऊ शकतील अशा पर्यायांकडे स्वाभाविक कल राहील. पारंपरिक गुंतवणुकीचे मार्ग स्थिर परतावा जरी देत असले तरी ते बदलत्या व्याजदर परिस्थितीशी जुळवून घेत नाहीत. याच कारणाने डेट म्युच्युअल फंडाचे ‘टार्गेट मॅच्युरिटी फंड (टीएमएफ)’ हे गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओसाठी योग्य ठरू शकतात.

टीएमएफ हे निष्क्रियपणे (पॅसिव्ह) व्यवस्थापित केलेले गुंतवणुकीस कायम खुले असलेले (ओपन-एंडेड) डेट म्युच्युअल फंड आहेत. पूर्व-निर्धारित मॅच्युरिटी (मुदतपूर्ती) तारीख असलेल्या आणि कामगिरीसाठी ‘बाँड इंडेक्स’वर ते बेतलेले असतात. अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, या फंडांची तुलना मुदत ठेवी (एफडी) यांसारख्या पारंपरिक गुंतवणुकीच्या प्रकाराशी करून पाहू. सुरुवातीला, एफडीमध्ये जसे पैसे बँकेत ठेवलेले असतात, त्याचप्रमाणे हे फंड मुख्यत: उच्च-गुणवत्तेच्या निश्चित उत्पन्न साधनांमध्ये गुंतवणूक करतात. ही साधने म्हणजे सरकारी रोखे (जी-सेक), राज्य विकास रोखे (एसडीएल), सार्वजनिक उपक्रमांचे रोखे- बाँड्समध्ये पैसा गुंतविला जातो. पुढे, ज्याप्रमाणे एखाद्या एफडीची गुंतवणुकीसमयीच एक निश्चित मुदत, जसे तीन किंवा पाच वर्षे ठरविली जाते, तशी या फंडांमध्येदेखील एक पूर्वनिर्धारित मॅच्युरिटी (मुदतप्रू्ती अवधी) असते (जी संबंधित संदर्भ निर्देशांकाशी संलग्न असते). या मुदतपूर्तीनंतर गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळतात.

दोहोंतील फरक असा की, टीएमएफ हे ओपन-एंडेड आहेत, याचा अर्थ गुंतवणूकदार त्यांच्या आवडीच्या कोणत्याही टप्प्यावर या योजनेत प्रवेश करू शकतात अथवा बाहेर पडू शकतात. त्याउलट, एफडीमध्ये पैसे निश्चित कालावधीसाठी बंदिस्त असतात (अथवा मुदत पूर्ण होण्यापूर्वी काढणे तोटय़ाचे ठरते). त्यामुळे पारंपरिक गुंतवणुकीच्या तुलनेत टीएमएफ ही अधिक तरल गुंतवणूक बनते. पुढे, टीएमएफचे उद्दिष्ट संलग्न निर्देशांकाच्या एकूण परताव्याच्या आसपास व त्याच्याशी जुळणारे परतावे प्रदान करणे हे आहे.

टीएमएफमधील बॉण्ड्स हे मॅच्युरिटी होईपर्यंत ठेवले जातात, म्हणजे फंड ज्या साधनांमध्ये गुंतवणूक करतो ते मॅच्युरिटी होण्यापूर्वी विकले जात नाहीत. गुंतवणूकदाराने फंडाच्या मुदतपूर्तीपर्यंत गुंतवणूक करत राहणे निवडल्यास व्याजदरातील चढ-उताराने संभवणारी जोखीम कमी होते. तथापि, हे ओपन-एंडेड फंड असल्याने ते अर्थव्यवस्थेतील व्याजदरातील बदलामुळे मार्क-टू-मार्केट प्रभावाच्या अधीन आहेत. त्याउलट एखाद्या गुंतवणूकदाराने मुदत संपण्यापूर्वी एफडीमधून पैसे काढायचे ठरवल्यास त्याला व्याजलाभावर पाणी सोडून द्यावे लागते.

खाली कोष्टकातील काल्पनिक विश्लेषणाच्या मदतीने आपण ही तुलना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. व्याजदरात बदल झाल्यावर फंडातील गुंतवणूक किती काळ राखली तर त्याचे परताव्यावर होणाऱ्या परिणामाची माहिती हे कोष्टक देते. खालील उदाहरणात मुदतपूर्ती परतावा ७ टक्के आणि सुधारित अवधी (मॉडिफाइड डय़ुरेशन) ४-५ वर्षे गृहीत धरला गेला आहे. वरील उदाहरणावरून, अनिश्चित व्याजदराच्या वातावरणात टीएमएफ हे संलग्न व्याजदर जोखमीतून तरून जाण्यास मदत करू शकतात आणि एफडीपेक्षा सरस परताव्याची खातरजमा करतात. टीएमएफमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराने फंडात किमान एक वर्षांसाठी गुंतवणूक केली पाहिजे. कारण खूप कमी कालावधीसाठी केलेली गुंतवणूक नकारात्मक परतावादेखील देऊ शकते.

याव्यतिरिक्त, पारंपरिक गुंतवणूक पर्यायांच्या तुलनेत टीएमएफ हे कर कार्यक्षम परतावा देतात. तीन वर्षांहून अधिक काळ ठेवलेल्या गुंतवणुकीवर दीर्घकालीन भांडवली नफा कर हा ‘इंडेक्सेशन’च्या लाभानंतर २० टक्के आहे. तर सर्वोच्च कर श्रेणीत येणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी पारंपरिक गुंतवणुकीच्या पर्यायांच्या बाबतीत तो ३० टक्क्यांइतका असेल. अशा प्रकारे, टीएमएफ हे किरकोळ आणि संस्थात्मक गुंतवणूकदार दोहोंच्या पोर्टफोलिओसाठी सध्याच्या अनिश्चित वातावरणात सुयोग्य ठरतात. कारण सुरक्षितता, तरलता आणि कर कार्यक्षमता या गुंतवणूक गरजा ते पुरेपूर पूर्ण करतात. तथापि, हेही लक्षात घ्यायला हवे, की सध्या आपण संभाव्य वाढत्या व्याजदराच्या चक्रात आहोत आणि गुंतवणूकदारांनी या फंडांमध्ये फार कमी कालावधीसाठी गुंतवणूक करून चालणार नाही किंवा त्यांच्या  गुंतवणुकीचे क्षितिज हे फंडाच्या मॅच्युरिटी अवधीपेक्षा खूप वेगळे असू नये.

व्याजदरात बदल एक वर्षांनंतर    दोन वर्षांनंतर     तीन वर्षांनंतर    मुदतपूर्तीला

    परतावा परतावा परतावा परतावा(एचटीएम)

पाव टक्के वाढ   ६.१३%  ६.६९%  ६.८८%  ७.००%

अर्धा टक्के वाढ ५.२५%  ६.३८%  ६.७५%  ७.००%

१ टक्का वाढ ३.५०%  ५.७५%  ६.५०%  ७.००%

पाव टक्के कपात ७.८८%  ७.३१%  ७.१३%  ७.००%

अर्धा टक्के कपात ८.७५%  ७.६३%  ७.२५%  ७.००%

१ टक्का कपात  १०.५०% ८.२५%  ७.५०%  ७.००%

अ) व्याजदरातील फेरबदलाच्या स्थितीत, रोख्यांवरील परताव्यातील सैद्धांतिक हालचालींवर आधारित काल्पनिक गृहीतक असून ते कोणत्याही तऱ्हेने परताव्याचे सूचक म्हणून विचारात घेतले जाऊ नये. ब) फंडाने गुंतवणूक केलेले रोखे त्यांच्या संबंधित मुदतपूर्तीपर्यंत ठेवले जाऊ शकतात किंवा ठेवले जाणार नाहीत. क) व्याजदरातील फेरबदल हे वर्षांच्या शेवटी झाल्याचे गृहीत धरले गेले आहे. ड) भूतकाळातील कामगिरी भविष्यात टिकू शकते किंवा शकत नाही.

(लेखक एसबीआय म्युच्युअल फंडाचे उप-व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य व्यवसाय अधिकारी)