अतुल कोतकर atulkotkar@yahoo.com

लार्ज कॅप फंड गटात पाच, तीन आणि एक वर्ष मुदतीच्या कामगिरीवर अव्वल स्थानी (पहिल्या पाच फंडांत) असलेला यूटीआय मास्टरशेअर हा फंड आहे. स्वाती कुलकर्णी हा फंड २००६ पासून व्यवस्थापित करीत असून त्या गेली २८ वर्षे या फंड घराण्याच्या सेवेत आहेत. त्यांची मानदंड (बेंचमार्क) जागरूक निधी व्यवस्थापिका अशी ओळख असून मागील दहा वर्षे फंडामधून त्यांनी ८५ टक्के गुंतवणूक एस अँड पी बीएसई १०० निर्देशांकाला साजेशी केलेली आहे.

वेगवेगळ्या व्यापारचक्रात फंडाने सातत्यपूर्ण कामगिरी केलेली असून नोव्हेंबर २००६ ते सप्टेंबर २०२१ कार्यकाळात एस अँड पी बीएसई १०० निर्देशांकाच्या ११.८७ टक्के आणि लार्जकॅप फंड गट सरासरी ११.०८ टक्कय़ांच्या तुलनेत १२.२३ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. ही फंड कामगिरी ‘मॉर्निगस्टार रिस्क-अ‍ॅडजस्टेड रिटर्न’ प्रणालीनुसार फंडाची दीर्घकालीन अभिमुखता आणि अतिशय कमी मंथन यामुळे स्पर्धक फंडांपेक्षा ७२ टक्के सरस ठरली आहे. पोर्टफोलिओ बांधताना जोखीम व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केल्यामुळे फंडाचे जोखीम/परतावा गुणोत्तर अन्य फंडांच्या तुलनेत उजवे आहे. ज्यांना लाभांश हवा आहे अशा गुंतवणूकदारांसाठी हा फंड आदर्श म्हणून समोर आला आहे. बाजारातील घसरणीच्या वेळी पाच वर्षांच्या कालावधीत फंडाचा ‘डाऊनसाइड कॅप्चर रेट’ ८७ टक्के होता. वाढता निर्देशांक मूल्यांकनाला दिवसेंदिवस अधिक धोकादायक पातळीवर नेत असताना संभाव्य घसरणीत मुदलाला कमीत कमी हानी पोहोचविणारा हा फंड आहे.

गुंतवणुकीसाठी कंपन्यांची निवड करताना निर्देशांकांचा भाग असलेल्या कंपन्यांवर फंडाची भिस्त असते. निर्देशांकापेक्षा अधिक वृद्धिदर राखणाऱ्या परंतु चढे मूल्यांकन असलेल्या कंपन्यांपेक्षा वाजवी वृद्धिदर आणि मूल्यांकन असलेल्या कंपन्यांना त्यांनी प्राधान्य दिल्याचे लक्षात येते. नवीन कंपन्यांचा गुंतवणुकीत समावेश करण्यापेक्षा गुंतवणुकीत असलेल्या कंपन्यांचा समतोल साधण्याला त्यांनी प्राधान्य दिले आहे. मागील सहा महिन्यांत केवळ मदरसन सुमी या एकाच कंपनीचा नव्याने समावेश झाल्याचे आकडेवारी सांगते. त्यांनी गुंतवणुकीत सामान्यत: प्रस्थापित व्यवसाय प्रारूप असलेल्या आणि परिचित कंपन्यांना मोठा वाटा दिला आहे. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, इन्फोसिस आणि एल अँड टीसारख्या मानदंडात प्रभाव असलेल्या कंपन्या फंडात सर्वाधिक गुंतवणूक असलेल्या कंपन्या आहेत. फंडाच्या गुंतवणुकीत १२ टक्के गुंतवणूक मिड आणि स्मॉलकॅप प्रकारच्या कंपन्यांत असूनदेखील गुंतवणूक करताना व्यवस्थापन गुणवत्तेशी तडजोड न करता सुस्थापित व्यवसाय असलेल्या आणि अनुपालन मानकात अग्रस्थानी असलेल्या कंपन्यांची निवड केली आहे. निधी व्यवस्थापिकेने व्यापारचक्रात फंडाला दिशा देण्याचे कौशल्य आणि वेगवेगळ्या परिस्थितीत त्यांनी आखलेली रणनीती, पोर्टफोलिओ मूलतत्त्वांशी (मॉडर्न पोर्टफोलिओ थिअरी) प्रतारणा केली नसल्याने हा फंड अन्य लार्जकॅप फंडाच्या जोखीम समायोजित परताव्याच्या तुलनेत अग्रस्थानी आहे.

‘लोकसत्ता – कर्ते म्युच्युअल फंड’ यादीचा २०१४ पासून भाग असलेल्या या फंडाला २०१७ मध्ये वगळण्यात आले होते. यादीतून वगळावे लागल्यावर मुलगा नापास झाल्यासारखी दु:खी भावना मनात होतीच; परंतु सातत्यपूर्ण कामगिरीच्या निकषांवर फंडाचा ऑक्टोबर २०१९ मध्ये कर्ते यादीत पुन्हा समावेश करण्यात आला. आज (सोमवार) फंडाचा ३६ वा वर्धापन  दिन आहे. त्यानिमित्ताने भविष्यातसुद्धा हा फंड गुंतवणूकदारांच्या वाजवी अपेक्षांची पूर्तता करेल अशी आशा वाटते.

यूटीआय मास्टरशेअर फंड

*  फंड गट मिड कॅप

*  फंडाची सुरुवात : १८ ऑक्टोबर १९८६

*  फंड मालमत्ता : ९,५३६ कोटी (३० सप्टेंबर २०२१रोजी)

*  मानदंड :एस अ‍ॅण्ड पी बीएसई १०० टीआरआय (म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाचे माहितीपत्रक कृपया सखोल अभ्यासा.)