करोना काळामध्ये इतर अनेक देशांप्रमाणेच भारतात देखील आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये देशभरात आणि विशेषत: महाराष्ट्रात काही प्रमाणात निर्बंध हटवल्यामुळे त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. आज दिवसभराचे व्यवहार झाल्यानंतर दुपारी मुंबईतील शेअर बाजार बंद होत असताना सेन्सेक्सनं आत्तापर्यंतची सर्वाधिक अर्थात ५८ हजार २८९.६१ पर्यंत मजल मारली आहे. दिवस सुरू झाला तेव्हा मोठी उसळी घेणारा सेन्सेक्स काही तासांनी स्थिर झाला आणि शेवटी १६७ अंकाची भर घालत थांबला. यावेळी निफ्टीनं देखील विक्रमी कामगिरी करत पहिल्यांदाच १७ हजार ४०० अंकांचा टप्पा पार केला आहे.

आज मुंबई शेअर बाजारामध्ये सकाळचे व्यवहार सुरू झाले, तेव्हा सेन्सेक्सनं तब्बल ३८५.९० अंकांची उसळी घेतली. त्यामुळे तेव्हाच सेन्सेक्सनं ५८ हजार ५१५.८५ हा नवा उच्चांक गाठला होता. मात्र, त्यानंतर काही काळाने सेन्सेक्स खाली आला. मग पुन्हा १२.३०च्या सुमारास १५९.६६ अंकांनी वधारलेला सेन्सेक्स ५८ हजार २८९.६१ वर स्थिरावला.

दुसरीकडे निफ्टी ५० नं देखील सेन्सेक्सच्याच पावलावर पाऊल ठेवत विक्रमी भरारी घेतली आहे. आज तब्बल १०५.९५ अंकांनी वधारलेल्या निफ्टीनं पहिल्यांदाच १७ हजार ४२९.५५ इतकी विक्रमी नोंद केली आहे.

दुपारपर्यंत झालेल्या व्यवहारांमध्ये RIL, बजाज ऑटो, HCL, इन्फोसिस, मारुति सुझुकी, HUL यांनी भरपूर कमाई केली. मात्र, त्याचवेळी टाटा स्टील, सन फार्मा, एशियन पेंट्स इंडसइंड बँक, एनटीपीसी आणि पॉवर ग्रीड यांना नुकसान सहन करावं लागलं.