जंगलात घडामोडी वेगात होतात तुम्हाला विचार करण्याचीही संधी मिळत नाही, अशा वेळेस तुम्ही तेवढय़ाच वेगात क्लिक करताना केलेला विचार तुमची कसोटी पाहत असतो!

पूर्वी एखादे छायाचित्र टिपतानाच छायाचित्रकार भरपूर विचार करायचा. कारण त्यावेळेस हे प्रकरणच मोठे खर्चीक होते. एका रोलमध्ये साधारणपणे ३६ फोटो टिपले जायचे. तुम्ही रोल कॅमेऱ्यात व्यवस्थित सेट केलात तर प्रसंगी ३८ किंवा ४० छायाचित्रेही टिपली जायची. मुळात रोल महाग होता, शिवाय त्यात प्रोसेसिंग आणि छपाई या दोन्हींचा खर्च असे मिळून एका रोलवर खरेदी ते छपाई असा साधारण चारशे ते पाचशे रुपये खर्च व्हायचा. त्यामुळे प्रत्येक फ्रेमला एक किंमत होती, ती फ्रेम वाया गेली तर तेवढे पैसे वाया असे सरळ गणित होते. मुळात या खर्चीक प्रकारामुळे ज्यांना जमायचे तेच या कलेकडे वळायचे. नंतर ‘पॉइंट अ‍ॅण्ड शूट’चा जमाना आला आणि सामान्य माणसाच्या हातात कॅमेरा खेळू लागला. तरीही बहुतांश लोक अ‍ॅपर्चर, शटर स्पीड या तांत्रिकतेपासून दूरच राहायचे. मात्र नंतर डिजिटल प्रकरण आले आणि सर्वाच्याच हातात कॅमेरा खेळू लागला. आता ज्याला साध्या कॅमेऱ्यावरही फोटो टिपता येतो तो स्वत:ला छायाचित्रकार म्हणवून घेतो. कारण आता माणसाचे डोके कमी आणि कॅमेऱ्यामधील ऑटो सॉफ्टवेअरच अधिक काम करते, त्यामुळे कोणीही काढलेले फोटो अ‍ॅपर्चर आणि शटर स्पीड व्यवस्थित असलेलेच असतात. अशा वेळेस छायाचित्रकाराचा कस लागतो तो त्या विषयाचे फ्रेमिंग म्हणजेच चित्रचौकट किती कलात्मक आहे किंवा नेमकी कोणत्या पद्धतीने चित्ररचना करत वापरली आहे यावर किंवा मग पोत कसा टिपला आहे अथवा  छायाचित्रातील अवकाश नेमके कसे राखले आहे, त्याचा प्रयोग कसा केला आहे वा मग त्यातील प्रकाश जो छायाचित्राचा आत्मा म्हटला जातो तो नेमका कसा वापरला आहे यावर त्याचे सौंदर्य ठरत असते. हे मात्र त्या यंत्राला अद्याप जमलेले नाही. तो तांत्रिक गोष्टी तुमच्यासाठी सेट करू शकतो. सध्या तरी चित्रचौकट मानवी मेंदूलाच निवडावी लागते. एकूणच यामुळे सर्वच डिजिटल चित्रण तांत्रिकदृष्टय़ा अनेकदा निर्दोषच असते. अशा वेळेस समीक्षण करताना अनेकदा नवे निकष तांत्रिक बाबी ध्यानात ठेवून स्वीकारावे लागतात. पूर्वी ज्या वेळेस सारे काही सेटिंग आपल्यालाच मॅन्युअल मोडवर करावे लागत होते, तेव्हा वेगात असलेल्या विषयाचे छायाचित्रण थोडेसे अवघड होते. पण आता तेही सहजसाध्य झाले आहे. पण मग नेमका डिजिटल निकष कुठे लागतो, त्याच्या उदाहरणासाठी भक्ष्य असलेला कीटक तोंडात पकडून वेगात जाणाऱ्या पक्षाचे शेजारचे छायाचित्र विचारात घ्यावे लागेल.  छायाचित्रकार डॉ. बारून सिन्हा यांनी हे छायाचित्र टिपले आहे. डिजिटल असल्यामुळे ते सुस्पष्ट तर आहेच. सर्वसाधारणपणे वन्यजीव चित्रणामध्ये क्रिया किंवा अ‍ॅक्शनला महत्त्व असल्याने झेपावतानाची क्रिया किंवा तो क्षण नेमका पकडण्याची धडपड असते. सध्या जमाना डिजिटलचा असल्याने आणि प्रतिसेकंद वाट्टेल तेवढय़ा फ्रेम्स टिपण्याची क्षमता कॅमेऱ्यात असल्याने तुम्ही सजग असाल तर पक्षी उडणार असे लक्षात आल्यानंतर केवळ शटरवर बोट ठेवून राहिले तरी चालते कारण नंतर टिपल्या गेलेल्या फ्रेम्सपैकी कोणती तरी एक निश्चितच चांगली येते. यात सजगता किंवा फ्रेम यापुरतेच तुमचे कौशल्य मर्यादित असते. मग उडताना किंवा झेप घेतानाचे ते छायाचित्र आपल्याला आवडते. पण त्यात फारसे कौशल्य आताच्या जमान्यात लागत नाही. पण पक्ष्याने वेगात जाण्यासाठी आपले शरीर बरोबर १८० अंशांच्या कोनात आणले आहे, तो वेगात चाललेला आहे, त्याचा वेगही जाणवावा आणि शिवाय सुस्पष्टताही यावी हे केवळ डिजिटलमध्येच अधिक शक्य आहे. पूर्वीच्या तुलनेत. पूर्वी असे छायाचित्र टिपण्यासाठी कमालीचे कौशल्य छायाचित्रकाराला संपादन करावे लागे, मात्र आता हाती असलेल्या डिजिटलची ताकद लक्षात घेऊन असे छायाचित्र टिपता येते. अर्थात त्यासाठीही अगदी कमालीचे नाही तरी कौशल्य लागतेच. कारण बहुतांश वेळेस तुम्हाला अशा छायाचित्रांसाठी झूमचा वापर करावा लागतो. झूम हाताळणे हेच अनेकदा कौशल्याचे असते. त्यातही विषय वेगात असताना हाताळणे हा स्वतंत्र कौशल्याचा विषय आहे. म्हणून हे छायाचित्र वेगळे ठरते. शिवाय पक्षीनिरीक्षकांच्या दृष्टीतूनही या झेपेला वेगळे महत्त्व आहे. वन्यजीवचित्रण करताना त्या विषयाची खासियतही लक्षात ठेवावी लागते.

02-lp-bird

सायंकाळच्या वेळेस डोंगर उतारावरून उतरणारा बिबळ्या प्रकाशाच्या विरुद्ध दिशेने असा टिपावा की, केवळ त्याची बाह्य़ाकृतीच स्पष्टपणे दिसावी. त्यातही छायाचित्रणातील कलात्मकतेचे भान छायाचित्रकाराने चांगले राखले आहे. बिबळ्याचा पहिला पाय मुडपलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे हे छायाचित्र अधिक नैसर्गिक क्रिया टिपणारे भासते. तो पाय सरळ असता तर छायाचित्रातील गंमत प्राणीतज्ज्ञ आणि छायाचित्रकार दोघांच्याही नजरेतून कमीच झाली असती. वन्यजीव चित्रणातील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे परिस्थिती तुमच्या हाती नसते. अशा वेळेस त्याही अवस्थेत कलात्मक भान राखण्यासाठी सराव किंवा मग अंगी कौशल्य बाणलेले असणे महत्त्वाचे असते.

पण एक महत्त्वाची बाब मात्र ध्यानात ठेवावीच लागते ती म्हणजे चित्रसौंदर्याच्या संदर्भातील कोणता तरी एक निकष हा तुमच्या छायाचित्राने पूर्ण केलेला असावाच लागतो. परिस्थिती हातात नसली तरी मग असा निकष पूर्ण करणारे छायाचित्रही उजवे ठरू शकते. याचेच एक दुसरे उदाहरण म्हणून सिन्हा यांच्याच जहांगीर कलादालनात पार पडलेल्या प्रदर्शनातील रंगीबेरंगी आफ्रिकन रोलर पक्ष्याला गट्टम करणाऱ्या मगरीचे छायाचित्र घेता येईल. यामध्ये मगरीच्या त्वचेचा खडबडीत पोत आणि तिने पकडलेल्या पक्ष्याच्या पंखांचा रंगीत पोत यामध्ये एक जबरदस्त विरोधाभास दडलेला आहे. शिवाय त्यात अ‍ॅक्शन तर आहेच, पण यात लक्षात राहतो तो पोतामधला विरोधाभास. जंगलात घडामोडी वेगात होतात. तुम्हाला विचार करण्याचीही संधी मिळत नाही, अशा वेळेस तुम्ही तेवढय़ाच वेगात क्लिक करताना केलेला विचार तुमची कसोटी पाहत असतो!
विनायक परब – vinayak.parab@expressindia.com
@vinayakparab