सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

आधीच्या सप्ताहातील घसरण आणखी तीव्र करीत बाजाराने गेल्या सोमवारी निर्देशांकात २ टक्क्यांची घसरण नोंदवली. मंगळवापर्यंतच्या पाच दिवसांत बाजार ५ टक्क्यांनी घसरला होता. रिलायन्सवगळता निर्देशांकात मोठे योगदान असणाऱ्या कंपन्यांचे समभाग कोसळले. युद्धपरिस्थितीमुळे इंधन तेलाची भाववाढ व त्याचा परिणाम इतर सर्वच वस्तूंच्या भावावर होऊन घाऊक महागाईच्या निर्देशांकात मार्च महिन्यांत साडेचौदा टक्क्यांची वाढ झाली. अमेरिकन बाजारातील रोखे परताव्यात २.९१ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने विदेशी गुंतवणूक संस्थांनी तुफानी विक्री केली. परिणामी बाजाराचे प्रमुख निर्देशांक पुन्हा एकदा २ टक्क्यांच्या घसरणीने बंद झाले.

 एल अ‍ॅण्ड टी इन्फोटेक : या कंपनीच्या नफ्यात चौथ्या तिमाहीत वार्षिक तुलनेत १७ टक्के वाढ झाली. चौथ्या तिमाहीच्या मिळकतीत विक्रमी ३६ टक्के वाढ झाली. कंपनीने ३० रुपयांचा लाभांश जाहीर केला. माइंडट्रीच्या नफ्यातही वार्षिक तुलनेत ४९ टक्के वाढ झाली. माइंडट्रीने २७ रुपयांचा लाभांश जाहीर केला. एल अ‍ॅण्ड टी इन्फोटेक आणि माइंडट्रीच्या विलीनीकरणाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. एकत्रित झालेली कंपनीची वार्षिक मिळकत १ लाख ६८ हजार रुपयांच्या घरात जाऊन ती भारतातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये पाचवे स्थान मिळवील. दोन्ही कंपन्या गेली काही वर्षे नवी कंत्राटे मिळविण्यासाठी व पूर्ण करण्यासाठी एकमेकास सहकार्य करीत आहेत. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या कर्मचारी गळती व नफ्याच्या घसरत्या टक्केवारीने त्रस्त आहेत. विलीनीकरणाने हा त्रास काहीसा कमी होईल. दोन्ही कंपन्यांचे समभाग दीर्घ मुदतीसाठी राखून ठेवावेत.

 रिलायन्स इंडस्ट्रीज : सरलेल्या सप्ताहात रिलायन्सच्या समभागांना मागणी होती व परिणामी त्यात १० टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे कंपनीचे बाजार मूल्य १९,००० अब्ज रुपयांपर्यंत पोहोचले. इंधन, वायूचे वाढलेले दर, रिफायिनग मार्जिनमधील वाढ, टेलिफोन दरांतील वाढ, नवीन विक्री दालने अशा अनेक गोष्टी रिलायन्सच्या विविध व्यवसायांना पूरक ठरल्या आहेत. हरित ऊर्जा व हायड्रोजनरूपी इंधन या उभरत्या क्षेत्रात रिलायन्स आगेकूच करीत आहे. त्यासाठी गेल्या काही महिन्यांत या क्षेत्रातील तांत्रिक आघाडी असलेल्या आरईसी सोलर, अंबरी, लिथियम वर्क्‍स फॅराडियन अशा अनेक कंपन्यांमध्ये तिने भागीदारी केली आहे. व्यावसायिक वारे कुठल्या दिशेकडे वाहातात हे ओळखून त्याप्रमाणे धोरणे आखणाऱ्या या कंपनीचे समभाग राखून ठेवावेत. नजीकच्या काळात ते मोठा लाभ देऊ शकतात.

 गॅलेक्सी सरफॅक्टंट्स : ही कंपनी सौंदर्यप्रसाधने, साबण, शाम्पू अशा स्वच्छतेशी निगडित उत्पादने बनविणाऱ्या कंपन्यांना आवश्यक कच्चा माल पुरविते. कंपनीला ५५ टक्के उत्पन्न हिंदूस्तान युनिलिव्हरसारख्या मोठय़ा कंपन्यांकडून मिळते. सध्या कंपनीच्या मुख्य कच्च्या मालाच्या – पामऑलिव्ह तेलापासून मिळणाऱ्या फॅटी अ‍ॅसिडच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात कंपनीच्या नफाक्षमतेवर परिणाम होईल. पण दीर्घ मुदतीत कंपनी कच्च्या मालाच्या किमतीतील चढ-उतार ग्राहकांकडून वसूल करू शकेल. त्यामुळे नफ्याचे प्रमाण स्थिरावू शकते. कंपनी नवीन उत्पादन क्षमतेवर ४०० कोटी खर्च करणार आहे. त्यामधील १५० कोटी खर्च झाले आहेत. घसरणीच्या काळात कंपनीचे समभाग दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी जमवावेत.

पेन्नार इंडस्ट्रीज लिमिटेड : या कंपनीने कोल्ड रोल्ड स्टीलच्या पट्टय़ा तयार करून आपला व्यवसाय सुरू केला. आता ही एक बहुस्थानीय, बहुउत्पादन कंपनी बनली आहे. कंपनी सीआर टय़ूब्स, कोल्ड रोल्ड फॉम्र्ड सेक्शन्स, इलेक्ट्रोस्टॅटिक प्रीसिपिटेटर्स, प्री-इंजिनियर्ड बििल्डग सिस्टम्स, शीट मेटल घटक आणि रस्ता सुरक्षा प्रणाली बनवते. कंपनीने ४९८ कोटींच्या मागण्या प्राप्त झाल्याचे जाहीर केले. त्यामुळे या सप्ताहात कंपनीच्या समभागात थोडी वाढ झाली. पेन्नारची उत्पादन विविधतेत, मूल्यवर्धित व अभियांत्रिकी उत्पादनांची वाढ होत आहे. ४० रुपयांच्या आसपास मिळणारे हे समभाग अल्पमुदतीत फायदा मिळवून देतील.

अनेक मोठय़ा कंपन्यांच्या निकालांच्या घोषणा बाजाराला फारशी उमेद देऊ शकलेल्या नाहीत. कंपन्यांच्या मिळकतीत वाढ होत असली तरी नफ्याचे घटणारे प्रमाण बाजारासाठी चिंतेचा विषय ठरले. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या निकालांमध्ये कर्मचारी गळतीचे प्रमाण तसेच पगार व प्रवास खर्चाचे वाढणारे प्रमाण अशा चिंतेच्या बाबी दिसून आल्या. ‘स्कायमेट’ने केलेल्या समाधानकारक मोसमी पावसाचे भाकीत बाजाराने दुर्लक्षित केले आहे. भारतासारख्या शेतीप्रधान देशासाठी ही आनंददायक बातमी आहे. चीनचा विकास दरातील ४.८ टक्क्यांची वाढ ही तूर्तास तरी आणखी एक चांगली बातमी आहे. करोनाच्या पुन्हा झालेल्या उद्रेकामुळे यात बदल होऊ शकतो. एकंदरीत बाजाराला दिशा मिळण्यासारख्या मोठय़ा घटना अथवा निर्णय होत नाहीत तोपर्यंत बाजार ठरावीक पट्टय़ात राहील.

सप्ताहातील या घडामोडींकडे लक्ष ठेवा

सेंच्युरी टेक्सटाइल्स, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन, बजाज समूहातील कंपन्या, एचडीएफसी लाइफ, सनोफी, टाटा कॉफी, हिंदूस्तान युनिलिव्हर, ट्रेंट, कोलगेट, अ‍ॅक्सिस बँक, अतुल, मारुती, अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्या गेल्या आर्थिक वर्षांचे निकाल जाहीर करतील.

कॅम्पस अ‍ॅक्टिव्हवेअर आणि रेनबो चिल्ड्रन्स मेडिकेअरची प्राथमिक समभाग विक्री मार्च महिन्याचे भारताच्या औद्योगिक उत्पादनाचे आकडे

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विप्रो, एम्फॅसिस, परसिस्टंट, केपीआयटी या कंपन्या गेल्या आर्थिक वर्षांचे निकाल जाहीर करतील.