03 August 2020

News Flash

जांब आणि मुंग्या..

जांभळाला हिंदीत जामून म्हणतात. या जामून शब्दाचा घोळ एका फळाच्या नावाबरोबर होतो.

‘थंडा-मीठा जाम ले लो’ ही आरोळी ऐकू येणार ती फक्त याच दिवसांत. कारण हे शरीराला थंडावा देणारं खास उन्हाळी फळं आहे. हाच उन्हाळा संपत आला आणि मुंग्यांची लगबग दिसायला लागली की लवकरच पाऊस येणार हे डोळे मिटून सांगता येतं.

आठवडी बाजारात चक्कर मारली तर ऐन भरात आलेला उन्हाळा सहज जाणवतो. एकीकडे भाज्यांच्या गगनाला भिडलेल्या किमती डोळे दिपवत असतानाच, गगनावरी उंच झाडांवरून थेट बाजारात आलेला रानमेवा नजर खेचून घेत असतो. वर्षभर वाट पाहायला लावून भेटीला येणारा आंबा आता खिशाच्या आवाक्यात आला असतानाच, करवंदाच्या जोडीला जागोजागी जांभळांचे वाटे विकायला आलेले दिसतात. शंभर टक्के भारतीय असलेलं हे फळ खातखात मागच्या अनेक पिढय़ा मोठय़ा झाल्या आहेत. जांभळाचं नुसतं नाव जरी उच्चारलं की त्याचा रंग, ते खाऊन रंगलेली जीभ, दात लगेच आठवतात. इंग्रजीत ‘जावा प्लम’, डॅमसन प्लम, पोर्तुगीज प्लम, ब्लॅक प्लमसारख्या नावाने भेटायला येणाऱ्या या जांभळाचं वनस्पतीशास्त्रीय नाव आहे ‘सायझिगिमि कुमिनी’. साधारण तीस मीटरची उंची गाठणारं हे झाड सदाहरित गटात मोडतं. याची हिरवीगार पानं वर्षभर डोळ्याला सुखावतात. मला आठवतंय, माझ्या आत्याकडे गावाबाहेर जांभळाची मोठीमोठी झाडं होती नि त्यांच्या सावलीत आम्ही खेळायचो. माझ्या बालपणातली अनेक झाडं आजही हिरवीगार आहेत. याचं कारण म्हणजे जांभळाच्या झाडाला मिळालेलं दीर्घायुष्य! कोणतीही हानी झाली नाही तर ही झाडं सहज वयाचं शतक गाठतात.
भारतात तरी जांभळाचं झाड न पाहिलेला मनुष्यप्राणी विरळाच. जांभळाच्या झाडाचं साल बुंध्याकडे खडबडीत नि रखरखीत काळसर रंगाचं असतं, पण तेच शेंडय़ाकडे मात्र मऊ होऊन रंगही उजळ बनतो. या झाडाचं लाकूड चिवट समजलं जातं. पाण्यापासून खराब न होण्याच्या गुणधर्मामुळे याचा वापर आपल्या रेल्वे रुळांमधल्या मधल्या पट्टय़ा म्हणजेच स्लीपर्स बनवायला केला जायचा. गावाकडच्या विहिरींची मोटदेखील याच लाकडाने बनवली जाते. चुरडून पाहिलं तर, जांभळाच्या पानांना एक मजेशीर वास असतो. टप्रेन्टाइनसारखा. पानांमधल्या पौष्टिक गुणधर्मामुळे ही पानं जनावरांसाठी उत्तम चारा समजला जातात. उन्हाळ्यात जांभळाची झाडं फुलतात. मार्च-एप्रिलमध्ये या झाडाला बारीक पांढरट मधुर वासाची फुलं येतात. याच फुलांमधून मे महिन्यात हिरवट फळं येतात. हीच हिरवट फळं पुढे लाल नि मग जांभळी काळी होतात.
बाकी काही म्हणा, देशी आणि विदेशी झाडांमध्ये तुलना करायची म्हटली तर आपली भारतीय झाडं भारी असतात. जांभळाची नुसती पानं, फळंच उपयोगाची असतात असं नाही तर फळाची बीसुद्धा वापरली जाते. जांभळाचा जगभर मान्य असलेला औषधी उपयोग म्हणजे डायबेटीस ऊर्फ मधुमेह ताब्यात ठेवणे. रक्तातली साखर कमी करण्यासाठी, हाडांच्या बळकटीसाठी या फळातले कॅल्शियम, खनिजं, लोह, प्रथिने उपयोगी पडतात. शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जांभूळ उपयुक्त ठरले आहे. जांभळातलं व्हिटॅमिन सी आणि लोहाच्या मात्रेमुळे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. अलीकडेच्या एका संशोधनात सिद्ध झालंय की जांभूळ खाल्ल्याने हृदयविकार आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होत नाही. याचा अजून महत्त्वाचा अपरिचित उपयोग म्हणजे पोटाच्या अल्सरच्या दुखण्यावर, तोंडात व्रण येण्यावर याच्या पानांचा उपयोग केला जातो. तोंडाची चव गेली की जांभळाची बी भाजून काळ्या मिठाबरोबर खाण्याची पद्धत मी अदिवासी लोकांमध्ये पाहिली आहे.
अशा या परिपूर्ण फळाचे खाण्याचे उपयोग तर अगणित आहेत. यातले अगदी मुख्य उपयोग म्हणजे जांभळाचा रस, जाम, जेली, जांभूळ पोळी इत्यादी. पण जांभळापासून उत्तम व्हिनेगर, वाईनसुद्धा बनते हे फार थोडय़ांना माहीत आहे. आपल्या संपूर्ण देशभर सापडणारं जांभूळ आपल्या लोककथा, सहित्याचा अविभाज्य अंग आहे. जांभूळ म्हटलं की ‘जांभुळ पिकल्या झाडाखाली’ हे गाणं हमखास आठवतं. असं हे बहुगुणी झाड यावर्षी रुजवायला हवंच.
जांभळाला हिंदीत जामून म्हणतात. या जामून शब्दाचा घोळ एका फळाच्या नावाबरोबर होतो. जांब ऊर्फ जाम हेही उन्हाळी फळ सध्या बाजारात डेरेदाखल झालंय. लहानपणी या फळाबरोबर गट्टी जमली कारण माझ्या आईचं हे आवडत फळ. लहानपणी मला नेहमी प्रश्न पडायचा की इतर फळं कशी ढिगढिगाने विकायला दिसतात, पण हेच फळ का बरं तसं दिसत नाही? विकणाऱ्यांकडे याचे अगदी पत्त्याच्या बंगल्यासारखे थर रचलेले असतात. निसर्ग शोधयात्रेत या फळाची शास्त्रीय पद्धतीने गाठ पडली तेव्हा या पत्त्याच्या बंगल्याचं उत्तर सहज मिळालं.
हे जांब ऊर्फ जाम नावाचं फळ मुळात भारतीय नाही. मलय प्रांतातून आपल्याकडे अंदमान निकोबारमाग्रे आलेलं हे फळ नगदी पीक म्हणून देशात स्थिर झालंय. साधारण दहा ते बारा मीटर्स उंच वाढणारं हे झाड सदाहरित या प्रकारात मोडतं. चांगली लांब चकचकीत पानं असलेलं जांबाचं झाड सुंदर म्हणावं असंच दिसतं. याची पानं, पेरूसारखी दिसणारी फुलं आणि घंटेच्या आकाराची फळं अगदी चकचकीत असतात. जांबाचं वनस्पतीशास्त्रीय नाव तसं किचकट आहे. जांभळाचं चुलत भावंड असणाऱ्या आणि ‘सायझिगियम समरान्गेन्स’ हे नाव धारण केलेल्या जांबाला इंग्रजीत अगदी खंडीने नावं आहेत. पूर्वी गोऱ्या लोकांची गंमत होती. त्यांनी बहुतेक सर्व अनोळखी फळांना अ‍ॅपल्स या नावाने संबोधित केलंय. मग ते वूड अ‍ॅपल, कस्टर्ड अ‍ॅपल असो की व्ॉक्स अ‍ॅपल.. तसाच प्रकार त्यांनी या फळाचं नामकरण करताना केलाय. ‘लव्ह अ‍ॅपल’, ‘जावा अ‍ॅपल’, ‘व्ॉक्स अ‍ॅपल’, ‘वॉटर अ‍ॅपल’ , ‘माऊंटन अ‍ॅपल’, ‘क्लाऊड अ‍ॅपल’, ‘जमकन अ‍ॅपल’, ‘रॉयल अ‍ॅपल’ अशी खंडीने नावं या झाडाला ठेवली आहेत. अनेकांना हे जांबाचं झाड कसं दिसतं, फुलतं कसं हेच माहीत नसतं. या झाडाला आधी फुलं येतात. ही फुलं चार पाकळ्या असलेली पांढरट रंगाची असतात. पुढे यातूनच घंटेच्या आकाराचं फळ येतं. भारतात पांढऱ्या रंगाचे जांब येतात नि यात किंचित गुलाबी छटा असते. जांबाचे काही ठरावीक ठळक रंग असतात. पांढरा, हिरवा, फिक्कट हिरवा, गुलाबी, जांभळा आणि कधीकधी काळा रंगपण पहायला मिळतो. जितका या फळाचा रंग फिक्कट किंवा गडद, तितकाच याचा गोडपणा जास्त असं एक समीकरण याच्याबाबतीत असतं. जांबाच्या पाणीदार फळात काळसर रंगाच्या एक किंवा दोनच बिया असतात. या झाडाला फळं आली की थोडीथोडकी नाही तर चक्क सहाशे-सातशे फळं येतात आणि या भाराने हे झाड अगदी वाकून जातं. फळ तसं नाजूक असतं म्हणून ते टोपलीत किंवा ढिगात टाकलं जात नाही तर एकमेकांवर अलगद पत्त्याच्या बंगल्यासारखं रचून ठेवलं जातं.
जांबाच्या फळाचे मुख्य उपयोग म्हणजे ज्यूस बनवण्यासाठी व खाण्यासाठी. पूर्वेकडच्या देशांमध्ये ही फळं सॅलडमधे वापरली जातात. ज्यूस बनवणे, परतून भाज्यांमध्ये घालणे, हाही वापर आहेच. चायनीज औषधांमध्ये याची फुलं ताप उतरवायला वापरतात. पोटाच्या दुखण्यावर, अतिसारावरदेखील यांचा वापर केला जातो. वर्षभर न दिसणारी ही अशी फळं उन्हाळ्यातच नजरेस पडतात.
या जांबाच्या फुलांमधले तुरे सुकले की मुंग्या ते गोळा करून नेताना मी बघितलं होतं. पावसाळा जवळ आला की या कीटकांच्या दुनियेत एकदम हलचल होऊन जाते. अंडी, धान्य वगरे सुरक्षित ठिकाणी हलवण्याची धडपड सुरू होते नि आपण म्हणतो पावसाळा जवळ आला.
आपल्या साहित्यात अजरामर स्थान मिळवलेल्या मुंग्यांची महिती सांगा असं कुणाला विचारलं तर ‘त्या लाल आणि काळ्या अशा दोन प्रकारच्या असतात’ याखेरीज क्वचितच माहिती कुणी देऊ शकतं. विशेष गंमत म्हणजे, आपल्या देशात शेकडो जातीच्या मुंग्या आढळतात. आपण ज्या मुंग्या बघतो ना त्या तीन वेगवेगळ्या गटांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. पहिला प्रकार म्हणजे कामकरी मुंगी! मुंग्यांच्या वसाहतीत अर्थात याच कामकरी जनतेची मेजॉरिटी असते. अगदी हजारो लाखोंच्या संख्येत असतात या मुंग्या. यांचं काम असतं की आपल्या वसाहतीचं शत्रूपासून रक्षण करणं आणि शत्रूवर हल्ला चढवणं. याच्याच जोडीला या कामकरी मुंग्या वारुळाची डागडुजी, साफसफाई करतात. राणी मुंगीने घातलेल्या अंडय़ांचं रक्षण हे यांचंच काम असतं. काही कामकरी मुंग्या नर्स मुंग्या म्हणून काम करतात नि अंडय़ाची, लहान पिल्लांची काळजी घेतात. याच जोडीला वसाहतीतल्या खाद्यसाठय़ांमध्ये भर घालणे, पावसाळ्याची बेगमी करणे हेसुद्धा याच कामकरी मुंग्या करतात.
मुंग्यांच्या वसाहतीतला मुंग्यांचा दुसरा गट म्हणजे नर मुंग्या. गंमत म्हणजे या नर मुंगीलाच फक्त बरं दिसू शकणारे डोळे असतात. बाकी बहुतेक कामकरी मुंग्या आणि राणी मुंग्या चक्क आंधळ्या असतात. म्हणजे विनोदाने बोलायचं झालं तर हा नर आपल्या मादीला ओरडून विचारू शकतो, ‘कधीपासून फक्त मीच पाहातोय तू काय उद्योग करते आहेस ते’ या नर मुंगीला पंख असतात. मेटिंगच्या काळात नरमादी दोघेही हवेत उडतात. मेटिंग झाल्यावर राणी मुंगीचे पंख गळून पडतात आणि नर मुंगी जास्त दिवस जगत नाही.
या गटाचं काम असतं सतत प्रजोत्पादनाला मदत करणं. आता राहता राहिली ती राणी मुंगी. हिचं काम असतं अंडी घालणं. राणीनं घातलेल्या अंडय़ांचं रक्षण कामकरी मुंग्या करतात. याचं कारण म्हणजे मुंग्या सहजीवन पद्धतीवर विश्वास ठेवतात आणि आयुष्यभर दिलेली जबाबदारी नीट पार पाडतात. कामकरी मुंग्या साधारण सात र्वष जगतात आणि राणी मुंगी चक्क १५ वर्षांपर्यंत जगते. ही राणी मुंगी मेली तर मुंग्यांची ती वसाहत फार जास्त टिकत नाही. कारण नवीन मुंग्या जन्माला घालण्याचं कामच होत नाही आणि दुसरी राणी अशा अनाथ वसाहतीला ताब्यात घेत नाही. मजा म्हणजे, गोऱ्या लोकांनी राणीच्या अधिपत्याखाली जगभर लोकांना जसं गुलाम बनवलं तसंच कामकरी मुंग्या शत्रूची अंडी पळवून आणतात नि त्यांना गुलाम म्हणूनच ठेवतात.
पृथ्वीतलावरचा सगळ्यात यशस्वी कीटक मुंगी आहे. कारण जगात कुठेही ते टिकून आहेत. पापलेट, कटलेट, चॉकलेटपासून रवा, खवा, मेवा असं सगळं वाहून नेणाऱ्या या मुंग्या एकमेकींशी संभाषण करतात. हे संभाषण कसं असेल हा विचार मोठी माणसं करत नाहीत, पण लहान मुलं हा प्रश्न मला हमखास विचारतात. या मुंग्या एकमेकींना स्पर्श करून नि खास रसायनांचे स्त्राव सोडून आपापसात संभाषण करतात. आहे ना गंमत? मुंग्या स्वतच्या वजनाच्या २०पट जास्त गोष्टी उचलून नेतात. खरंच या कामकरी मुंग्या म्हणजे एक अजब रसायन असतं.
या सहजीवी कीटकांची अपत्य संगोपन पद्धतीबरोबरच घर बांधण्याची कलादेखील जबरदस्त असते. आपल्याकडे अजूनही गावाबाहेर चक्कर मारली तर मुंग्यांची वारुळं बघायला मिळतात. स्वतच्या सहा पायांनी आणि जबडय़ाने हे चिंटुकले जीव जी काही किमया करतात हे बघून थक्क व्हायला होतं. आपल्याकडच्या जंगलात क्रॅमॅटोगस्टर नावाच्या मुंग्या दिसतात. या सुकलेली पानं, माती स्वत:च्या लाळेत मिसळून झाडांवर ‘वॉटरप्रूफ’ घरं बनवतात. वॉटरप्रूफ पुठ्ठा बनवणारा निसर्गातला हा पहिला जीव आहे बरं का! अजूनही आपल्याला असं काही वॉटरप्रूफ बनवायचं असेल तर त्यावर प्लास्टिकचं कव्हर घालावंच लागतं नाही का? या मुंग्यांची एकेक घरं बघितली की थक्क व्हायला होतं. जंगलातल्या भटकंतीत झाडांवर बनवलेलं, नेहमी दिसणारं मुंग्यांचं घर म्हणजे पॅगोडा नेस्ट. हेसुद्धा अशाच वॉटरप्रूफ प्रकारने बनवलेलं असतं. अनेकदा शेताच्या बांधांवर, जंगलात, रानात मातीची कमळफुलं जमिनीवर ठेवलेली दिसतात. ही फुलं म्हणजे शेतकरी मुंग्या म्हणजे हाव्‍‌र्हेस्टर्स अ‍ॅन्ट्स स्वतच्या लाळेने माती मिसळून जमिनीवर मातीच्या फुलासारखं घर बनवतात. या मुंग्यांच्या घरातल्या भिंतींवरून तुम्ही जंगलात पूर्व-पश्चिम दिशासुद्धा ओळखता येतात. ऐकावं ते नवलच असतं निसर्गात.
लहानपणापासून आपल्याला फक्त राक्षसाची लाल आणि देवाची काळी मुंगीच माहीत करून दिलेली असते. डोळे उघडून जर नीट पहिलं तर आपल्याला लाल, काळ्या, तांबडय़ा, भुऱ्या, जाड, बारीक, पोट उंच करून धावणाऱ्या, उडणाऱ्या, कडकडून चावणाऱ्या ..एक ना अनेक प्रकारच्या मुंग्या दिसायला लागतात. जांबाच्या फळांतून आपल्या गप्पा मुंग्यांवर जाऊन पोहोचल्या. आसमंतात प्रत्येक गोष्टीचा जीवमात्राचा संबंध एकमेकांशी सहजच जोडला गेलेला असतो. गरज असते ती आकाशात उडणारी घार होताना जमिनीवरच्या बारिकातल्या बारीक जीवाकडे नीट लक्ष देण्याची. मग आसमंतातल्या वाळक्या पानाखालची अद्भुत दुनियाही नजरेत भरायला सुरुवात होते.
रुपाली पारखे देशिंगकर response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2016 1:01 am

Web Title: black plum and ant
Next Stories
1 उन्हाळी आनंद सोहळा
2 वृक्ष-फुलं-पक्षी- प्राण्यांच्या देशा…
3 सोनमोहोर आणि बहावा
Just Now!
X