डॉ. आशीष थत्ते ashishpthatte@gmail.com

कंपन्यांच्या यशामध्ये विक्रेत्यांचे खूप महत्त्व असते, मग ते कोणत्याही क्षेत्रात असो. म्हणजे ग्राहक तर राजा आहेच, पण विक्रेत्यांच्या बरोबर चांगले संबंध ठेवणे कंपन्यांच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे असते. व्यवस्थापनामध्ये याला विक्रेता व्यवस्थापन म्हणजेच व्हेंडर मॅनेजमेन्ट म्हणतात. यामध्ये विक्रेत्यांचा बरोबर दीर्घकाळासाठी चांगले संबंध प्रस्थापित करावे लागतात, जेणेकरून संभाव्य पुरवठय़ाच्या समस्येपासून दिलासा मिळू शकतो किंवा पुरवठय़ामध्ये काही हादरे बसू नयेत म्हणून आधी उपाययोजना करता येतात. यात पुरवठादारांना कंपनीशी जोडणे, व्यवहार्य कराराची विविध कलमे बनवणे व वेळोवेळी ती बदलणे, खर्चावर नियंत्रण, कमीतकमी जोखीम आणि वेळेवर मालाचा पुरवठा या गोष्टींचा समावेश होतो.

axis mutual fund, axis multicap fund
अशी होते म्युचुअल फंडाची ‘अल्फा’निर्मिती
Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
Investment Opportunities in the Capital Goods Sector Top Companies
गुंतवणूक संधीचे क्षेत्र आणि न दिसणारे व्यवसाय: भांडवली वस्तू
Infrastructure and Real Estate Sector in Mumbai
मुंबईतील पायाभूत सुविधा आणि स्थावर मालमत्ता क्षेत्र

कंपन्यांच्या आकाराप्रमाणे गोष्टी काहीशा बदलतात. मात्र त्यांची सूत्रे सारखीच असतात. पुरवठादारांना किंवा विक्रेत्यांना निवडणे, त्यांच्याबरोबर वाटाघाटी करणे, त्यांना आपल्या कंपनीच्या यादीत समाविष्ट करून घेणे, वेळोवेळी त्यांची कामगिरी पडताळून बघणे, त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या जोखमीवर नियंत्रण ठेवणे आणि त्यांचे बिल किंवा बीजक वेळेत देणे या गोष्टींचा समावेश पुरवठादार व्यवस्थापनात होतो. मोठय़ा कंपन्या तर अर्थात एका पुरवठादावर अवलंबून न राहता आपली पुरठावदारांची मोठी फौजच निर्माण करतात. या विक्रेत्यांच्यादेखील कंपन्यांबरोबर बैठका होतात व वेळोवेळी त्यांना कंपन्यांच्या उत्पादनाच्या संबंधातील गरजांची माहिती दिली जाते.

वाहन निर्मिती क्षेत्र तर यात फारच पुढारलेले आहे. कारण ते प्रत्यक्ष उत्पादन न करता सुटे भाग एकत्र करून गाडय़ा बनवतात. काही कंपन्या तर पुरवठादारांना स्वत:च्या संगणक प्रणालीला जोडून घेऊन पुरवठादाराची कागदपत्रांची औपचारिकता कमी करतात. औषधे किंवा रसायने बनवणाऱ्या कंपन्यादेखील त्यांचे पुरवठादार बांधून ठेवतात. जेणेकरून आयात करणाऱ्या वस्तूंचा तुटवडा भासू नये. बहरीनसारख्या छोटय़ा देशात तर एक कंपनी चक्क उकळते अ‍ॅल्युमिनिअम रस्ता ओलांडून दुसऱ्या कंपनीला देते. यामुळे त्यांचा धातू पुन्हा वितळवण्याचा खर्च कमी होतो. पुरवठादारांसाठी हे महत्त्वाचे असते कारण तुम्ही त्यांच्यासाठी ग्राहक असता. पुरवठादारांच्या व्यवस्थापनामध्येदेखील आता सॉफ्टवेअरने शिरकाव केला आहे. त्यानुसार त्यांची पात्रता ठरवणे, त्यांना मानांकन देणे इत्यादींचा समावेश होतो. फक्त कच्चा माल नाही तर सेवांचादेखील यात समावेश असतो.

कंपन्यांमध्ये पुरवठादाराचे महत्त्व व काही उदाहरणे आपण बघितली. पुढील भागात घरात आपल्या कुठल्या कुठल्या पुरवठादार किंवा विक्रेत्यांशी संबंध येतो व आपण त्याचे व्यवस्थापन कसे जाणतेपणे किंवा अजाणतेपणे करतो ते बघू. तुमच्याकडे काही या विषयाबाबत विचार असल्यास जरूर कळवा.

* लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेण्ट अकाउंटंट म्हणून कार्यरत