सध्या फेब्रुवारी महिना चालू आहे. मार्च-एप्रिलमध्ये मुलांच्या परीक्षा संपतील. अभ्यासाच्या आणि परीक्षेच्या व्यापामुळे शीण आलेल्या मुलांना आणि त्यांच्याबरोबर त्यांचा अभ्यास घेणाऱ्या पालकांना कुठे तरी बाहेरगावी टुरला जावे असे वाटणे साहजिकच आहे. नोकरी-व्यवसाय करणाऱ्या आई-वडिलांनासुद्धा रोज त्याच त्याच धकाधकीच्या चाकोरीबद्ध दैनंदिनीमधून काही दिवस कुठे तरी बाहेरगावी जाऊन फ्रेश व्हावं असं वाटतं.
आणि याच कारणास्तव अनेक पगारदार व्यक्तींना ते काम करत असलेल्या कंपनीमधून ‘लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशन’ (LTC) या नावाचे लाभ (परक्विझिट) दिला जातो. एखाद्या पगारदार व्यक्तीने त्याला उपलब्ध असलेल्या रजेच्या दिवसात त्याच्या कुटुंबीयांसमवेत एखाद्या ठिकाणी प्रवास केला तर अशा प्रवासासाठी जी रक्कम त्या व्यक्तीला दिली जाते त्याला ‘लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशन’ किंवा ‘लीव्ह ट्रॅव्हल अलाऊन्स’ असे म्हणतात. अशा प्रवासाचे करदात्यांनी पूर्वनियोजन केले तर प्राप्तिकर कायद्याच्या कलम १०(५) नुसार मिळणारे ‘लीव्ह ट्रॅव्हेल कन्सेशन’ संपूर्णपणे करमुक्त मिळू शकते.
कलम १०(५)नुसार मिळणाऱ्या या करमुक्त कन्सेशनची वैशिष्टय़े कोणती ते सर्वप्रथम पाहू :
१) करनिर्धारण वर्ष १९८८-८९ पर्यंत ही सवलत एखाद्या पगारदार व्यक्तीला  त्याच्या मूळ गावाला (होम टाऊनला) जाण्यासाठी केलेल्या प्रवासखर्चापुरतीच मर्यादित होती. पण करनिर्धारण वर्ष १९८९-९० पासून ही सवलत त्या व्यक्तीने भारतात कुठेही प्रवास केला तरी मिळेल.
२) हे कन्सेशन एखाद्या पगारदार व्यक्तीने स्वत:साठी केलेल्या प्रवासापुरते मर्यादित नसून त्याच्या समवेत त्याच्या कुटुंबीयांनी म्हणजे पत्नी, मुले आणि त्या व्यक्तीवर आर्थिक बाबतीत अवलंबून असणाऱ्या त्याच्या आई-वडिलांनी आणि भाऊ-बहीण यांनी केलेल्या प्रवासासाठीसुद्धा मिळते.
३) कुटुंबनियोजनाचे भान ठेवून पगारदार व्यक्तींनी या करमुक्ततेचा फायदा घ्यावा असा हेतू या तरतुदीमागे आहे. त्यामुळेच मुलांच्या बाबतीत यात एक तरतूद केली गेली आहे. जी मुले १ ऑक्टोबर १९९८ पूर्वी जन्मली आहेत त्या सर्व मुलांच्या बाबतीतला प्रवासखर्च करमुक्त मिळेल. पण १ ऑक्टोबर १९९८ नंतर जन्मलेल्या मुलांच्या बाबतीत हे कन्सेशन जास्तीत जास्त दोन मुलांपुरतेच मर्यादित आहे.
४) हे कन्सेशन सध्याच्या एम्प्लॉयरकडून मिळताना करमुक्त मिळतेच पण एखादी पगारदार व्यक्ती निवृत्त झाल्यानंतरसुद्धा त्याला मिळणारे असे कन्सेशन करमुक्त मिळते.
हे करमुक्त कन्सेशन मिळण्यासाठी आवश्यक नियम कोणते ते पाहू.
१) नियम २ बीनुसार प्रत्यक्ष प्रवास करणे आवश्यक आहे. अन्यथा असे कन्सेशन त्या व्यक्तीला करमुक्त न मिळता करपात्र पगार म्हणून गणले जाईल.
२) करमुक्त कन्सेशन हे प्रत्यक्ष जो प्रवास खर्च झाला त्या रकमेसाठीच मिळते. तसेच लॉजिंग-बोर्डिग म्हणजे हॉटेलमध्ये राहण्याच्या आणि जेवणाखाण्याच्या खर्चाबाबत हे कन्सेशन मिळत नाही.
३) हे कन्सेशन चार कॅलेंडर वर्षांच्या ब्लॉकमध्ये दोन वेळा केलेल्या प्रवासखर्चासाठी मिळते. सद्यस्थितीचा विचार करता २०१०-१३ हा चार कॅलेंडर वर्षांचा ब्लॉक लागू आहे. पुढचा चार कॅलेंडर वर्षांचा ब्लॉक असेल २०१४-२०१७ या चार वर्षांचा! ‘लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशन’ करमुक्त मिळण्यासाठी प्रवासाचे पूर्वनियोजन करणे का महत्त्वाचे आहे हे समस्त करदात्यांना या माहितीवरून लक्षात येईलच!
आता कलम १०(५) नुसार करमुक्त कन्सेशन किती मिळेल ते पाहू :
करमुक्त कन्सेशनची रक्कम त्या व्यक्तीने प्रवास करण्यासाठी जे माध्यम (Mode of Transport) वापरले त्याच्याशी निगडित आहे. त्यानुसार करमुक्त कन्सेशन किती मिळू शकते ते सोबतच्या कोष्टकात दर्शविले आहे.
तेव्हा करदात्यांना धकाधकीच्या जीवनातून बदल मिळवून पुन्हा एकदा ताजेतवाने होण्यासाठी पूर्वनियोजन करून प्रवासही करता येईल आणि हा प्रवास करण्यासाठी मिळणारे ‘लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशन’ कलम १९(५) आणि नियम २बीनुसार करमुक्तही मिळेल. मग सहकुटुंब सहपरिवार प्रवासाचा बेत आखताय ना?
प्रवासाचे माध्यम          मिळू शकणारे करमुक्त कन्सेशन
*  विमानाने प्रवास     इकॉनॉमी श्रेणीने केलेल्या प्रवासाच्या तिकिटाचे भाडे.
*  रेल्वेने प्रवास     वातानुकूलित पहिल्या वर्गाच्या प्रवासाच्या तिकिटाचे भाडे.
*  रेल्वे मार्गाने     मान्यताप्राप्त सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध असल्यास
जाता येत नसल्यास     पहिल्या वर्गाचे किंवा डिलक्स वर्गाच्या तिकिटाचे भाडे