scorecardresearch

बंदा रुपया : ‘सह्य़ाद्री’ची उंची!

मराठी मातीतील उद्यम-व्यवसायातील नवधुमाऱ्यांचा वेध घेणारे साप्ताहिक सदर..

(संग्रहित छायाचित्र)

मराठी मातीतील उद्यम-व्यवसायातील नवधुमाऱ्यांचा वेध घेणारे साप्ताहिक सदर..

प्रयोग.. कोणत्याही क्षेत्रातील असो, पहिल्या वेळी यशस्वी होईल याची शाश्वती नसते. त्यातही तो कृषी, कृषिपूरक व्यवसायातील असेल तर बहुतेक पदरी निराशाच! प्रयत्न मध्येच थांबवावे लागतात. प्रसंगी त्यांची मोठी किंमतही मोजावी लागते.

परंतु यांचे सलग आठ-दहा वर्षे असे प्रयोग सुरू राहिले. विलास शिंदे आणि प्रयोगशीलता यांचे घट्ट नातेच जणू. त्यातून त्यांना स्वाभाविकच अनेक अडचणींनाही तोंड द्यावे लागले. बरेच काही शिकायलाही मिळाले. आपली व्यवस्था ताकदवान केली तरच संकटांना सक्षमपणे सामोरे जाता येईल, याची प्रकर्षांने जाणीव झाली. मोहाडीस्थित सह्य़ाद्री शेतकरी उत्पादक कंपनीचा (सह्य़ाद्री फार्म्स)  जागतिक दर्जाचा भव्य प्रकल्प पाहिल्यावर या ताकतीची प्रचीती येते. गुणवत्ता, अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञान या बळावर सह्य़ाद्रीने ४२ देशांतील बाजारपेठ काबीज केली आहे.

नानाविध प्रयोगांती अध्यक्ष विलास शिंदे यांच्या संकल्पनेतून आकारास आलेली सह्य़ाद्री फार्म्स आज जागतिक पातळीवर नाममुद्रा उमटवत आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांची शेती फायदेशीर करण्याच्या उद्देशाने कंपनीची सुरुवात झाली. केवळ दर्जेदार शेतमाल पिकवून उपयोग नाही. तो ग्राहकांपर्यंत पोहोचायला हवा. या दृष्टिकोनातून व्यवस्था उभारणीवर लक्ष देण्यात आले. शेतकऱ्यांच्या मालकीची आणि शेतकऱ्यांकडून चालविली जाणारी देशातील ही सर्वात मोठी कंपनी. फळे, भाजीपाला उत्पादन, प्रक्रिया आणि विक्री हे तिच्या कामाचे स्वरूप. कंपनीशी आजमितीस साडेसहा हजार शेतकरी जोडलेले आहेत. शेतीतील समूह शक्तीचा थक्क करणारा आविष्कार प्रेरक आहे. फळे, भाजीपाला पिकांतर्गत १६ हजार एकरवर उत्पादन घेतले जाते. म्हणजे कच्चा माल कंपनी स्वत: या शेतजमिनीवर तयार करवून घेते.

दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे सह्य़ाद्री फार्म्सचा ९५ एकरवर अत्याधुनिक प्रकल्प आहे. कृषिमाल आवेष्टित करणे, पूर्वशीतित, शीतगृह, कापणीची स्वतंत्र व्यवस्था आहे. दैनंदिन ८५० टन फळे-भाजीपाला हाताळणीसाठी सुसज्ज यंत्रणा आहे. फळांचे गर काढणे आणि वातानुकूलित प्रक्रिया करण्याचे दोन स्वतंत्र उद्योगही आहेत. २०० टन क्षमतेचे फळांचा रस, जॅम, जेली आणि पेस्ट निर्मिती केंद्र असे सारे एकाच छताखाली आहे. नऊ वर्षांत सह्य़ाद्री अफाट वेगाने विस्तारली. पहिल्या वर्षी १२ कोटीवर असणारी कंपनीची उलाढाल २०१९ मध्ये तब्बल ३५० कोटींवर पोहोचली. चालू वर्षांत साडेचारशे कोटींचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर आहे. कंपनीने ५०० महिला-पुरुषांना रोजगार दिला. ते नियमित सेवेत आहेत. याव्यतिरिक्त हंगामी स्वरूपात अडीच हजार जणांना काम मिळाले आहे.

नफ्यातून भांडवल निर्मिती

चढ-उताराच्या काळात साथ देणाऱ्या गटातील ६२३ शेतकऱ्यांच्या सोबतीने २०११ मध्ये सह्य़ाद्री फार्म्सची स्थापना झाली. आधी अनेक संस्था अडचणीत आल्याचा अनुभव असल्याने शेतकरी गुंतवणुकीस पुढे येणे अवघड होते. द्राक्ष निर्यातीतून तोवर मोहाडी येथे ७० एकर जमीन घेतलेली होती. त्यातील पाच वर्षांचे उत्पन्न शिंदे यांनी कंपनीत गुंतवले. सभासदांकडून दरवर्षी द्राक्ष व्यवहारातून नफ्याची जी रक्कम शिल्लक राहील, ती संबंधितांचे भांडवल म्हणून गुंतवणुकीचा मार्ग अनुसरला. त्या बदल्यात शेतकऱ्यांना कंपनीचे समभाग दिले. या प्रकारे कंपनीचे साडेतीन कोटीचे भांडवल तयार झाले. ६० ते ७० टक्के स्व-भांडवल आणि उर्वरित कर्ज या पद्धतीने एकेक टप्पा गाठण्यात आला. कंपनीने २०१७ पर्यंत सरकारी योजनेतून अनुदान घेतलेले नव्हते. शेतकरी उत्पादक कंपनी नवी संकल्पना असल्याने प्रारंभी बँका विश्वास ठेवायला तयार नव्हत्या. पहिल्यांदा डीसीबी बँकेने कर्ज दिले. आज कंपनीची स्वत:ची २२५ कोटींची मालमत्ता आहे. २०१९ मध्ये २५.३८ कोटींचा (करपूर्व) नफा कमावला. पाच वर्षांत कंपनीने १८ कोटींचा निव्वळ प्राप्तिकर भरला आहे. द्राक्ष निर्यातीतून देशाला आतापर्यंत सुमारे अडीच हजार कोटींचे परकीय चलन मिळवून दिले. सह्य़ाद्रीच्या विलक्षण कामगिरीने नेदरलँडच्या एफएमओ बँकेने विस्तार योजनांसाठी १२० कोटींचा पतपुरवठा मंजूर केला आहे.

डिजिटल सक्षमता, भविष्यकालीन योजना

सह्य़ाद्री फार्म्स आज देशातील सर्वात मोठी ‘ग्लोबल गॅप’ प्रमाणित कंपनी आहे. युरोपीय बाजारात माल पाठविण्यासाठी सह्य़ाद्रीकडे आंतरराष्ट्रीय निकषानुसार अन्न उद्योगातील उत्पादन, प्रक्रियेशी संबंधित जवळपास २५ प्रमाणपत्रे आहेत. यामध्ये आयएसओ २२००० : २००५, बीआरसी, हलाल, ‘एथिकल फेअर ट्रेड ऑडिट’, यूएस-एफडीए, कोशर आदी प्रमाणनांचा अंतर्भाव आहे. सह्य़ाद्रीचा कृषिमाल खरेदी करणाऱ्या जगातील ग्राहकाला तो कोणत्या शेतकऱ्याच्या शेतातून, कधी काढला गेला याची माहिती देणारी यंत्रणा विकसित केली गेली आहे. शेतीला तंत्रज्ञानाची जोड मिळाली. हजारो शेतकऱ्यांना अ‍ॅपच्या माध्यमातून ‘किसान हब’चे व्यासपीठ उपलब्ध केले. स्थानिक बाजारपेठेत शेतकऱ्यांचा माल पोहोचविता येईल, यासाठी मुंबईत पाच आणि नाशिकमध्ये पाच विक्री दालने उघडण्यात आली. आगामी दोन वर्षांत साखळी दालनांची शृंखला २०० वर नेण्याचे नियोजन आहे.

शेती अन् मातीत करिअर

सह्य़ाद्री फार्म्सच्या स्थापनेपूर्वीचा खडतर प्रवास, एक ना अनेक अयशस्वी प्रयोग, व्यावसायिक धक्के हे आवश्यक शहाणपण शिकवणारे ठरले, असे विलास शिंदे सांगतात. शिंदे हे शेतकरी कुटुंबातील. द्राक्ष शेती घरचा पारंपरिक व्यवसाय. कृषी (तंत्रज्ञान) विषयात ते पदवी आणि पदव्युत्तर पदवीधर. राहुरीच्या कृषी विद्यापीठात शिकत असताना तिथेच त्यांनी भाडेतत्त्वावर जमीन आणि खासगी कर्ज घेऊन मका, टरबूजची लागवड केली होती. मका चांगला निघाला, पण टरबुजाचे बियाणे बनावट निघाल्याने पहिलाच प्रयोग फसला. शिक्षणानंतर आडगावची घरची शेतजमीन प्रयोगशाळा बनली. शेतीपूरक म्हणून कर्ज काढून दुग्धव्यवसाय सुरू केला. तोही यशस्वी झाला नाही. वैयक्तिक आणि डेअरीचे मिळून कर्जाचा बोजा ७५ लाखावर गेला. अखेरीस व्यवसाय गुंडाळावा लागला. पण, प्रयत्न थांबले नाहीत. डोक्यावर कर्जाचा भार असताना ते द्राक्ष निर्यातीत उतरले. आधीच्या गोठय़ाच्या जागेत द्राक्षांसाठी ‘पॅकेजिंग’, शीतगृहाची व्यवस्था केली. पहिल्या वर्षी चार कंटेनर युरोपात पाठवले. यातील तीन कंटेनरचे पैसे व्यापाऱ्याने बुडवले. नंतर निर्यातीवेळी मालाचा विमा काढण्याची खबरदारी घेतली. द्राक्ष निर्यातीने नवे क्षितिज खुले झाले. हळूहळू गटातील शेतकरी वाढून द्राक्ष निर्यात वाढली. याच दरम्यान २०१० मध्ये काही औषधांचे अंश प्रमाणापेक्षा अधिक आढळल्याने युरोपीय महासंघाने भारतीय द्राक्षांवर बंदी घातली. यात शेतकऱ्यांची चूक नव्हती. यंत्रणेने योग्यवेळी माहिती न दिल्याने शिंदे यांना साडेसहा कोटींचा फटका बसला. आपली व्यवस्था ताकदवान बनविल्यास असे धक्के पचविता येतील. या विचारातून २०११ मध्ये ६२३ शेतकऱ्यांच्या सोबतीने त्यांनी सह्य़ाद्री फार्म्सची मुहूर्तमेढ रोवली. शेती अन् मातीत करिअर घडवण्याचा हा प्रवास अनेकांना मार्गदर्शक ठरणारा आहे.

विलास शिंदे (सह्य़ाद्री फार्म्स)

* उत्पादन : फळे-भाजीपाला उत्पादन, प्रक्रिया आणि विक्री

द्राक्ष निर्यात, फळांचे रस, गर काढणी, जॅम, जेली.

* मूळ गुंतवणूक  : ३.५० कोटी रु.

* गुंतवणूकदार  : ६२३ शेतकरी

* कर्जदार वित्तीय संस्था  : डीसीबी, अ‍ॅक्सिस आणि सिटी बँक. नेदरलँडच्या एफएमओ बँकेकडून विस्तार योजनांसाठी १२० कोटींचा पतपुरवठा.

* सरकारी योजनेचा फायदा? :केंद्र सरकारच्या अन्न प्रक्रिया क्लस्टर योजनेत २०१७ मध्ये सहभाग. साडेचार कोटीचे अनुदान

* रोजगार निर्मिती : नियमित सेवेत ५०० कर्मचारी + अडीच हजार हंगामी कर्मचारी

* वार्षिक उलाढाल : ३५० कोटी रु.

* संकेतस्थळ : http://www.sahyadrifarms.com

अनिकेत साठे

* लेखक ‘लोकसत्ता’चे नाशिकचे प्रतिनिधी aniket.sathe@expressindia.com

आपणासही या सदरासाठी नवउद्योजकाची शिफारस, सूचना ई-मेल : arthmanas@expressindia.com वर कळविता येईल.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vilas shinde sahyadri farms nashik farmers production company abn

ताज्या बातम्या