आशीष ठाकूर – ashishthakur1966@gmail.com

गेल्या लेखातील वाक्य होते.. ‘‘येणाऱ्या दिवसांतील निफ्टी निर्देशांकाच्या तेजीच्या वाटचालीत १८,१०० हा अडथळा असेल. हा स्तर निफ्टी निर्देशांकाने पार केल्यास, त्याचे प्रथम वरचे लक्ष्य १८,४०० आणि दुसरे लक्ष्य १८,६०० असे असेल.’’

सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारी निफ्टी निर्देशांकाने बरोबर १८,१०२ या स्तरावरच बंद झाला असल्याने निफ्टीच्या भविष्यातील वाटचालीबद्दल उत्कंठा वाढली आहे. त्याचा विस्तृत आढावा आपण घेणारच आहोत, पण तत्पूर्वी सरलेल्या सप्ताहातील बाजाराचा साप्ताहिक बंद पातळी जाणून घेऊ या. 

शुक्रवारचा बंद भाव : सेन्सेक्स : ६०,६८६.६९ / निफ्टी : १८,१०२.७५ 

आज आपण नोव्हेंबरचा उत्तरार्ध आणि डिसेंबर महिन्यामधील निफ्टी निर्देशांकाची संभाव्य वाटचाल, निफ्टी निर्देशांकावरील मैलाचे दगड, तेजी अथवा मंदीची दिशा स्पष्ट करण्याचे वळणबिंदू (टर्निग पाँइंट)अशा विविध संज्ञा साध्या, सोप्या गणिती पद्धतीने समजून घेऊ या.

प्रथम आपण निफ्टी निर्देशांकावर अधोरेखित केलेला १८,१०० चा स्तर कसा काढला ते दैनंदिन उदाहरणाने समजून घेऊ. यासाठी आपण आपल्या संसदीय लोकशाहीचा आधार घेऊ या.

सार्वत्रिक निवडणुकांनंतर लोकसभेत २७२ ही बहुमताची जादुई संख्या गाठण्यात जो पक्ष यशस्वी ठरतो त्या पक्षाच्या प्रमुखास राष्ट्रपती सरकार स्थापण्यास पाचारण करतात. तसेच महाराष्ट्राच्या बाबतीत विधानसभेत १४५ ही जादुई संख्या गाठण्यात जो पक्ष यशस्वी ठरतो त्या पक्षाच्या प्रमुखास राज्यपाल सरकार स्थापण्यास पाचारण करतात. यात ५० टक्के किमान अथवा त्याहून जास्त निवडून आलेली सदस्यसंख्या गृहीत धरली जाते. हेच तत्व कंपनीच्या व्यवस्थापन शास्त्रात देखील वापरले जाते. कंपनी आपल्या विस्तार योजना, खेळते भांडवल यासाठी जे पैसे उभारावे लागतात त्या वेळेला कंपनीचे प्रवर्तक ५१ टक्के भागभांडवल आपल्या नियंत्रणात ठेवत पैशाच्या गरजेनुसार कंपनी आपल्या भांडवलाची विक्री करून पैसे उभारते.

थोडक्यात पूर्ण क्षमतेच्या ५० टक्के अथवा त्याहून अधिक साध्य करणे, लोकशाही व्यवस्थेत बहुमत मिळवणे हे सर्वार्थाने समाधानकारक असते. हेच तत्त्व आपण निफ्टी निर्देशांकाला लाऊ या.

निफ्टी निर्देशांकांत १८,६०० ते १७,६०० अशी १,००० अंशांची घसरण झाली. आता निफ्टी निर्देशांकावर तेजीवाल्यांचे प्राबल्य आहे की मंदीवाल्यांचे हे निर्धारण करण्यासाठी १,००० अंशांचे अर्धे ५०० अंश येतात. हे ५०० अंश १७,६०० च्या नीचांकात मिळवले असता १८,१०० हा वळणबिंदू अथवा मैलाचा दगड ठरत आहे व योगायोगाने सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारचा निफ्टी निर्देशांकाचा बंद भाव हा १८,१०० चा आहे.  

तेजीची धारणा असलेल्या गुंतवणूकदारांसाठी अतिशय सुखद घटना घडत आहेत. अर्थशास्त्राच्या सोनेरी नियमाप्रमाणे ‘एखाद्याचा खर्च हा दुसऱ्याच्या उत्पन्नाचे साधन ठरत असतो’ (वन्स एक्स्पेंडिचर, इज अदर इन्कम) या न्यायाने या दिवाळीत सव्वा लाख कोटी उत्पादने-मालाची विक्री झाली व ती गेल्या दहा वर्षांच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. किंबहुना विक्रीचा उच्चांक आहे. यात भर म्हणजे येणाऱ्या दीड महिन्यात भारतभरात २५ लाख लग्न सोहळे होणार असल्याने जी प्रचंड प्रमाणात आर्थिक उलाढाल होणार आहे ती पाहता, इतके दिवस उदास असलेल्या निफ्टीने ‘कात टाकणे’ स्वाभाविक दिसते. १८,१०० च्या स्तरावर घट्ट पाय रोवत निफ्टी पुन्हा आपली ३०० अशांच्या परिघातील परिक्रमा सुरू करू शकेल. म्हणजेच १८,१०० अधिक ३०० अंश १८,४००.. पुढे  १८,७००.. १९,००० ही वरची लक्ष्ये साध्य करायचा हा निर्देशांक प्रयत्न करेल.

या सर्व सुखद घटना घडत असताना मध्येच कुठेतरी माशी शिंकेल आणि बाजारांच्या म्हणी, वाक्यप्रचारांचा दाखला दिला जाईल. तो म्हणजे.. ‘भविष्यातील सकारात्मक घटनांच्या नांदीवर खरेदी करून, त्या घटना प्रत्यक्षात आल्यावर विक्री करावी (ऑन रूमर यू हॅव टू बाय, ऑन न्यूज यू हॅव टू सेल!).’

करोना बाधा ही काही शाश्वत नव्हती, तर अर्थचक्राचा गाडा फिरत राहणे, गतिमान होणे ही शाश्वत क्रिया. म्हणूनच तर निफ्टी निर्देशांक ७,५०० वरून १८,६०० पर्यंत वधारला. सुधारणा, सकारात्मक घटना भविष्यात घडतील या अपेक्षेवर ज्यांनी निफ्टी निर्देशांकाच्या ७,५०० च्या स्तरावर खरेदी केली व त्यांना अपेक्षित असलेल्या सुखद घटना आता प्रत्यक्षात येत असल्याने या लोकांनी नफारूपी विक्री केली तर?

पुढील लेखात भविष्यात निर्देशांकावर तेजीवाल्यांचे प्राबल्य असेल की मंदीवाल्यांचे हे विस्तृतपणे जाणून घेऊ या.

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे. (क्रमश:)

लेखक भांडवली बाजार विश्लेषक