News Flash

कलावंतांची वर्गवारी!

कलाकारांमध्येही वर्गवारी झाल्यासारखे दिसते आहे.

कलाकारांमध्येही वर्गवारी झाल्यासारखे दिसते आहे. खासगी गॅलऱ्यांमधील मंडळी इतर कलावंतांना फारशी जमेस धरताना दिसत नाहीत

बॉम्बे आर्ट सोसायटी आणि आर्ट सोसायटी ऑफ इंडिया या भारतातील दोन नामांकित कला संस्था. यंदाचे वर्ष हे आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे शतकमहोत्सवी वर्ष आहे. तर बॉम्बे आर्ट सोसायटी या आशिया खंडातील सर्वात जुन्या म्हणजेच १२९ वर्षे वय असलेल्या कला संस्थेचे १२५ वे प्रदर्शन पुढील महिन्यात होणार आहे. या दोन्ही कला संस्थांनी गेल्या शतकभराच्या कालखंडात कलावंतांना व्यासपीठ देण्याचे मोलाचे काम केले आहे. त्यामुळे या दोन्ही कला संस्थांची वार्षिक प्रदर्शने हा अनेक वर्षे कलावंतांसाठी मानाचा विषय राहिला आहे. त्या त्या कालखंडातील नवीन प्रयोग सुरुवातीस या कला संस्थांच्या प्रदर्शनांमध्ये पाहायला मिळाले आहेत. नंतर गाजलेल्या अनेक कलावंतांच्या बाबतीत असे झाले आहे की, या दोनपैकी कोणत्या तरी एका वार्षिक प्रदर्शनात त्यांना पुरस्कार मिळाला आणि कलाजगताची नजर त्यांच्याकडे गेली. मध्यंतरीच्या १५-२० वर्षांच्या कालखंडात ही प्रदर्शने केवळ एक उपचार होऊन राहिली होती. तरीही कलावंत या संस्थांच्या वार्षिक प्रदर्शनासाठी आजही मोठय़ा प्रमाणावर चित्रे पाठवीत असतात. आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे वार्षिक प्रदर्शन गेल्याच आठवडय़ात जहांगीर कलादालनात पार पडले. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये या दोन्ही संस्थांच्या प्रदर्शनांमध्ये थोडा चांगला फरक पडलेला दिसतो, हेही नमूद करावे लागेल.

यंदाच्या प्रदर्शनात विद्यार्थीवर्गामध्ये सर्वाधिक वेधक ठरले ते किन्नरी तोंडलेकरचे ‘रूम’ हे चित्र. एरिअल अँगलने चितारलेली रूम काहीशी ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइटच्या जमान्याची आठवण करून देणारी आणि छाया-प्रकाशाची गंमत खुलवणारी अशी होती. छायेच्या विविध छटा त्यात चांगल्या पद्धतीने आल्या होत्या. रचनेच्या दृष्टीनेही ही कलाकृती उजवी होती. झरीन फातिमा टी. श्मसी हिची शरीराच्या आतील रचनेच्या पाश्र्वभूमीवर, माशाचा काटा कापडावर शिवून मिश्र माध्यमातून साकारलेली कलाकृतीही वेगळी ठरली. बडोद्याच्या मलाबिका बर्मनची कलाकृती कागदावर उठावशिल्पाचा आभास निर्माण करणारी होती. चार चौकोनांपैकी दोनमध्ये वाहणारी एक नदी रेखांकित केलेली होती तर उर्वरित दोन चौकोनांच्या पांढऱ्या उठावामध्ये कोरडय़ाठाक पडलेल्या जमिनीचा तुकडय़ांचा भाग आणि दुसऱ्या भागात वठलेले झाड उठावामध्ये होते. चित्रकल्पना साधी, सोपी आणि परिणामकारक होती. आर. सेंथिल कुमारचे ‘मुंबई लाइफ’ हे चित्र त्याच्यातील सर्जनशीलतेची ताकद स्पष्ट करणारे होते. दोन्ही बाजूंनी असलेल्या चाळी आणि त्यांचे बकालपण. एका बाजूच्या चाळी पूर्णपणे सावलीत तर दुसरीकडे मात्र प्रकाशाची छाया अशी रचना त्यात होती. पारंपरिक रचनेला छेद देण्याचा त्याचा यशस्वी प्रयत्न होता. अरिवद तनावरापूचे ‘धीरगंभीर’ हे अमूर्तही गंभीरतेची छाया, त्याचे फटकारे आणि रंगकाम यातून जाणवून देणारे होते. बुऱ्हाण नगरवालाचे ‘सॅन फ्रान्सिस्को’ रंगलेपनातील कौशल्याने चांगला पोत व परिणाम दाखविणारे होते. प्रदर्शनासाठी निवड झालेल्या अनेक मुद्राचित्रांची गुणवत्ता नोंद घेण्याइतकी चांगली होती.

02-lp-art

रघुवीर शिंदेचे ‘मोरेकाका’ आणि अमित धानेचे ‘तालीम’ ही दोन्ही व्यक्तिचित्रे दखल घ्यावी, अशी होती. व्यक्तिचित्रणात डोळ्यांना विशेष महत्त्व असते. ते व्यक्तिचित्राचा प्राण असतात, असे म्हटले जाते. या दोन्ही व्यक्तिचित्रांचा विशेष म्हणजे प्रकाशाची तिरीप विशिष्ट पद्धतीने आली की, समोरच्या व्यक्तीचा एक डोळा अनेकदा काळसर दिसतो किंवा व्यवस्थित दिसत नाही; हे या दोन्ही चित्रकारांनी परिणामकारकतेने चित्रात आणले आहे. यातील शिंदे याच्या चित्रात डोळ्यांवर चष्मा आहे, त्यातील प्रकाशाची छटा वाखाणण्याजोगी होती.

अनेक चित्रकार आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर व्यक्त होत असतात, कारण तेही याच समाजाचा एक भाग असतात. अलीकडे गोंधळ झाला तो नोटाबंदीमुळे. त्याचे प्रतिबिंबही प्रदर्शनातील ‘क्यू’सारख्या चित्रांतून पाहायला मिळाले. राजू मोरेचे ‘केवळ  २२२६ शिल्लक राहिलेत’ हे वाघांची हत्या व तस्करीवरील चित्र एका बाजूला देवीचे वाहन म्हणून त्याला मान द्यायचा आणि दुसरीकडे हत्या करायची या विरोधाभासावर कलात्मक पद्धतीने नेमके बोट ठेवणारे होते. सुनील पुजारी या कलावंताची आता जलरंगावर चांगली पकड येत चालली आहे, याचा प्रत्यय त्यांच्या ‘राज राजेश्वरी मंदिर’ या चित्रामधून आला, चित्ररचनाही तेवढीच सुंदर आहे.

संपूर्ण प्रदर्शन पाहिल्यानंतर अनेक प्रश्न मनात आले. गेल्या अनेक वर्षांमध्ये कला क्षेत्रात खूप मोठे बदल झाले आहेत. जगभरात अनेक नवनवीन प्रयोग सुरू आहेत. त्याचे प्रतिबिंब खरे तर या कला संस्थांच्या प्रदर्शनांमध्ये पाहायला मिळणे अपेक्षित आहे. तसे फारसे होताना दिसत नाही. एखादीच कलाकृती एकदम वेगळी असते. मात्र खूप वेगळे, असे फारसे काही पाहायला मिळत नाही. जे एकदम वेगळे असते ते गेल्या अनेक वर्षांत खासगी गॅलऱ्यांकडे आकृष्ट झालेले दिसते, ती मंडळी या प्रदर्शनांमध्ये फारशी फिरकतही नाहीत. त्यामुळे कलाकारांमध्येही वर्गवारी झाल्यासारखे दिसते आहे. खासगी गॅलऱ्यांमधील मंडळी इतर कलावंतांना फारशी जमेस धरताना दिसत नाहीत आणि त्या गॅलऱ्या सामान्य कलावंतांना उभेही करीत नाहीत. अर्थात त्यांच्यासाठी व्यवसाय अग्रस्थानी असतो आणि तो असणारच. पण मग अधिक संख्येने असलेल्या या कलावंतांना या क्षेत्रात वेगळे काही करण्यासाठी दिशादर्शनाचे काम कोण करणार? एखाद वर्षी असाही प्रयत्न केला जाऊ शकतो की, वार्षिक प्रदर्शन जाहीर होण्याच्या (खरे तर आताशा त्याची गरज नाही; कारण ते केव्हा असते हे सर्वानाच ठाऊक आहे.) काही महिने आधी सध्या जगभरात काय सुरू आहे, या संदर्भातील व्याख्याने किंवा सादरीकरणे कलासंस्थांनी आयोजित करावीत. न जाणो, एखाद्याने त्यातून प्रेरणा घेऊन वेगळे दृश्यप्रयत्न सादर केले तर!
विनायक परब – response.lokprabha@expressindia.com
@vinayakparab

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 1:05 am

Web Title: bombay art society art soceity of india exhibition
Next Stories
1 वन्यजीव चित्रणातील कौशल्य नेमके कशात?
2 दर्शन मात्रे मन कामना पुरती!
Just Now!
X