13 August 2020

News Flash

शोध प्रकाशाचा

काही चित्रांमध्ये दिसणारा सोन्याचा तुकडा हा प्रकाशाच्या तुकडय़ा सारखाच आहे.

विनायक परब

जॉन डग्लस याची चित्रे हा चित्रकाराचा आणि त्याचवेळेस समाजाचाही एक वेगळा शोध आहे. तो एकाच पातळीवर व्यक्तिगत आणि दुसरीकडे सामाजिक शोधदेखील आहे!

पिवळा, केशरी किंवा लाल अशा काहीच्या भडक छटांची प्रथमदर्शनीच नजरेत भरणारी पखरण. त्याला काळ्या रंगाची पाश्र्वभूमी आणि या अशा मोठय़ा कॅनव्हॉसवर तुलनेने लहान आकारात पांढरा वेश अर्थात बाराबंदी परिधान केलेली पाठमोरी व्यक्ती. काही चित्रांमध्ये एक, तर काही चित्रांमध्ये अनेक व्यक्ती एवढाच  काय तो फरक. चित्रामध्ये काही तरी गूढ अर्थ भरून राहिल्याचे पाहताक्षणी लक्षात येते. हळूहळू नजर चित्रांतील बारकाव्यांवर फिरू लागते. त्यातून अधिक काही उलगडा होईल, असे वाटत असते. काही चित्रांमध्ये मग त्या काळ्या रंगछटांमध्येही रंगांचे विविध थर दिसू लागतात. आणि अगदी वरच्या बाजूस शहराची वाटावी अशी क्षितीजरेषा. अनेक प्रश्न मनामध्ये येत असतानाच. काही चित्रांमध्ये त्या पाठमोऱ्या व्यक्तीच्या खाली पडलेल्या सावलीकडे लक्ष जाते कारण ती सावलीही चमकणारी असते. ती सावली म्हणजे सोनेरी रंग नव्हे तर थेट सोनेच चित्रकाराने वापरलेले. मग आपण पुन्हा एकदा चित्रकार जॉन डग्लस यांच्या चित्रांचा विचार करू लागतो. प्रदर्शनाचे शीर्षक असते, इनर डिव्हिनिटी!

जॉनचे प्रत्येक प्रदर्शन हे त्याच्या आजवरच्या कामाशी थेट नाते राखणारे असते, हा पूर्वानुभव लक्षात घेऊन मग आपण त्या पाश्र्वभूमीवर पुन्हा चित्राकडे पाहू लागतो त्यावेळेस अनेक गोष्टींचा उलगडा आपसूक होतो. या चित्रांमधली क्षितिजरेषा मुंबई शहराच्या वावरातून आली आहे. त्याचे पहिले प्रदर्शन मुंबईविषयीचे होते. त्यानंतरचे ‘इन सर्च ऑफ लाईट’ हे जॉन ज्या सोलापूरमधून आला आहे, तेथील सिद्धरामेश्वराच्या जत्रेशी संबंधित होते. पांढरी बाराबंदी ही तिथूनच आली आहे. कारण या जत्रेमध्ये सहभागी सर्वजण केवळ पांढरी बाराबंदीच परिधान करतात. इथे प्रत्येक जण काहीना काही शोधत असतो. कुणी भविष्यातील मार्गक्रमणेच्या शोधात, तर कुणी  तेजाच्या शोधात तर कुणी स्वतच्याच! त्या जत्रेत मनात ठसलेल्या स्मृती मग जॉनने कॅनव्हॉसवर उतरवल्या.

..पण आताशा त्याच्या कॅनव्हॉसवर आलेला पिवळा, केशरी हे रंग अधिक प्रकाशमानता घेऊन आलेले दिसतात. काही तरी वेगळे आहे. पहिल्या प्रदर्शनामध्ये असलेला स्थलांतरणाचा परिणामही या खेपेस सादर झालेल्या चित्रांमध्ये असावा का, असा प्रश्न मनात येतो. आजवरही जॉनची चित्रमालिका नजरेसमोरून सरकत असताना लक्षात येते की, आजवरच्या अनेकविध अनुभवांचे  ठसे इथे आता या चित्रांमध्ये एकत्र येऊन एक वेगळाच विषय आता आकाराला आलेला दिसतो. जॉन हा समाजाविषयी संवेदनशील असलेला चित्रकार आहे. त्याच्याशी संवाद साधताना लक्षात येते की, सर्व जाती- वर्णभेद विसरून एकसमानता आणणारी पांढरी बाराबंदी त्याला सामाजिकदृष्टय़ा खूप महत्त्वाची वाटते.

काही चित्रांमध्ये दिसणारा सोन्याचा तुकडा हा प्रकाशाच्या तुकडय़ा सारखाच आहे. मुंबईमध्ये अनेकदा क्षितिजरेषा किंवा सूर्य थेट पाहायलाच मिळत नाही. दिसतात ते प्रकाशाचे तुकडे जे दोन इमारतींच्या रस्त्यावर पडलेल्या सावल्यांमध्ये चमकत असतात. शिवाय मुंबई ही आर्थिक राजधानी.. मग सोनेच प्रकाशछटा आणि त्याचे चमकणे दोन्ही व्यक्त करते.

ही चित्रे हा चित्रकाराचा आणि त्याचवेळेस माणसांचाही एक वेगळा शोध आहे. तो एकाच पातळीवर व्यक्तिगत आणि दुसरीकडे सामाजिक शोधदेखील आहे. कलावंतदेखील सामाजिक प्राणीच आहे. आजूबाजूच्या घटनाघटितांचे ठसे त्याच्याही मनावर उमटत असतात, ते मग एखाद्या विषयसूत्राच्या निमित्ताने कॅनव्हॉसवर उमटू लागतात. जॉनची यापूर्वीची प्रदर्शने ज्या रसिकांनी पाहिली आहेत, त्यांना सूत्र लगेच लक्षात येईल. पण त्याशिवायदेखील ही चित्रे स्वतंत्र चित्र म्हणून नव्याने पाहणाऱ्यालाही विषय जाणवून देण्यासाठी उजवीच ठरतात. कारण या चित्रांमध्ये दिसणारा प्रकाशाचा शोध रसिकांना जाणवल्याशिवाय राहात नाही!

response.lokprabha@expressindia.com

@vinayakparab

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2018 1:01 am

Web Title: article about beautiful john douglas artwork
Next Stories
1 उत्कटता, आवेग आणि अनुभूती!
2 बाहेरचे आणि आतले!
3 कलावंतांची वर्गवारी!
Just Now!
X