अजय वाळिंबे

भांडवली बाजारात काय किंवा इतर क्षेत्रात काय, कितीही मंदी असली तरी औषधे, खाद्यपदार्थ, तंबाखू आणि दारू यांची विक्री कायम चालू राहते. या क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागांना ‘डिफेंसिव्ह स्टॉक्स’ म्हणतात. मद्यविक्री करणाऱ्या कंपन्या ‘पोर्टफोलिओ’त असल्या तर मंदीवर यशस्वीपणे मात करता येते.

stamp duty
सरकारच्या ‘या’ योजनेची ‘कोटीच्या कोटी उड्डाणे’
hotel Solapur district
सोलापूर : हॉटेल व्यवस्थापनाच्या नावाखाली मित्राला ६८ लाखांचा गंडा, अक्कलकोटमध्ये दागिने लंपास
russian soldier
‘रशियात अडकलेल्या २० भारतीयांच्या सुटकेसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न’, परराष्ट्र खात्याची माहिती
In the name of share trading two highly educated people were cheated of two and a half crores
पनवेल: शेअर ट्रेडींगच्या नावाखाली दोन उच्चशिक्षितांना सव्वा दोन कोटींचा गंडा

आज सुचविलेल्या युनायटेड स्पिरिट्सचा इतिहास तसा मोठाच म्हणावा लागेल. १८२६ मध्ये मद्रासमध्ये अँगस मॅकडोवेल या स्कॉटिश माणसाने स्थापन केलेली मॅकडोवेल ट्रेडिंग कंपनी अनेक स्थित्यंतरे पाहात २००६ मध्ये युनायटेड स्पिरिट्स झाली आहे. मधल्या काळात ती विठ्ठल मल्या आणि त्यानंतर त्यांचे सुपुत्र विजय मल्या यांच्याकडे होती. २००६ नंतर कंपनीने ‘ब्रॅण्ड व्हॅल्यू’ला महत्त्व देऊ न अनेक नामांकित ब्रॅण्ड ताब्यात घेतले. २०१४ मध्ये डिआज्जिओ पीएलसी या ब्रिटिश बहुराष्ट्रीय कंपनीने ५४.८ टक्के हिस्सा ताब्यात घेऊ न युनायटेड स्पिरिट्सला आपली उपकंपनी केले. आज देशभरात कंपनीची ५० उत्पादन केंद्रे असून बंगलोरमध्ये अत्याधुनिक टेक्निकल सेंटरदेखील आहे. स्थानिक लोकांच्या चवीनुसार मद्यनिर्मिती करण्यासाठी २५ तंत्रज्ञ येथे काम करीत आहेत. कंपनीने स्वत:चे निर्माण केलेले मॅकडोवेल नं. १, रॉयल चॅलेंज आणि सिग्नेचर हे ‘ब्रॅण्ड’ भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहेत. त्याखेरीज कंपनीकडे जवळपास ५० जगप्रसिद्ध ब्रॅण्ड आहेत. यात प्रामुख्याने जॉनी वॉकर, ब्लॅक डॉग, स्मिरनॉफ, वॅट ६९, डायरेक्टर स्पेशल, बॅगपाइपर, अँटिक्वि टी, जे अ‍ॅण्ड बी, बेलीज आयरिश क्रीम आदींचा समावेश होतो.

भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ६२ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांखालील आहे, तर सरासरी वय २९ वर्षे आहे. म्हणजेच बहुतांश लोकसंख्या तरुण आणि कमावती आहे. देशातील गुजरात, बिहार, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा या पाच राज्यांत संपूर्ण दारूबंदी असली तरीही अनेक राज्यांतून मद्य उत्पादनाला प्रोत्साहनदेखील दिले जात आहे. महाराष्ट्रातदेखील परदेशी उत्पादन शुल्क ३०० टक्कय़ांवरून वरून १५० टक्कय़ांवर आणले आहे, त्याचा फायदा युनायटेड स्पिरिट्ससारख्या कंपन्यांना होऊ  शकतो.

सप्टेंबर २०२१ साठी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीसाठी कंपनीने २,४४७ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २७३ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत तो ११३ टक्कय़ांनी अधिक आहे, तर गेल्या सहामाहीच्या तुलनेत कंपनीने ८७ कोटी रुपयांच्या तोटय़ातून बाहेर पडत ३४३ कोटी रुपयांचा नक्त नफा मिळविला आहे. गेली पाच वर्षे कंपनीने सरासरी २२.२३ टक्के वाढ नोंदवली आहे.

गेल्या वर्षी याच स्तंभातून हा समभाग ५३० रुपयांना सुचवला होता. सध्या ८७५ रुपयांच्या आसपास असलेला हा समभाग मद्यनिर्मितीच्या क्षेत्रातील इतर कंपन्याचे किंमत उत्पन्न गुणोत्तर (प्राइस अर्निग रेशो) पाहता महाग वाटू शकेल, मात्र डिआज्जिओ पीएलसी या सुप्रसिद्ध आणि बलाढय़ कंपनीची उपकंपनी, अनुभवी आणि उत्तम प्रवर्तक तसेच कंपनीचा ‘ब्रॅण्ड पोर्टफोलियो’ पाहता युनायटेड स्पिरिट्स एक आकर्षक दीर्घकालीन खरेदी ठरू शकते.

युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड (बीएसई कोड – ५३२४३२)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ८८७/-

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक : रु. १०२०/४९५

बाजार भांडवल :  रु. ६४,४३० कोटी

भरणा झालेले भागभांडवल : रु. १४५.३० कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक                ५६.७३    

परदेशी गुंतवणूकदार        १९.०८    

बँक/ म्यु. फंड/ सरकार   ९.६६     

इतर/ जनता            १४.५३

संक्षिप्त विवरण

* शेअर गट    : लार्ज कॅप

* प्रवर्तक       : डियाजो पीएलसी

* व्यवसाय क्षेत्र  :   मद्यनिर्मिती व वितरण

* पुस्तकी मूल्य : रु. ६१.५

* दर्शनी मूल्य : रु. २/-

* गतवर्षीचा लाभांश : –%

शेअर शिफारसीचे निकष

प्रति समभाग उत्पन्न :       रु. १०२.९८

पी/ई गुणोत्तर :                ७९

समग्र पी/ई गुणोत्तर :           ४२.२

डेट इक्विटी गुणोत्तर :                ०.२३

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :        ११.४

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड :         १३.३

बीटा :                      ०.७

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.