03 August 2020

News Flash

निसर्ग पर्यटनाची वेळ झाली

दिवाळी झाली म्हणजे देशभर थंडीची चाहूल लागायला सुरुवात होईल.

दिवाळी झाली म्हणजे देशभर थंडीची चाहूल लागायला सुरुवात होईल. दिवाळीच्या सुट्टीत आपण पाहुणे म्हणून जातो तसं, आपल्याकडे परदेशी पाहुणे यायला सुरुवात होईल. हीच वेळ आहे, एखादी दुर्बीण, समजेल अशी निसर्गपुस्तिका आपल्या कुटुंबीयांसाठी दिवाळीभेट म्हणून घ्यायची आणि घराबाहेर पडायची.

दसरा झाला की लगेच वेध लागतात दिवाळीचे. दिवाळी म्हणजे खरेदी, दिवाळी म्हणजे फराळ आणि मोठी सुट्टी याच्या जोडीला दिवाळी म्हणजे कुठेतरी फिरायला जाणं हे समीकरण अगदी लहानपणापासून डोक्यात पक्कं झालेलं असतं. मला आठवतंय की माझ्या लहानपणी, भाऊबीज झाल्याबरोबर आम्ही भारताच्या कुठल्या तरी एका राज्यात फिरायला जायचो. दर दोन वर्षांनी केलेल्या कौटुंबिक सफरींमुळे  माझा अध्र्याहून जास्त भारत शाळेत असतानाच पाहून झाला होता. तीस वर्षांपूर्वी इंटरनेटच नसल्याने गुगलचे नकाशे, विकिपिडिया आणि प्रवासी लोकांचे ऑनलाइन समूह ही भानगडच नव्हती. म्हणूनच प्रवासाचे नियोजन दीर्घकाळ चालायचे. माझे वडील, जिथे जायचे आहे त्या स्थळाची ऐतिहासिक, भौगोलिक माहिती जमवून डायरीत त्यांच्या नोंदी करायचे. याचबरोबर, आम्हाला तिथल्या वन्यजीव, जंगल यांबद्दल जी माहिती उपलब्ध असेल ती वाचायला मिळायची. याचा खूप फायदा प्रवास करताना व्हायचा, कारण त्या ठिकाणाचा, तिथल्या माहितीचा शास्त्रीय पाया तिथे जाण्याअगोदरच पक्का झालेला असायचा. या नोंदी बनवणं आणि टिपणं काढायची सवय अगदी लहान वयातच लागल्याचा उपयोग पुढे झालाच. पुढे वाढत्या वयाबरोबर, पालकांसोबत फिरणं कमी होत गेलं, पण जंगलांतून फिरणं, परिसराची निरीक्षणं करणं मात्र अंगवळणी पडायला लागलं. हल्ली मुलांना सोबत घेऊन प्रवासाची आखणी करताना हे सगळं वारंवार आठवतं कारण पावलोपावली, ‘गुगलवर शोधू ना’, ‘तिथल्या वाइल्डलाइफची लिस्ट ऑनलाइन मिळेल ना’ अशी वाक्यं सहज ऐकवली जातात. तत्त्वत:, इंटरनेटचा वापर करून, अद्ययावत माहिती अगदी क्लिकवर मिळाली तरीही, आजूबाजूच्या परिसरात दिसणारे वन्यजीव ओळखताना सहज चूक होतेच. आजच्या आसमंतातल्या गप्पा अशाच वन्यजीवांबद्दल जे आपल्याला सहज दिसतात आणि त्यांना उल्लेखताना आपण सहज चूक करतो.

गंगेचं मदान आणि गोदावरीचा भाग हे आपल्या देशाचे ढोबळमानाने केलेले मुख्य दोन भाग म्हणता येतील. या दोन्ही नद्यांच्या खोऱ्यांमध्ये असलेली जैविक वैविधता बऱ्यापकी सारखी असली तरीही काही प्राणी अगदी ठळकपणे वेगळे असतात. आपल्या बहुतांश प्रवासांमध्ये कुठेतरी चटकन दिसून जाणारे प्राणी आपण व्यवस्थित ओळखायला लागलो तर त्यांच्याशी जोडलेली जीवसाखळीही समजायला लागते. माकडं, वानरं, वेगवेगळी हरणं, मार्जार कुळातले सदस्य माहीत असले की ते दिसल्यावर त्यांना ओळखण्याचा आनंद द्विगुणित होतो. आपल्या देशात, पवनपुत्र हनुमानामुळे माकडांना कायम संरक्षण मिळत आलंय. मात्र, बोलीभाषेत कपी, मर्कट, वानर अशा विशेषणांनी संबोधताना आपण पुढच्या पिढीला माकड आणि वानर हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत हे सांगतच नाही. दैनंदिन आयुष्यात, माकड आहेस, माकडासारखा वागू नकोस, माकडछाप आहेस, वानरसेना आली असली शेरेबाजी आपण सहज करत असतो. मात्र मर्कट वर्गातल्या माकड नि वानर यांत फरक आहे हे आपल्या लक्षात येत नाही. स्वत: माणूसही प्रायमेट सदरातच गणला जातो. या प्रायमेट कुटुंबात माणसाव्यतिरिक्त असलेल्या आणि आपल्या देशात आढळणाऱ्या आपल्या भाईबंदांच्या अनेक जाती नांदताहेत. यात आपल्या अवतीभोवती सहज दिसणारी माकडं म्हणजे मकाक प्रकारातली माकडं. भारतभर आढळणारी आणि अतिपरिचित असलेली ही माकडं ठळकपणे ओळखता येतात कारण ती आपल्याला नेहमी दिसत असतात. वानरसेना हा शब्द तयार करणाऱ्या व्यक्तीला वानर आणि माकड यातला फरक नक्कीच माहीत असणार. वानराच्या तुलनेत माकड कमी सडपातळ नि घट्टमुट्ट सदरात जमा होतात. या माकडांना गालाला खाण्याच्या पिशव्या असतात ज्यात ते खाणं भरून घेतात नि नंतर काढून खातात. आपल्या देशात नांदणारी मकाक प्रकारातली दोन जातींची माकडं आपल्याला सुपरिचित असतात. मकाक मुलाट्टा अर्थात रहीसेस मकाक. देशाच्या उत्तरेकडे म्हणजे अगदी हिमालयाच्या उतारांपासुन ते गोदावरी नदीच्या खोऱ्यापर्यंतच्या भागात रहीसेस मकाक अर्थात लालबुडय़ा माकड सुखेनव नांदतंय. लालबुडय़ा हे नाव त्याच्या रंगीत पाश्र्वभागामुळे लाभलंय. लालबुड आणि लाल तोंड हे या माकडाचं ठळक शरीरवैशिष्टय़ असतं.

या लालबुडय़ा माकडांना पाहायला कुठल्या जंगलात वगरे जावं लागत नाही, कारण अतिशय धीट आणि आक्रमक असणारी ही माकडं मानवी वस्तीत सहज येतात. मातकट भुरकट रंगाची आणि अंगावर जाणवण्याइतपत लव असलेली ही माकडं आखूड शेपटीची असतात. समोरून पाहिलं तर यांच्या टाळूवरचे केस मागे वळवल्यासारखे दिसतात. आपल्या गबदुल शरीराला साजेशा हालचाली करत या माकडांची टोळी डणकत असते. अतिशय शिस्तबद्ध रचना असलेल्या टोळीतला प्रत्येक सभासद टोळीतील आपापल्या स्थानाबरहुकूमच वागतो. टोळीचा मुखिया एक हुप्प्या असतो ज्याने सगळ्या टोळीला आपल्या अधिपत्याखाली ठेवलं असतं. ज्येष्ठ माकडांशी कनिष्ठ माकडांनी कसं वागावं, तरुण नरांनी एकमेकांशी कसं वागावं, टोळीत वागायचे नियम अगदी ठरलेले असतात जे कधीच बदलले अथवा तोडलेही जात नाहीत. फूटभर उंच असलेली ही माकडं स्वभावाने खुप चिडकी असतात. लालबुडे नर आकाराने माद्यांपेक्षा वजनदार असतात. हिमालयात साधारण सात ते आठ हजार फूट उंचीपर्यंत आढळणारी ही माकडं अगदी बर्फातही मस्त राहतात. यासाठी त्यांच्या अंगावर हिवाळ्यात खास मऊ दाट लव येते. गंमत म्हणजे हे लालबुडे पाण्यात मस्तपकी पोहतात. मानवी वस्त्यांखेरीज माळरान, गवताळ जागा, पाणवठय़ाजवळील भाग अशा विविध ठिकाणी राहायला या माकडांनी स्वत:ला तयार करून घेतलं आहे.

28-lp-11112016

ठरावीक असा मीलनाचा काळ नसणारी ही माकडं विविध हवामानात राहून त्या त्या परिस्थितीत अनुकूल वातावरणात पिल्ले जन्माला घालतात. मानवी स्त्रीशरीराप्रमाणेच मकाक मादीचे साधारण अठ्ठावीस दिवसांचे मासिक चक्र असते. माजावर आल्यावर मादीच्या बुडाजवळचा भाग जास्त लाल होतो ज्याने नरांना सांगावा धाडला जातो. लालबुडय़ांच्या टोळीत अनेक सदस्य असल्याने मीलनासाठी एकापेक्षा अनेक पर्याय या माद्यांना उपलब्ध असतात. नर दोन प्रकारे आपली आतुरता व्यक्त करतात. एकतर आपल्यापेक्षा कमी ताकदवान नरांवर आवाज गाजवून अन्यथा मादीभोवती सतत फिरून तिला थोडक्यात मस्का मारायचं काम करतात. अनेकदा यासाठी ते तिचं अंग निवडणं, किडे काढणं, तिच्या पिल्लाशी खेळणं असले प्रकार करून तिला खूश करायचा प्रयत्न करतात. या माकडांची मोठी टोळी असल्याने, कुणाचा पिता कोण हे कळत नाही, मात्र पिल्लांची काळजी सर्वच जण मिळून घेतात. जशी पिल्लं मोठी होतात तसं, समूहातल्या काही माद्या व नर वेगळे होतात व नवीन टोळी बनवतात. दोन टोळ्या आपल्या हद्दी अशा बनवत नाहीत मात्र त्यांच्या झोपायच्या, खेळायच्या व वावरायच्या जागा ठरलेल्या असतात. साधारण दोन टोळ्या एकमेकांसमोर आल्यास त्यातल्या त्यात अशक्त टोळी माघार घेते नि भांडण, मारामाऱ्या टाळल्या जातात. अनेकादा या टोळ्यांची भांडणं खाण्यावरून होतात. रहीसेस माकडं आवडीने शाकाहार व  मांसाहार करतात. शाकाहारात फळं, मुळं, पानं आणि कंद आवडीने खाल्ली जातात. तर चवीपालटाला मांसाहार करताना सरडे, पाली, किडे, लहान पक्षी व त्यांची अंडी आणि कधी कधी लहान सस्तन प्राणीसुद्धा खाल्ले जातात. निसर्गाचे ऋतुचक्र लक्षात ठेवून ही माकडं आपला आहार व जीव सांभाळत असतात. या माकडांचं एकमेकांशी संभाषण भरपूर प्रकारे होत असतं. चेहरे करणे, रागीट आवाज करणे, वेगवेगळ्या तऱ्हेचे चित्रविचित्र आवाज काढणं यातून आपल्या भावभावना ते व्यक्त करतात. दातावर दात घासून, मागच्या पायावर उभे राहून एकमेकांना धमकावणे, किंचाळणे, गुरगुरणे असे वेगवेगळे प्रकार ते सर्रास करतात. ही माकडं आपल्या आयुष्याशी जवळून जोडली गेली आहेत. कशी? आपल्या रक्तगटातला जो ‘फँ’ फॅक्टर रक्तगटाचा प्रकार सांगतो, तो या माकडाच्या सन्मानार्थ स्वीकारला गेलाय. या माकडाचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, कारण मनुष्यास उपयुक्त असलेल्या अनेक उत्पादनांचे प्रयोग यांच्यावर केले गेले आहेत नि मगच ते उत्पादन आपण वापरतो.

या लालबुडय़ासारखाच आपल्याकडे दिसणारा मकाकचा दुसरा प्रकार म्हणजे दक्षिणी माकड ऊर्फ भांगपाडय़ा माकड. पश्चिम घाटात आढळणारं हे मकाक रेडिआटा माकड लालबुडय़ापेक्षा अंगकाठीने सडपातळ तर असतंच, पण याची शेपटीही लांब असते. हे माकड गोदावरीच्या पसरलेल्या भागात राहतं म्हणूनच त्याला दक्षिणी माकड असं नाव दिलं गेलंय. लालबुडय़ाप्रमाणेच यालाही गालाच्या पिशव्या असतात, ज्यात खाणं भरून ते नंतर खाण्याचे काम हे भांगपाडे करतात. हे भांगपाडय़ा नाव या माकडाच्या डोक्यावरील केसांच्या रचनेमुळे त्याला मिळालंय. लालबुडय़ा जमिनीवर जास्त वावरताना दिसतो तर भांगापाडय़ा झाडांवर जास्त राहतो. याचसाठी त्याची शेपटी लालबुडय़ापेक्षा जास्त लांब असते. मानवी वस्त्यांजवळ सर्रास आढळणारा भांगपाडय़ा, जंगलांमध्येही आढळतो. पश्चिम घाटाच्या जंगलांमध्येही सुखेनव नांदणारं भुरकट कबरट रंगाचं हे माकड लालबुडय़ासारखं लाल नसतं. डोक्यावरचा भांग ही यांची ठळक निशाणीच. याही माकडामध्ये नर हा मादीपेक्षा आकाराने थोडा मोठाच असतो. थंडीच्या काळात भांगपाडय़ा आपल्या अंगावर थोडय़ा मोठय़ा केसांचा कोट मिरवतं, जो थंडीत गडद राखाडी रंगाकडे सरकतो तर उन्हाळ्याच्या दिवसांत विरळ होऊन फिक्कट रंगात बदलतो. हिमालयाच्या मानाने पश्चिम घाटात थंडी कमी असल्याने यांच्या अंगावरील केस लालबुडय़ांपेक्षा कमीच असतात. साधारण पंचवीस-तीसच्या टोळीत नांदणारं हे माकड अतिशय धीट असतं. या माकडांबद्दल झालेल्या संशोधनातून निष्पन्न झालंय की भांगपाडय़ा अतिशय शिस्तबद्ध असतात व काटेकोरपणे नियमांचे पालन करतात. यांच्या टोळीचे प्रत्येक गोष्टीसाठी नियम ठरलेले असतात. एकमेकांशी वागायच्या पद्धती, लहानांनी ज्येष्ठांशी वागायचे नियम, टोळीच्या हद्दी अशा अनेक गोष्टींचे निर्णय कळपातले मुख्य नर सदस्य मिळून घेतात. साधारण दीड ते दोन किलोमीटर्सचा परिसर प्रत्येक टोळीची हद्द असते जी दुसऱ्या टोळीने तोडल्यास यांच्यात मारामारी होते.

याही माकडांचं प्रजनन वर्षभर सुरू असतं. निरीक्षकांनी नोंदवल्यानुसार साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर हा यांच्या मीलनाचा सर्वोच्च काळ समजला जातो. कळपात माद्या भरपूर असल्याने जोडीदाराची कमी नसते व त्याच जोडीला जन्माला येणाऱ्या पिल्लांची काळजी घ्यायलाही सदस्य असतात. भांगपाडी माकडं दिवसरात्र सहज झाडांवर वावरू शकतात. मात्र ही दिवसा जास्त उद्योग करताना दिसतात. दिवसभर फळं, धान्यं, पानं, झाडांचे कोवळे कोंब, मुळं खातातच, पण याच जोडीला वेगवेगळे किडेही खातात. अभ्यासकांनी या माकडांच्या काही मजेशीर नोंदी नोंदवल्या आहेत. आराम करायच्या वेळेस, झोपायच्या वेळेस भांगपाडी माकडं नर-नर किंवा मादी-मादी असा घोळका करून झोपतात. याच जोडीला एकमेकांचे केस विंचरणे, अंग निवडणे असले प्रकार केले जातात. हा अंग निवडणे प्रकार कित्येकदा एकमेकांना आलेल्या ताणातुन मुक्त करण्यासाठी ही माकडं करतात असं निरीक्षण अनेकांनी नोंदवलंय. आपणसुद्धा असंच काहीसं करतो ना आपल्या जवळच्या, कुटुंबातल्या व्यक्तींसाठी? कित्ती साम्य ना? ही माकडंसुद्धा ओठांचा चंबू करून, दात रगडून घशातून वेगवेगळे आवाज काढतात. वेगवेगळ्या भावभावना या आवाज काढण्यातून व्यक्त करतात. धोक्याचा इशारा देताना, संभाषण करताना, भावभावना व्यक्त करताना मागील पायांवर उभं राहून, जोरजोरात किंचाळून, झाडांच्या फांद्या हलवून ही माकडं थयथयाट करतात. यांच्या कळपात मुख्य नराला स्वत:चं स्थान मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. पण हेच कळपातील मुख्य मादी वंशपरंपने बनत असल्याने तिला जास्त त्रास होत नाही. टोळक्याला धोक्याचा इशारा दिल्यावर सगळी टोळी सुरक्षित ठिकाणी जाऊन बसते. लहान पिल्लांना आणि अननुभवी तरुणांना धोक्यापासून जपलं जातं. निसर्गात यांना शत्रू म्हणजे बिबळे, वाघ, रानकुत्रे, मगरी, मोठे अजगर, घारी, गरुड, मानवी वस्तीजवळचे कुत्रे आणि सर्वात धोकादायक शत्रू म्हणजे माणूस! पूर्वी प्रयोगासाठी, मनोरंजनासाठी, शिकार, बागायती शेतीसाठी या माकडांना पकडलं जायचं. मात्र आता भारतीय वन्यजीव कायद्याने यांना संरक्षित केलंय.

या दोन माकडांच्या जोडीला आपल्याला नेहमी दिसणारी वानरं ऊर्फ लंगूरसुद्धा आपले भाईबंद सदरात गणले जातात. चपळ अंगकाठी आणि लांब शेपटय़ांच्या या वानरांना माकडांप्रमाणे गालात अन्न भरायच्या पिशव्या नसतात. मात्र याऐवजी निसर्गाने त्यांच्या पोटात, जठराला अन्न भरायला वेगळा कप्पा दिलेला असतो. या वानरांच्या अनेक जाती देशात आहेत, मात्र आपल्याला चिरपरिचित असलेला वानर म्हणजे हनुमान लंगूर. लांबसडक शेपटीमुळे या वानराला हनुमानाचे नाव देऊन देवत्व बहाल केलंय. हुप्प्या हे नाव सार्थ करणारा दीर्घ हुऽऽऽप्प हुऽऽऽप्प असा आवाज करणारी ही हनुमान लंगूर जात मानवी वस्तीच्या जवळ सहज चक्कर टाकून जाते. आपल्या देशात, वाळवंटाचा भाग सोडल्यास अगदी हिमालयापर्यंत या लंगुराने बस्तान मांडलंय. शंभर टक्के शाकाहारी असलेलं हनुमान लंगूर सतत झाडांवर बसून खात असतं. या दरम्यान, जंगलात कुठे वाघ दिसला तर ‘खकर्र-खॉक’ असा धोक्याचा इशारा सगळ्यात पहिलं देतं आणि जंगल सावध करतं. माकडांच्या टोळीप्रमाणेच, इथेही तगडा वानर सर्व टोळीचं नेतृत्व करतो. या वानरांचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे बिबळ्या. झाडावर चढून सराईत शिकार करणाऱ्या बिबळ्यापासून जपण्यासाठी ही टोळी रात्री उंच झाडांच्या अगदी पातळ फांद्यावर एकत्र झोपते जिथे सहसा बिबळे पोहोचू शकत नाहीत. आपल्या शेपटीने स्वत:चा तोल सांभाळत लांबलांब उडय़ा मारणारी ही काळतोंडी वानरं धार्मिक श्रद्धेमुळे मारली जात नसली तरीही वन्यजीव कायद्याने संरक्षित आहेतच. अशी ही माकडं आणि वानरं आपल्या पर्यटनादरम्यान हमखास दिसतातच. यांच्या जोडीला अनेकदा दिसणारे जीव म्हणजे वेगवेगळी हरणं. आमच्या लहानपणी हरीण म्हटलं की रामायणातलं सुवर्णमृग आठवायचं. हल्ली हरीण म्हटलं की लोकांना सलमान खान आठवतो. एकंदरीतच, सलमान खानमुळे आपल्या देशात हरणाबद्दल लोक बोलायला लागले.

अनेकदा जंगलाजवळ राहणाऱ्यांना, जंगलात फिरायला गेलेल्या पर्यटकांना हरणांचे कळप दिसतात. मात्र बहुतेकांना वेगवेगळी हरणं माहीत नसल्याने हरणं काय, चितळं काय नि सांबर काय सगळी सारखीच वाटतात. याचं कारण आहे शास्त्रीय माहितीचा अभाव. सलमान खानने मारलेलं काळवीट हरीण आहे की नाही, असा प्रश्न जेव्हा कुणी विचारतं तेव्हा हसावं की रडावं हेच कळत नाही. हरणांच्या जवळजवळ नऊ जाती सापडणारा भारत हा एकमेव देश आहे. सíव्हडी कुटुंबातले प्राणी त्यांच्या डौलदार िशगांमुळे ओळखले जातात. हरणांमध्ये फक्त नरांनाच कॅल्शिअमने बनलेली िशग असतात. या कॅल्शिअमसाठी सतत गवत चरण्याचं आणि वेळप्रसंगी गळून पडलेल्या िशगांचे तुकडे चघळण्याचं काम ही हरणं करतात. स्टॅग, एन्टलर्ड डिअर, बारिशगा, सांबर, चितळ, भेकर, कस्तुरीमृग आणि पारा ही सर्व सारंग हरणं आपल्या देशात आढळतात. यातलं चितळ अर्थात स्पॉटेड डिअर म्हणजेच ठिपकेवालं हरीण आपण संपूर्ण देशभर पाहतो. सर्वात देखणं समजलं जाणारं हे हरीण उघडय़ा रानावर िहडणं पसंत करतं. यांच्या विणीचा वेग भरपूर असल्याने देशातल्या बहुतांश जंगलांमधल्या शिकारी प्राण्यांचं हे मुख्य खाद्य आहे. जंगलात राहणाऱ्या हरणांची दृष्टी उत्तम नसल्याने त्यांना घ्राणेंद्रियांवर अवलंबून राहावं लागतं. मात्र माळरानावर नांदणारी हरणं उत्तम दृष्टी बाळगतात. आपल्या देशाच्या जंगलांमध्ये राहणारं सांबर हे सर्वात मोठं हरीण कमी दृष्टी नि तिखट नाक-कान याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. हिमालयाचा अति उंच भाग सोडल्यास, देशात बहुतेक भागात हे लाजाळू हरीण आढळतं. शंभर टक्क्के शाकाहारी असलेलं सांबर पहाटे किंवा संध्याकाळी जंगलांमध्ये वावरणाऱ्या हरणाबद्दल आपण सांबार की सांबर यातच गुंतलो असतो हे आपलं दुर्दैव. अशी ही दोन हरणं आपल्याला ऐकून पाहून माहीत असतात.

या हरणांच्या जोडीलाच, बोव्हिडी कुटुंबातल्या गाय-म्हशी आणि मेंढय़ांचं नातं चक्क काळवीट आणि चिंकारा या कुरंगांशी असतं असं सांगितलं तर अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसतो. बोव्हिडी कुटुंबातला सर्वात उत्क्रांत झालेला गट म्हणजे कुरंग गट. यांचे हरणांशी साम्य असल्याने आपण त्यांनाही हरीणच म्हणतो. मात्र यांच्या िशगांमुळे हे कुरंग लगेच ओळखता येतात. काळवीट, चौिशघा, चिंकारा, तिबेटी चिंकारा, नीलगाय आणि चिरू या कुरंगांच्या सहा मुख्य जाती आपल्या देशात आढळतात. या सर्वामधलं काळवीट हा जीव, सलमान खानमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला. तुकतुकीत काळ्या रंगामुळे काळवीट नाव मिरवणारं कुरंग अतिशय चपळ व देखणं असतं. नराची वळणदार िशग आणि तुकतुकीत कांती अगदी नजर लागावी अशीच असते. इथेही, फक्त नरालाच िशग असतात. सपाट माळरानावरचा हा जीव आपल्या सक्षम नजरेवर अवलंबून दिवसा माळरानावर चरण्याचं काम करतो. धोक्याचा इशारा मिळाल्यावर आडव्यातिडव्या उडय़ा मारत पसार होण्यात काळवीट अतिशय पटाईत असतात. पूर्वी भारताच्या बहुतांश पठारांवर नांदणारी ही काळवीटं वाढत्या शहरीकरणाचा बळी ठरली आहेत. वसंताच्या आगमानाच्या सुमारास प्रियराधन करणाऱ्या या काळवीटांबद्दलच आपलं अज्ञान सलमान खान एपिसोडनंतरही फार बदललेलं नाहीच. याच जोडीला आपल्या देशात अनेक ठिकाणी सहज दिसणारी नीलगाय ऊर्फ ब्लू बुल आणि चिंकारा हे जीवसुद्धा आपल्या अज्ञानाचा बळी ठरत आहेत. आसमंतातल्या या जीवांबद्दल लिहायला खूप काही आहे. आपल्या प्रवासात यापकी एकाचीही झलक दिसल्यास त्यांच्याबद्दल कुतूहल जागृत होऊन अधिक माहिती करून घेण्याची सुरुवात जरी झाली तरी ‘इट्स अ ग्रेट स्टार्ट’.

पूर्वी दिवाळीत घरातल्या मुलांना गरजेच्या आणि उपयुक्त गोष्टी सणानिमित्त घेतल्या जायच्या. तेव्हा चंगळवाद बोकाळला नव्हता. अशाच एका दिवाळीत माझ्या पालकांनी, नकळत्या वयात माझ्या हातात ठेवलेल्या दुर्बीण आणि निसर्गपुस्तकांनी माझ्या आयुष्याची दिशाच बदलून टाकली. घरातल्या मुलांना कौटुंबिक पर्यटनातून, निसर्गातल्या धुळीशी आणि जंगल भ्रमंतीशी जोडलं गेलेलं खरं आयुष्य मॉल्सच्या, मल्टीप्लेक्सच्या चकचकीत नि बेगडी आयुष्यापेक्षा लाखपटीने उजवं आहे हे जाणवून देण्याची हीच वेळ आहे. एसीच्या गार झुळुकेपेक्षा निसर्गातली खेळती आणि शुद्ध गार हवा अनुभवायला हवी हे जेव्हा आपल्या मनावर कृतीने िबबवलं जाईल, तेव्हाच निसर्गातलं वैविध्य शोधण्यासाठी घरोघरी काव्‍‌र्हर आणि गुडाल तयार होऊ शकतील. दिवाळी झाली म्हणजे देशभर थंडीची चाहूल लागायला सुरुवात होईल. दिवाळीच्या सुट्टीत आपण पाहुणे म्हणुन जातो तसं, आपल्याकडे परदेशी पाहुणे यायला सुरुवात होईल. हीच वेळ आहे, एखादी दुर्बीण, समजेल अशी निसर्गपुस्तिका आपल्या कुटुंबीयांसाठी दिवाळीभेट म्हणून घ्यायची आणि घराबाहेर पडायची. म्हणजे आपल्या घरातले, माकडाला वानर आणि काळवीटाला हरीण म्हणणार नाहीत. बेटर लेट दॅन नेव्हर.

उठा उठा दिवाळी झाली, निसर्ग पर्यटनाची वेळ झाली.
रूपाली पारखे देशिंगकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2016 1:21 pm

Web Title: nature tourism
Next Stories
1 पर्यावरणीय सीमोल्लंघन
2 कावळा, कारवी आणि कदंब
3 तेरडा, जळवा आणि पाल
Just Now!
X