03 August 2020

News Flash

धेड उंबर, साग आणि गांडूळ!

निसर्गातल्या वेगवेगळ्या घटकांचं वैविध्य अचंबित करणारं आहे.

निसर्गातल्या वेगवेगळ्या घटकांचं वैविध्य अचंबित करणारं आहे. औदुंबराइतकंच वैशिष्टय़पूर्ण झाड म्हणजे धेड उंबर. त्याच्याइतकंच शंभर टक्के भारतीय झाड म्हणजे सागवान. या दोन झाडांबरोबरच शेतकऱ्याचा मित्र असलेल्या गांडुळाचीही नव्याने ओळख करून घेऊया..

आसमंतात आता पाऊस व्यवस्थित स्थिरावलाय. जमिनीत पाणी मुरून निर्माण होणारा ओलावा, हवेतला गारवा आणि गळून गेलेले वृक्षावशेष कुजून सगळीकडे भिनलेला ओला वास यांची भट्टी जमून आलीय. या सर्दाळलेल्या हिरवाईला तुडवत गडकिल्ले पालथे घालणारेही मोठय़ा संख्येने भ्रमंती करताना दिसताहेत. अनेकदा अति उत्साहाच्या भरात नवीन ठिकाणी जाऊन झालेल्या भुलचुकीने सह्यद्रीत हरवण्याचे प्रकारही वाढताहेत. आपल्या स्वत:च्या वाटांनी सह्यद्री चढणं म्हणजे निव्वळ वेडेपणाच ठरतो. अशाच एका ग्रुपने त्यांच्या चुकामुकीत सह्यद्रीत हरवण्याचा अनुभव घेतला. जवळील खाद्यपदार्थ संपल्याने उपास घडत असताना एका झाडाची फळं नजरेस पडली. पक्षी आणि माकडं ती फळं खात असल्याने, मानवी खाण्यासाठी सुरक्षित असावीत असा अंदाज बांधून, या ग्रुपने ही फळं पोटभर खाली. योग्य मदत मिळून शहरात पोहोचल्यावर त्यांनी या फळांचे फोटो पाठवल्यावर लक्षात आलं, अरेच्चा! हा तर धेड उंबर आहे. कुणाच्या खास खिजगणतीत नसलेलं हे शुद्ध भारतीय झाड या मित्रांच्या उपयोगी पडलं होतं. धेड उंबर.. नावच मोठं मजेशीर आहे. बहुतांश ठिकाणी पूर्वी सहज उगवणारं मध्यम आकाराचं झाड अजूनही नीट पाहिलं तर शहरात सहजच कुठे तरी गटाराच्या जवळ, कंपाऊंडच्या भिंतींवर उगवलेलं दिसून येतं. मागच्या लेखात भेटून गेलेला औदुंबर आणि धेड उंबर एकाच मोरेसी कुळातल्या फायकस कुटुंबातले सदस्य आहेत. फायकस हिस्पिडा या वनस्पतिशास्त्रीय नावाने ओळखलं जाणारं हे मध्यम आकाराचं झाड साधारण दहा मीटर्सची उंची गाठतं. कुठल्याही प्रकारे भरभक्कम बांधा नसलेलं हे झाड पानझडी प्रकारात गणलं जातं. धेड उंबराच्या शास्त्रीय नावाची उकल, त्याचं फळ जवळून पहिल्यावर लगेच होते. फायकस म्हणजे अंजीर आणि हिस्पिडा म्हणजे चरचरीत राठ केसाळ लव असलेला. याचं फळ अंजिरासारखंच असतं फक्त त्याच्यावर बारीक केसाळ लव असते.

मोरेसी कुटुंबातल्या या झाडालाही ‘उंबराचं फूल’ ही उपमा लागू पडते. धेड उंबरालाही औदुंबरासारखं वेगळं फूल असं काही नसतंच. धेड उंबराला जी फळं येतात ती वास्तविक फुलंच असतात. या अनेक फुलांच्या गुच्छावर एक पातळ आवरण असतं. या आवरणाने झाकलेल्या गुच्छाच्या आत अनेक नर व मादी फुले असतात. यालाच आपण धेड उंबराचं फळ म्हणतो! या आवरणाने झाकलेल्या फुलाचं परागीभवन होण्यासाठी त्यांच्या देठाजवळ एक लहानसं भोक असतं  या भोकातून कीटक आत जाऊन परागीकरण घडवून आणतात आणि या फुलांची फळं बनतात. याच कारणामुळे धेड उंबराच्या फळातही अळ्या आणि किडे दिसून येतात. ही दोनेक सेंटिमीटर आकाराची पिवळसर फळं गुच्छाने येतात. पिकल्यावर गडद मातकट रंगाची होऊन केशरी छटेत बदलून गळून पडतात. चाखून पहिली तर ही फळं चवीला बेचव तुरकट लागतात म्हणून आपल्याला आवडत नाही. मात्र, पक्षी, प्राणी या फळांवर ताव मारतात. अनेकदा, जंगलात खाणं म्हणून ही फळं उपयोगी असल्याचं सिद्ध झालं आहे. या झाडांच्या बियांचं वहन याच पक्षांच्या आणि प्राण्यांच्या विष्ठेतून होतं. धेड उंबराची पानं अतिशय तजेलदार हिरव्या रंगाची असतात. कडांना कातरल्यासारखी नक्षी मिरवणारी ही पानं गुरांना चारा म्हणून उपयोगी ठरतात. वर्षभर हिरवीगार असणारी ही पानं जोमदार वाढतात आणि पावसाळ्यात तर अगदी नेत्रसुखद दिसतात. स्वत:च्या मध्यम चणीमुळे, या झाडाचं लाकूड फार  कामांमध्ये उपयोगी पडत नाही. प्रसंगी सरपण एवढाच त्याचा ज्ञात उपयोग आहे. आयुर्वेदाला या झाडाच्या सालीचे, फळाचे, मुळाचे उपयोग माहीत आहेत. असं हे साधंसं पटकन वाढणारं देशी झाड जमेल तिथे लावायला हरकत नाही. रस्त्याच्या, गटारांच्या कडांना उगवलेली झाडं लहान असतानाच काढून लावल्यास मस्त जगतात. साधं पण नेत्रसुखद असलेलं हे झाड शोधा म्हणजे नक्की सापडेल.

39-lp-asamantatun

मागच्या आठवडय़ात सुगरणीचा शोध घेताना लक्षात आलं की कॉलनीच्या रस्त्यावरची रंगसंगती बदलली आहे. जागोजागच्या ‘युनायटेड कलर्स ऑफ ग्रीन’मध्ये पिवळट पांढऱ्या रंगाचं प्रमाण बऱ्याच ठिकाणी डोकावताना दिसायला लागल्याचं जाणवलं. खूश व्हायला झालं कारण एक दणकट अन् सुगंधी झाड फुलायला सुरुवात झाली होती. जुने वाडे, घरातलं जुनं फíनचर यांचा या झाडाशी घनिष्ठ संबंध असल्याने हे भारतीय झाड माहीत असूनही जास्त परिचित नाहीये. भारताच्या अनेक प्रांतात जंगली झाड असलेला साग ऊर्फ सागवान आपल्याला त्याच्या फíनचरसाठीच्या उपयोगामुळेच जास्त ज्ञात आहे. टीक वुड असं जगप्रसिद्ध भारदस्त नाव धारण केलेलं सागाचं झाड व्हर्बनिसी कुळाचा सदस्य आहे. टेक्टोना ग्रँडिस या वनस्पतीशास्त्रीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या सागाच्या या शास्त्रीय नावाची फोड मजेशीर आहे. तमिळ भाषेत सागाला टेक्क म्हणतात. या टेक्कवरूनच टेक्टोटा तयार झाले असून ग्रँडिस म्हणजे भव्य. अर्थात भव्य असलेलं झाड म्हणजेच साग. थेट पंचवीस ते तीस मीटर्सची उंची गाठणारा हा पानझडी वृक्ष अगदी आडदांड वाढतो. दक्षिणेकडे अनेक जंगलांमध्ये दोनेक मीटर्सचा व्यास गाठलेले साग नजरेस पडतात. या दणकट झाडाची पानंही दणकट बरं का. हाताच्या तळव्यांहून मोठी. गर्द हिरव्या रंगाची ही पानं खरखरीत असतात आणि अंगाला घासली गेली तर चरचर होते. याचं कारण पानांच्या खालच्या बाजूला बारील केसाळ लव असते जी टोचते. या पानांचा उपयोग अनेक ठिकाणी पुडय़ा बांधण्यासाठी, गुरांना चारा म्हणून केला जातो. गावांमध्ये अजूनही शाकारणीसाठी या पानांना प्राधान्य दिलं जातं. पारंपरिक पद्धतीने लोकर, रेशिम रंगवणारे कारागीर सागाच्या पानांपासून निघालेल्या पिवळ्या रंगाला पसंती देतात हे आपल्याला माहीतही नसतं. हिवाळ्यात ही पानं गळून गेल्यावर साग अगदी उघडा पडतो. चत्रात नवीन पालवी फुटलेल्या सागाला फुलांनी भरून जायला पावसाळा उजाडतो. पावसाळ्यात सागाला धुमारे फुटल्याप्रमाणे तुऱ्यातुऱ्यांची फुलं येतात. हे तुरे फांदीच्या टोकावर येतात, ज्यात पांढरट पिवळ्या रंगाची लहानसहान फुलं येतात. याच फुलांना पुढे हिवाळ्यापर्यंत गोलाकार फळं लागलेली दिसून येतात. ही फळं खूप मोठी नसतात. जेमतेम एखादं दोन सेंमी आकाराच्या या फळाला वाळायला उन्हाळा उजाडतो. साधारण चार बियाबाळं सांभाळणारी फळं सुकली की झाडाखाली सडा घातल्यासारखी पडतात. या बियांपासून निघणारं तेल विविध पेन्ट्स आणि वॉíनश निर्मितीसाठी वापरलं जातं. हे झाड लावणंही सोप्पं आहे, अगदी सहजतेने या फळांतून सागाची नवीन रोपं बनवता येतात.

सागवान ऊर्फ सागाचं लाकूड जगातल्या सर्वोत्तम लाकडांमध्ये गणलं जातं. या लाकडाला सहसा कीड लागत नाहीच, पण अतिशय मजबूत म्हणून याला जगभर मागणी असते. या झाडातून काढलेल्या सरळ तुळया, खांब वर्षांनुवर्ष टिकून राहातात. म्हणूनच जुने वाडे पाडले की त्यातले वासे, तुळया फेकून दिले जात नाहीत. सागाचं फíनचर अत्यंत महाग आणि दर्जेदार समजलं जातं. कारण नसíगकरीत्या या लाकडाला चमक असते. सागाच्या गाभ्याला अतिशय सुगंध असतो. या मऊ भागापासून सुगंधी कृमीनाशक तेल काढलं जातं. भारतीय 40-lp-asamantatunपारंपरिक आयुर्वेदाला सागाच्या औषधी खुबी परिचित असल्याने अनेक पारंपरिक औषधांमध्ये सागाचा विविध प्रकारे वापर केला जातो. दुर्दैवाने, साग म्हणजे व्यावसायिक लागवड एवढंच समीकरण गेल्या दोनतीन दशकांत लोकप्रिय झालंय. शंभर टक्के उपयोगी असलेल्या या झाडाला खरंतर लाकडी सोनं म्हणूनच जपलं पहिजे, लागवडीत आणलं पाहिजे.

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाला गेले असताना, एक आई, मातीत खेळणाऱ्या आपल्या लहानग्याला ओरडत होती. तिचं हे लेकरू, गांडूळ बोटाने पकडून बघत होतं. ‘ते गांडूळ तुला चावलं तर डॉक्टरांकडे न्यायला लागेल’ हे वाक्य ऐकल्यावर हसावं की रडावं हेच कळेनासं झालं. आपल्याला गांडूळ माहीत असतं नि ते पावसाळ्यात दिसतं. त्याच्यापासून खत बनतं या छापील वाक्यांखेरीज गांडुळाची माहिती नसते. त्यात काही जाती असतात हेही माहीतच नसतं. आपल्याकडे खरंतर तीन प्रकारची गांडुळं आढळतात. यातलं पहिलं गांडूळ म्हणजे जमिनीच्या वरच्या थरावर राहाणारं एपिजीअल म्हणजेच पेरिओनिक्स एक्सकेव्हाटस गांडूळ. हे गांडूळ फक्त जमिनीच्या पृष्ठभागावरचे सेंद्रिय पदार्थ खाऊन टाकतं. ओला कचरा साफ करताना हे साहेब आपल्याला नेहमी दिसतात. हे गांडूळ रंगाने जांभळट लाल असतं नि बोटाने दाबून पाहिलं तर किंचित खरखरीत लागतं. याच्या शरीराची दोन्ही टोकं आधी करपट काळसर रंगाची असतात. या एपिजीअल गांडुळाचं शरीर एकदम सडसडीत नि साधारण दहा सेंमी असतं. हे गांडूळ इतर गांडुळांपेक्षा चपळ तर असतंच, पण त्याची प्रजनन शक्तीपण भरमसाठ असते. यामुळेच हे गांडूळखतासाठी उपयुक्त असतं. ‘मातीच्या वरवरच्या थरात राहणारं ‘अनसेनिक’ हे दुसऱ्या प्रकारचं गांडूळ म्हणजेच लॅपिटो मॉरिटी. खोदकाम करताना आपल्याला बऱ्याचदा दिसणारं हे गांडूळ टाकाऊ पदार्थ आणि ओला हिरवा कचरा म्हणजेच पानांचा कचरा खातं. या गांडुळाचं अंग चांगलं चकचकीत तर असतंच, पण हे महाराज लठ्ठपण असतात. स्पर्श करून बघितलं तर हे रबरासारखं लागतं. राखाडी पांढरट असलेलं अनसेनिक गांडूळ पहिल्यापेक्षा जास्त लांब असतं. साधारण पंधरा सेंमी लांबी गाठणारं हे गांडूळसुद्धा गांडूळ खतप्रकल्पात वापरलं जातं. राहता राहिला तिसरा प्रकार म्हणजे ‘एण्डोजेइक गांडुळं’ जी मातीच्या आत खूप खोल राहात असल्याने आपल्या नजरेस जास्त पडत नाहीत.

माझ्या पिढीतल्या यच्चयावत मुलांनी केलेली गोष्ट म्हणजे गांडुळांवर मीठ टाकून पहाणे. आता हे खूप क्रूर वाटतं, पण सगळ्यांनी ते केलेलं असतं, अगदी मी पण केलाय हा प्रकार. मीठ टाकल्यावर गांडूळ का तडफडायचं हे पर्यावरणाचा अभ्यास करायला सुरुवात केल्यावर कळालं. त्वचेमार्फत श्वसन करणाऱ्या गांडुळांचं शरीर जास्तीत जास्त ओलसर असतं. त्वचेमार्फत श्वसन करत असल्यामुळे त्यांची त्वचा अजिबात कोरडी पडून चालत नाही. म्हणजे जर त्वचा कोरडी झाली किंवा तिच्यातला चिकटपणा कमी झाला तर गांडुळं मरून जातात. उदाहरण द्यायचं झालं तर, गांडुळाला टीपकागदावर ठेवलं तर ते लगेच मरून जातं. कारण त्याची त्वचा कोरडी होते नि त्वचेतला ऑक्सिजन संपला की काम खतम! त्यांना खारट पाणीसुद्धा सोसत नाही. बहुतेकांना माहीतच नसतं की गांडूळ पाण्यातसुद्धा जास्त दिवस राहू शकत नाही. कारण त्यांच्या विष्ठेतून अमोनिया बाहेर पडत असतो. हा अमोनिया पाण्यात जमला की पाणी विषारी होऊन गांडूळ मरून जातं. बहुतेकांना पडणारा प्रश्न म्हणजे गांडुळाला पिल्लं कशी होतात? निसर्गाने गांडुळाला उभयलिंगी निर्मिलंय. पूर्ण वाढ झालेली गांडुळं मीलनानंतर त्यांच्या कातडीचा जास्त वाढलेला भाग म्हणजे ‘क्लिटेलम’ टाकून देतात नि त्याचा कोष बनवतात. हा कोष दोन आठवडय़ांनी उबून त्यातून चिंटुकली गांडुळं बाहेर येतात. प्रत्येक कोषातून साधारण तीन पिल्लं जन्मतात. ही पिल्लं पूर्ण वाढ होण्यासाठी म्हणजेच पुनरुत्पादनासाठी तयार व्हायला साधारण पंधरा ते अठरा दिवस लागतात. यांचं आयुष्य अवघं सहा ते बारा महिने एवढंच असल्याने त्यांची संख्या पटापटा वाढण्यासाठी निसर्गाने केलेली किमया आहे. या गांडुळांना शत्रू फार! बेडूक, साप, पक्षी, सरडे, चिचुन्द्री आणि हल्ली माणूसदेखील यांना खातो. माती खाणाऱ्या या गरीब जीवाला स्वसंरक्षण म्हणजे लपून बसणे. शक्यतो रात्रीची जमिनीतून ही कंपनी बाहेर येते. आता असा निरुपद्रवी जीव काय कुणाला चावणार?

गांडुळाचे उपयोग खूप आहेत जे मी सांगायला नकोच. ज्या जमिनीत गांडूळ नाही ती जमीन अगदी मृतच म्हणायला हवी. शेताची नांगरणी करून शेत लावल्यावर तरारलेल्या पिकाला पुन्हा नांगरता येत नाही. मग अशा वेळेस मुळांना हवा खेळती ठेवण्याचं काम हे आपले गरीब मित्र करतात. गांडूळ माती उकरत खाली खाली जाते, माती त्यामुळे सच्छिद्र होते, हवा खेळती राहून मातीतला पाण्याचा माव वाढतो. गांडुळाने खाल्लेला पाचोळा आणि माती पचून विष्ठेतून बाहेर पडते ज्याला आपण गांडूळ खत म्हणतो.

जाताजाता सांगायचं म्हणजे या गांडुळांचा आणि जंगलांचाही घनिष्ट संबंध असतो. शेत नांगरण्याचं काम माणूस करतो, पण जंगल नांगरण्याचं काम कोण करत असेल? ते काम करतात ही गरीब मंडळी. जंगल, आसमंत अशा अनेक चित्रविचित्र आणि उपयोगी जीवांनी समृद्ध आहे. निसर्गाच्या जाळ्यात प्रत्येकाचं एकमेकाशी सरपटणारं, धावणारं, उडणारं घट्ट नातं विणलेलं असतं. अशा वैविध्यपूर्ण विणीने आसमंत समृद्ध बनत असतो. किळस, भीती, तिरस्कार आणि स्वार्थ बाजूला ठेवून हे नातं पाहण्याची खरी गरज आपल्याला आहे. मी तर म्हणते परोपकारी गांडूळ, आपल्या मुलांना निसर्गाच्या जवळ नेणारं बेस्ट आणि सेफ पेट.
रुपाली पारखे देशिंगकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2016 1:03 am

Web Title: dhed umbar teak and earthworms
Next Stories
1 वैज्ञानिक नागपंचमी
2 उंबर आणि सुगरण
3 बाहेरचे आणि आतले…
Just Now!
X